मी ‘जेन-झी’ स्वयंसेवक!

    07-Aug-2026

RSS and Gen Z
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ‘जेन-झी’ हे दोन शब्द एकाच वाक्यात आले की, अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. काहींना हे दोन टोकांचे प्रवाह वाटतात. एकीकडे शंभर वर्षांची परंपरा लाभलेली संघटना आणि दुसरीकडे इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सोशल मीडिया आणि डिजिटल संस्कृतीत वाढलेली नवीन पिढी. परंतु, माझ्यासाठी या दोन गोष्टी परस्परविरोधी नाहीत, तर एकमेकांना पूरक आहेत. कारण, मी स्वतः ‘जेन-झी’ स्वयंसेवक आहे आणि त्याचा मला मनापासून अभिमान आहे. काल मुंबईत सरसंघचालकांच्या ‘जेन-झी’शी संपन्न झालेल्या संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्दबद्ध केलेले हे मनोगत...

‘जेन-झी’ म्हणजे १९९७ ते २०१२ या कालावधीत जन्मलेली पिढी. तिच्या आधी ‘मिलेनिअल्स’, ‘जेन-एक्स’, ‘बेबी बूमर्स’ आणि ‘सायलेंट जनरेशन’ अशा पिढ्या होऊन गेल्या. प्रत्येक पिढीने आपल्या काळातील आव्हाने स्वीकारली आणि त्या-त्या काळानुसार राष्ट्रनिर्मितीत योगदानही दिले. मात्र, ‘जेन-झी’चे वैशिष्ट्य वेगळे आहे. ही पिढी माहितीच्या अभावात नव्हे, तर माहितीच्या महापुरात वाढली आहे. एका क्लिकवर संपूर्ण जग तिच्यासमोर उभे राहते. त्यामुळे ती कोणतीही गोष्ट केवळ ऐकून स्वीकारत नाही; ती शोधते, पडताळते, तुलना करते, विश्लेषण करते आणि मग स्वतःचे मत तयार करते. म्हणूनच, आज भारताच्या भविष्याचा विचार करताना सर्वांत महत्त्वाचा प्रश्न अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान किंवा राजकारणाचा नाही; तर ‘जेन-झी’च्या दिशेचा आहे. कारण, २०४७चा ‘विकसित भारत’ घडवणारे हात आज शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये बसलेले आहेत. उद्याचे न्यायाधीश, वैज्ञानिक, सैनिक, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक आणि लोकप्रतिनिधी हे याच पिढीतून घडणार आहेत. त्यामुळे ‘जेन-झी’ला समजून घेणे हा पर्याय नाही; ती राष्ट्रीय गरज आहे.
 
याच जाणिवेतून मी ‘थश ढहश ॠशपन‘ या उपक्रमाचे आयोजन केले. नानी पालखीवाला यांच्या ‘थश ींहश झशेश्रिश’ या पुस्तकातून प्रेरणा घेत भारतीय लोकशाहीच्या चार महत्त्वाच्या स्तंभांचा न्यायपालिका, विधिमंडळ, कार्यपालिका आणि माध्यमे यांचा थेट संवाद ‘जेन-झी’ सोबत घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी, माजी खासदार पूनम महाजन, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि शिक्षणतज्ज्ञ सुमन मेहता यांसारख्या मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. उद्देश एकच होता, आजच्या तरुणांनी लोकशाही ही केवळ पाठ्यपुस्तकातील संकल्पना म्हणून नव्हे, तर स्वतःच्या जबाबदारीचा भाग म्हणून समजून घ्यावी.
 
आज आपण अनेकदा म्हणतो की, ‘आजची पिढी बदलली आहे.’ पण, खरा प्रश्न असा आहे की, आपण तिच्याशी संवाद साधण्याची पद्धत बदलली आहे का? आजचा एक साधा प्रश्न विचारूया, ‘राष्ट्र म्हणजे नेमके काय?’ केवळ सीमारेषा, नकाशा आणि भूभाग म्हणजे राष्ट्र का? माझ्या मते, राष्ट्र म्हणजे आपल्या संस्कृतीची सातत्यपूर्ण परंपरा, आपल्या इतिहासाची सामूहिक स्मृती, आपल्या मूल्यांची जपणूक आणि विविधतेतून निर्माण झालेली एकात्मतेची भावना. परंतु, हे उत्तर आजच्या ‘जेन-झी’ला अंतिम सत्य म्हणून मान्य होणार नाही. तो लगेच विचारेल, "का?, कसे?, याचा पुरावा काय?” आणि हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणून, आजच्या तरुणांना फक्त उत्तर देऊ नका; त्यांना शोधायला शिकवा. त्यांना सांगा, ‘गुगल’वर शोध, ‘चॅटजीपीटी’ला विचार, विविध लेखकांची पुस्तके वाच, भिन्न विचार ऐक आणि मग स्वतःचे मत तयार कर! कारण, विचारांवर बंदी घालून विचार बदलत नाहीत, उलट मुक्त संवादातून विचार अधिक परिपक्व होतात. दत्तोपंत ठेंगडी यांनी सांगितलेला एक प्रसंग याच संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे. जनसंघाच्या सुरुवातीच्या काळात पक्षावर स्पष्ट आर्थिक धोरण नसल्याची टीका होत असे. त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे आर्थिक धोरणावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. व्याख्यान अत्यंत अभ्यासपूर्ण होते. त्यानंतर काही कार्यकर्ते म्हणाले, "आम्हाला अर्थशास्त्र समजले नाही; पण आमच्या नेत्याकडे आर्थिक विचार आहे, हे समजले आणि तेवढेच आमच्यासाठी पुरेसे आहे.”
 
आजचा ‘जेन-झी’ मात्र तिथे थांबत नाही. तो प्रत्येक संकल्पना समजून घेतो, आकडे तपासतो, पर्यायी मते वाचतो आणि मग प्रश्न विचारतो. त्यामुळे त्याचे प्रश्न ही समस्या नसून, त्याच्या बौद्धिक प्रामाणिकतेची साक्ष आहेत. प्रश्न विचारणारी पिढी ही विचार करणारी पिढी असते आणि विचार करणारी पिढीच मजबूत राष्ट्र घडवू शकते.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल अनेक गैरसमज समाजात पसरवले जातात. त्यांपैकी एक म्हणजे, संघामध्ये महिलांना स्थान नाही. प्रत्यक्षात ‘राष्ट्र सेविका समिति’, ‘दुर्गा वाहिनी’ आणि विविध सामाजिक प्रकल्पांमधून हजारो महिला राष्ट्रकार्यात योगदान देत आहेत. मात्र, आजच्या ‘जेन-झी’पर्यंत हे पोहोचवताना त्यांची भाषा समजून घेणे आवश्यक आहे. आज सोशल मीडियावर ‘इरववळश’ (बॅडी) हा शब्द आत्मविश्वासपूर्ण, स्वावलंबी आणि स्वतःच्या अटींवर जगणार्‍या महिलेसाठी वापरला जातो. मग आपल्या इतिहासात आणि वर्तमानात अशा कितीतरी प्रेरणादायी महिला आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई ही केवळ इतिहासातील वीरांगना नाही; ती आजच्या भाषेत खरी ‘बॅडी’ होती.
 
