मुंबई 3.0 च्या नियोजनाला वेग; सिंगापूरच्या सुरबाना ज्युरोंगची जागतिक तज्ज्ञता

323.44 चौ.कि.मी. क्षेत्रात नवे शहरी-आर्थिक केंद्र; व्हिजन डॉक्युमेंट, मास्टर प्लॅन आणि नियोजन आराखडा तयार होणार

Mumbai 3.0 Master Plan
 
मुंबई : (Mumbai 3.0 Master Plan) मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील विस्ताराला नियोजनबद्ध आणि जागतिक दर्जाचे स्वरूप देण्यासाठी प्रस्तावित ‘मुंबई 3.0’ प्रकल्पाच्या नियोजनाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई 3.0 साठी व्हिजन डॉक्युमेंट, मास्टर प्लॅन आणि संबंधित नियोजन आराखडा तयार करण्यासाठी सिंगापूरस्थित सुरबाना ज्युरोंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि. सोबत सल्लागार करार केला आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि सुरबाना ज्युरोंगचे दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश मिश्रा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सिंगापूरच्या नियोजनबद्ध शहरी विकासाचा अनुभव आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या गरजा यांची सांगड घालून मुंबई 3.0 चे नियोजन करण्यात येणार आहे.(Mumbai 3.0 Master Plan)
 
30 आठवड्यांत अंतिम संकल्पना आराखडा
 
सल्लागार कामाचा पहिला टप्पा काम सुरू झाल्यापासून 30 आठवड्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये प्रारंभिक अहवाल, सद्यस्थितीचा अभ्यास, व्हिजन डॉक्युमेंट, प्रारूप भू-वापर आराखडा, भागधारकांशी संवाद आणि अंतिम संकल्पना आराखडा अशा टप्प्यांचा समावेश आहे.(Mumbai 3.0 Master Plan)
 
सध्याचा भू-वापर, लोकसंख्या, रस्ते व वाहतूक व्यवस्था, सामाजिक-आर्थिक स्थिती, नागरी सुविधा, पर्यावरणीय वैशिष्ट्ये आणि सार्वजनिक सुविधांचा सविस्तर अभ्यास करून भविष्यातील शहराची दिशा निश्चित केली जाणार आहे.(Mumbai 3.0 Master Plan)
 
भू-वापरापासून वाहतुकीपर्यंत एकात्मिक नियोजन
 
मुंबई 3.0 च्या नियोजनात निवासी, व्यावसायिक, मिश्र-वापर, औद्योगिक, संस्थात्मक, मनोरंजन, वाहतूक आणि संवर्धन क्षेत्रांचा समावेश असलेला एकात्मिक भू-वापर आराखडा तयार केला जाणार आहे.(Mumbai 3.0 Master Plan)
 
यासोबतच प्रादेशिक आणि शहरांतर्गत वाहतूक जोडणी, सार्वजनिक वाहतूक, विविध वाहतूक साधनांमधील समन्वय, पादचारी व मोटारविरहित वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूककेंद्रित विकासाच्या संधींचे नियोजन केले जाईल.(Mumbai 3.0 Master Plan)
 
पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पावसाच्या पाण्याचा निचरा, घनकचरा व्यवस्थापन, वीज, गॅस, सामाजिक पायाभूत सुविधा, जलस्रोत आणि हरित क्षेत्रांचे जाळे यांचाही पायाभूत सुविधा आराखड्यात समावेश असेल.(Mumbai 3.0 Master Plan)
 
124 गावांचा समावेश
 
मुंबई 3.0 सुमारे 323.44 चौ.कि.मी. क्षेत्रात विकसित होणार असून रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि पेण तालुक्यांतील 124 गावांचा त्यात समावेश आहे.
 
महाराष्ट्र शासनाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, 1966 अंतर्गत या प्रकल्पाची अधिसूचना जारी केली असून एमएमआरडीएची नवीन नगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अटल सेतूच्या प्रभाव क्षेत्रात, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू बंदराच्या जवळ असलेले हे क्षेत्र भविष्यातील आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
 
रोजगार आणि गुंतवणुकीचे नवे केंद्र
 
मुंबई 3.0 मध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, संस्थात्मक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांचा विकास करण्याची संकल्पना आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
 
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूककेंद्रित विकास, डिजिटल पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा आणि नाविन्यपूर्ण उद्योगांना चालना देणारी व्यवस्था उभारण्यावर भर राहणार आहे.
 
दावोसच्या करारापासून प्रत्यक्ष नियोजनापर्यंत
 
जानेवारी 2026 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान एमएमआरडीए आणि सुरबाना ज्युरोंग यांच्यात धोरणात्मक सहकार्यासाठी सामंजस्य करार झाला होता. मास्टर प्लॅनिंग, वास्तुरचना, पायाभूत सुविधा अभियांत्रिकी, प्रकल्प व्यवस्थापन आणि व्यवहारविषयक सल्ला या क्षेत्रांत सहकार्य करण्याचे त्यावेळी निश्चित करण्यात आले होते.
 
त्यानंतर महाराष्ट्र शासनाने दि.4 जून 2026 रोजी सुरबाना ज्युरोंगची शासन-ते-शासन (G2G) तत्त्वावर नियुक्ती करण्यास मान्यता दिली. आता सल्लागार करार झाल्याने ही भागीदारी संकल्पनेच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष नियोजनाच्या टप्प्यात पोहोचली आहे.
मुंबई 3.0 एका नजरेत
 
क्षेत्रफळ : 323.44 चौ.कि.मी.
गावे : 124
तालुके :पनवेल, उरण, पेण
जिल्हा :रायगड
नियोजन प्राधिकरण :एमएमआरडीए
नियोजन सल्लागार :सुरबाना ज्युरोंग
अंतिम संकल्पना आराखडा : 30 आठवडे
प्रमुख क्षेत्रे : निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, संस्थात्मक, लॉजिस्टिक्स
प्रमुख पायाभूत सुविधा : वाहतूक, पाणी, मलनिस्सारण, वीज, डिजिटल व सामाजिक सुविधा
धोरणात्मक जवळीक :अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए
 
टप्प्याटप्प्याने नियोजन
 
टप्पा  कालावधी 
 प्रारंभिक अहवाल  4 आठवडे 
|सद्यस्थिती अहवाल  10 आठवडे 
|व्हिजन डॉक्युमेंट 16 आठवडे 
 प्रारूप संकल्पना भू-वापर आराखडा |24 आठवडे 
|भागधारक संवाद अहवाल 26 आठवडे 
 अंतिम संकल्पना आराखडा|30 आठवडे 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
“आपण आता सामंजस्य करार करण्याच्या टप्प्यातून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर आलो आहोत. नियोजित शहरांच्या विकासाचा अनेक दशकांचा जागतिक अनुभव असलेली सुरबाना ज्युरोंग आमच्यासोबत काम करत आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला यामुळे नवी दिशा आणि गती मिळेल. भारताच्या विकासाचा पुढील टप्पा तिसऱ्या मुंबई आणि चौथ्या मुंबईतून पुढे येईल, असा मला विश्वास आहे.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
“जागतिक दर्जाच्या सर्वोत्तम नियोजनाचा अनुभव आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षेची सांगड घालून शाश्वत, उत्तम वाहतूक जोडणी असलेले आणि भविष्यासाठी सज्ज शहर उभारण्याचा आमचा संकल्प आहे. मुंबई 3.0 हे देशातील नियोजनबद्ध शहरी विकासासाठी नवा आदर्श निर्माण करणारे मॉडेल सिटी म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.”(Mumbai 3.0 Master Plan)
 
एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी
 
“मुंबई 3.0 हे मुंबई महानगर प्रदेशासाठी नवे जागतिक विकास केंद्र म्हणून उभारण्याची संकल्पना आहे. सुरबाना ज्युरोंगच्या माध्यमातून जागतिक दर्जाची नियोजन तज्ज्ञता आणली आहे. यासोबतच आमचे नाविन्यपूर्ण आणि लोककेंद्री जमीन धोरण महत्त्वाचे आहे. जमीनमालक केवळ जमीन देणारे न राहता विकास प्रक्रियेतील भागीदार आणि लाभार्थी बनतील.”(Mumbai 3.0 Master Plan)
 
सुरबाना ज्युरोंगची जागतिक पार्श्वभूमी
 
सुरबाना ज्युरोंगची मुळे सिंगापूरच्या शहरी परिवर्तनाशी जोडलेली आहेत. संस्थेच्या पूर्वसुरी संस्था Housing & Development Board (HDB) आणि Jurong Town Corporation (JTC) यांच्या तांत्रिक सेवांशी तिचा वारसा संबंधित आहे.(Mumbai 3.0 Master Plan)
 
सिंगापूरमधील मोठ्या प्रमाणावरील गृहनिर्माण, नव्या टाउनशिपचे नियोजन आणि औद्योगिक विकासाचा अनुभव या संस्थेला आहे. आज सुरबाना ज्युरोंग ही सिंगापूर सरकारची गुंतवणूक कंपनी असलेल्या Temasekच्या 100 टक्के मालकीची कंपनी आहे.(Mumbai 3.0 Master Plan)
 
संस्थेकडे 70 वर्षांहून अधिक विकासाचा अनुभव, जगभरात सुमारे 16,000 तज्ज्ञ व व्यावसायिक 40 हून अधिक देशांमध्ये 120 पेक्षा अधिक कार्यालये आणि सिंगापूरमध्ये 10 लाखांहून अधिक घरांच्या नियोजनाचा अनुभव आहे.(Mumbai 3.0 Master Plan)
मुंबई 3.0 साठी सिंगापूरच्या शहरी विकासाचा अनुभव, जागतिक मास्टर प्लॅनिंग तज्ज्ञता आणि महाराष्ट्राच्या स्थानिक गरजा यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.(Mumbai 3.0 Master Plan)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर