हेच का रोहितचे ‘दादा’प्रेम?

    07-Aug-2026   

Rohit Pawar
 
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी सर्वाधिक उचलून धरला. मग त्यामागचा उद्देश प्रसिद्धी असेल किंवा विरोधकांना लक्ष्य करणे. पण, रोहित पवारच याबद्दल सातत्याने बोलत होते. मात्र, त्याच वेळी काकांच्या जाण्यानंतर एकट्या पडलेल्या काकींना भावनिक आणि कौटुंबिक साथ देण्याची वेळ आली असताना रोहित पवार मागे का हटले, असा प्रश्न राहून राहून उपस्थित होतो. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख करत काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली. या टीकेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. मात्र, रोहित पवारांनी काँग्रेसच्या या विधानाचे चक्क समर्थन केले. वेळोवेळी अजितदादांवर असलेल्या आपल्या प्रेमाचा दाखला देणार्‍या रोहित पवारांवर आता सुनेत्रा पवारांवर झालेल्या टीकेचे समर्थन करण्याची वेळ का आली?
 
सुनेत्रा पवार या रोहित पवार यांच्या काकू. त्यांच्यात कितीही राजकीय मतभेद असले, तरी रोहित पवारांनी कुटुंबातील एका महिला सदस्याविषयी झालेल्या अवमानकारक उल्लेखाचा तीव्र शब्दांत निषेध करणे अपेक्षित होते. मात्र, कदाचित त्यांना आपल्या मित्रपक्षाच्या चुकीचे समर्थन करून आपली राजकीय महत्त्वाकांक्षा जपणे मोठे वाटले असावे. म्हणूनच प्रश्न पडतो की, अजित पवारांचे बोट धरून राजकारणात उतरलेले रोहित पवार त्यांचे उपकार इतयात विसरलेत का? सुनेत्रा पवार यांच्या अपमानाच्या निषेधार्थ राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला. मात्र, पवार कुटुंबीय कुठे हरवले ते कळले नाही? किमान सुप्रिया सुळेंनी तरी आपल्या वहिनींची किमान एका महिलेची बाजू घ्यायला पुढे येणे आवश्यक होते. परंतु, इतर वेळी एवढे अवांतर बोलणार्‍या सुप्रियाताईंनी यावेळी मात्र तोंडाला कुलूप लावलेले दिसते. पवारसाहेबही सूनबाईंच्या समर्थनार्थ चकार शब्द बोलले नाही. पण, रोहित पवार चक्क काँग्रेसच्या टीकेत सूर मिसळून मोकळे झाले. दादा हयात असताना, रोहित पवारांना त्यांनी एका कार्यक्रमातून टोला लगावला होता. ‘भावकीकडे लक्ष दिलं म्हणून रोहित तू निवडून आला’ हे दादांचेच शब्द होते. पण, दादा असतानाही असेल किंवा आता दादांपश्चात रोहित पवारांनीही ‘गुंगी गुडिया’ टिप्पणीला समर्थन देऊन दाखवलेला हा कृतघ्नपणाच म्हणावा लागेल.
‘ठाकरे’ ब्रॅण्ड पुरेसा नाही!
 
राजकीय नेतृत्वाला केवळ आडनाव पुरेसे नसते, हे अलीकडेच घडलेल्या आणखीन एका घटनेवरून स्पष्ट झाले. हे स्पष्ट करून दाखवले, ते साक्षात आपल्या आडनावाचा बाणा मिरवणार्‍या ठाकरेंनी! महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे’ नावाला मोठे राजकीय आणि भावनिक वजन. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत वक्तृत्वाने आणि राज ठाकरे यांच्या प्रभावी भाषणशैलीने या आडनावाला वेगळी ओळख मिळवून दिली. मात्र, त्यांच्या पुढच्या पिढीकडे पाहता, ही ओळख हळूहळू पुसट होत आहेे का, असा प्रश्न उपस्थित होतो. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २०व्या वर्धापन दिन सोहळ्यात ‘मनविसे’चे अध्यक्ष अमित ठाकरे भाषणासाठी व्यासपीठावर आले. त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि थोडावेळ बोलले. नंतर, "आता मी विसरायला लागलो. मला सूचत नाहीये. मी येतो परत, थांबा” असे म्हणत अमित ठाकरे अर्धवट भाषण सोडून तिथून निघून गेले. त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने येऊन त्यांनी आपले भाषण पूर्ण केले. हा प्रसंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावर टीकेची झोड उठली. यानंतर, "माझ्या अडकण्याच्या दोन मिनिटांच्या गॅपमध्ये महाराष्ट्राचे नुकसान झाले असल्यास मला सांगावे,” असे अमित ठाकरे यांनी ट्रोलर्सना उत्तरही दिले. याचाच अर्थ, त्यांना झालेल्या घटनेचा पश्चात्ताप वगैरे अजिबात नाही.
 
बरं, त्यांच्याबाबतीत असं काही घडल्याची ही पहिलीच वेळ नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी जेव्हा आदित्य ठाकरेंनी ‘प्रेझेंटेशन’ दिले, तेव्हासुद्धा अमित ठाकरेंनी स्वत: मागे राहत आदित्य ठाकरेंना पुढे केले होते. खरेतर, राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी वक्त्यांपैकी एक. दुसरीकडे अमित ठाकरे यांना पक्षाच्या नव्या पिढीचे नेतृत्व म्हणून पुढे केले जात असताना व्यासपीठावर भाषण अर्धवट सोडून निघून जाणे, हे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्हच निर्माण करणारे. राज ठाकरे यांनी आपल्या वक्तृत्वाने निर्माण केलेली उंची गाठण्यासाठी अमित ठाकरेंना अधिक तयारी, आत्मविश्वास आणि राजकीय परिपक्वता दाखवावी लागेल. वडिलांकडून, आदित्य ठाकरेंकडून आता तरी त्यांनी भाषणाचे धडे घ्यावे, अन्यथा त्यांची अवस्था मूळ विषय सोडून दुसरीकडेच भरकटणार्‍या काकांसारखी होण्यास वेळ लागणार नाही.
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर