मुंबई : (Motilal Nagar Redevelopment) गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर क्रमांक १, २ आणि ३ या म्हाडा वसाहतींच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाला तातडीने गती देण्याची मागणी मोतीलाल नगर जनकल्याणकारी समिती, मोतीलाल नगर रहिवासी विकास संघ आणि मोतीलाल नगर पुनर्विकास समन्वय समिती यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. पुनर्विकास हा केवळ बांधकामाचा विषय नसून हजारो कुटुंबांच्या सुरक्षित आणि सन्माननीय जीवनाशी संबंधित असल्याचे समित्यांनी स्पष्ट केले.
समित्यांनी सांगितले की, मोतीलाल नगर ही म्हाडाची अधिकृत वसाहत असून पुनर्विकास प्रक्रिया पूर्णपणे म्हाडाच्या देखरेखीखाली सुरू आहे. अदानी समूह हा केवळ विकासक असून सर्व निर्णय आणि अंमलबजावणी म्हाडाच्या नियमांनुसार होत आहे. डीसीपीआर-२०३४ मधील नियम ३३(५) अंतर्गत हा विशेष क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प असून मुंबई उच्च न्यायालयाने १७ ऑक्टोबर २०२४ आणि ६ मार्च २०२५ रोजी दिलेल्या आदेशांमधून प्रकल्पाच्या अंमलबजावणीत आवश्यक कायदेशीर स्पष्टता मिळाल्याचा दावा समित्यांनी केला.(Motilal Nagar Redevelopment)
समित्यांच्या म्हणण्यानुसार, म्हाडा आणि विकासकाशी सातत्याने केलेल्या चर्चेमुळे पात्र रहिवाशांसाठी १६०० चौरस फूट बिल्ट-अप क्षेत्राचे १६०० चौरस फूट कार्पेट क्षेत्रात रूपांतर करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सर्व पात्र रहिवाशांना मोठा लाभ होणार असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अन्य काही महत्त्वाच्या मागण्यांवरही सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे समित्यांनी सांगितले.(Motilal Nagar Redevelopment)
पत्रकार परिषदेत काही मोजक्या व्यक्तींवर पुनर्विकासाबाबत अफवा पसरवून रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आरोप करण्यात आला. अशा प्रकारे विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही समित्यांनी केली.
रहिवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता म्हाडा, शासन आणि समित्यांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवून पुनर्विकास प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी श्रीमती माधवी राणे, अध्यक्षा, मोतीलाल नगर जनकल्याणकारी समिती, मल्हारी भिसे, अध्यक्ष, मोतीलाल नगर रहिवासी विकास संघ आणि संतोष परब, सरचिटणीस, मोतीलाल नगर पुनर्विकास समन्वय समिती उपस्थित होते.(Motilal Nagar Redevelopment)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.