‘बॅडी १’- कर्जतमधील ठमाताई पवार यांचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. शिक्षणाची संधी मिळाली नाही. त्या सामाजिक कार्यासाठी आयुष्य वाहिलेल्या कुमठे डॉक्टरांच्या प्रकल्पात भाकरी बनवण्याचे काम करत असत. अनेकांसाठी त्या केवळ स्वयंपाक करणार्‍या महिला होत्या. परंतु, समाजकार्याचा प्रत्यक्ष अनुभव, लोकांशी असलेला संवाद आणि सेवा हीच खरी साधना मानणार्‍या वातावरणाने त्यांच्यातील नेतृत्वगुण जागवले. कालांतराने त्याच ठमाताई पवार आदिवासी समाजाच्या प्रभावी नेत्या म्हणून उभ्या राहिल्या. आज त्यांच्या कार्याचा उल्लेख आदराने केला जातो. ‘बॅडी २’ - डॉ. सुवर्णा रावळ, ‘बॅडी ३’ - चंद्रिका चव्हाण, ‘बॅडी ४’ - भारतबाई देवकर; ‘बॅडी ५’ - रेखा चव्हाण यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. तीन भावंडांसह त्यांना यमगरवाडी प्रकल्पात आश्रय मिळाला. तिथे त्यांना केवळ निवारा मिळाला नाही, तर शिक्षण, संस्कार आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधीही मिळाली. आज रेखा सावंत मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे एक बंधू डॉक्टर झाले आहेत, दुसरे तांत्रिक शिक्षण घेत आहेत आणि बहीणही परिचारिका म्हणून समाजसेवा करत आहे. ही केवळ एका मुलीच्या यशाची कथा नाही; योग्य संधी, संस्कार आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्य एखाद्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य कसे बदलू शकते, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे. कारण, संघ महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल केवळ बोलत नाही; तो प्रत्यक्ष कृतीतून ते घडवतो.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी पूर्ण होत असताना, या संस्थेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य मला जाणवते, ते म्हणजे व्यक्ती घडवण्याची प्रक्रिया. संघ फक्त विचार मांडत नाही; तो व्यक्तिमत्त्व घडवतो. शिशूपासून प्रौढापर्यंत प्रत्येक वयोगटात शिस्त, चारित्र्य, राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता आणि निःस्वार्थ सेवा यांचे संस्कार घडवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. भारतात अशी सातत्यपूर्ण आणि व्यापक कार्यपद्धती असलेली दुसरी संघटना शोधणे कठीण आहे. आज सोशल मीडियाच्या युगात अनेकांना वाटते की, तरुण फक्त मोबाईलमध्ये अडकले आहेत; पण माझ्या मते, मोबाईल ही समस्या नाही; त्याचा वापर कसा होतो, हा खरा प्रश्न आहे. आजचे तरुण पुस्तकांपेक्षा स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात, हे वास्तव आहे. मग त्यांना पुस्तकांच्या भाषेत समजावण्यापेक्षा त्यांच्या डिजिटल भाषेत संवाद साधणे अधिक परिणामकारक ठरेल. एखाद्या पालकाने मुलाला ‘मोबाईल बाजूला ठेव’ असे सांगण्यापेक्षा ‘डॉ. हेडगेवारांवर एखादा चांगला व्हिडिओ शोध’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांवरील माहितीपट पाहा’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरचा पॉडकास्ट ऐक’ असे सांगितले; तर त्याच्या डिजिटलजगातही सकारात्मक बदल घडू शकतो. आज ‘अल्गोरिदम’ आपले विचारविश्व घडवत आहेत. त्यामुळे योग्य विषयांचा शोध हा योग्य विचारांच्या प्रवासाची सुरुवात ठरू शकतो.
 
आपण अनेकदा म्हणतो की, आधुनिक समस्यांसाठी आधुनिक उपाय हवेत. त्यात तंत्रज्ञानाला विरोध करून उपयोग नाही; त्याचा राष्ट्रहितासाठी वापर करणे अधिक आवश्यक आहे. संवादाचे माध्यम बदलले आहे; परंतु संवादाचे उद्दिष्ट बदललेले नाही. आज भारताला बुद्धिमान तरुणांची कमतरता नाही. कमतरता आहे ती- योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि राष्ट्रीय ध्येयाशी जोडणार्‍या प्रेरणेची! ही जबाबदारी केवळ संघाची नाही; तर प्रत्येक पालक, शिक्षक, प्राध्यापक आणि सजग नागरिकाची आहे. मी स्वयंसेवक म्हणून शाखेत उभा राहतो, तेव्हा माझ्यासमोर केवळ वर्तमान भारत नसतो; माझ्या डोळ्यांसमोर २०४७चा विकसित, आत्मनिर्भर, सांस्कृतिकदृष्ट्या जागृत आणि जगाचे नेतृत्व करणारा भारत उभा असतो. त्या भारताचा शिल्पकार माझीच पिढी असणार आहे. म्हणून, मी स्वतःला केवळ ‘जेन-झी’ म्हणत नाही; मी अभिमानाने म्हणतो, ‘मी ‘जेन-झी’ स्वयंसेवक आहे.’
 
आजची ‘जेन-झी’ ही समस्या नाही, ती भारताची सर्वांत मोठी संधी आहे. तिच्या हातात कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, तंत्रज्ञान आहे, जागतिक दृष्टी आहे आणि अमर्याद ऊर्जा आहे. या ऊर्जेला राष्ट्रहिताची दिशा मिळाली, तर ‘विकसित भारता’चे स्वप्न दूर नाही. प्रश्न एवढाच आहे की, या पिढीवर टीका करण्यात आपण वेळ घालवणार आहोत की, तिच्यासोबत चालत तिला योग्य दिशा देणार आहोत? कारण, आजची शाखा, आजचा संवाद आणि आजचा संस्कारच उद्याच्या भारताचे नेतृत्व घडवणार आहे आणि म्हणूनच, प्रत्येक वेळी स्वतःची ओळख सांगताना मी अभिमानाने एकच वाक्य उच्चारतो, "मी ‘जेन-झी’ स्वयंसेवक आहे!”

(लेखक आंतरराष्ट्रीय संबंध व सामरिक अध्ययन विभाग, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत.)
-विवेकानंद इंगळे




संबंधित मजकूर