म्हाडाच्या मुंबईतील २,६४० घरांची संगणकीय सोडत संपन्न

७५ हजारांहून अधिक अर्ज, विकासकांवर कठोर कारवाईचे लोढा यांचे निर्देश

MHADA Mumbai Lottery 2026
 
मुंबई : (MHADA Lottery) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांची संगणकीय सोडत गुरुवार, दि.६ रोजी वांद्रे (पश्चिम) येथील रंगशारदा सभागृहात पार पडली. या सोडतीला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून ७५,१२७ अर्ज प्राप्त झाले. म्हणजेच प्रत्येक सदनिकेसाठी सरासरी २८.५४ अर्ज दाखल झाल्याने परवडणाऱ्या घरांसाठीची वाढती मागणी पुन्हा अधोरेखित झाली.
 
या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (MHADA Lottery)
 
यावेळी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हाडासाठी राखीव असलेली घरे हस्तांतरित करण्यास टाळाटाळ करणाऱ्या विकासकांवर कठोर भूमिका घेतली. विकास नियंत्रण नियमावलीनुसार अतिरिक्त विकास अधिकारांचा लाभ घेणाऱ्या विकासकांनी म्हाडासाठी राखीव घरे प्राधिकरणाच्या ताब्यात देणे बंधनकारक असताना अनेक प्रकरणांत ती वर्षानुवर्षे रखडत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. "केवळ एफआयआर करून थांबू नका. गरज पडल्यास संबंधित विकासकांना कारागृहात पाठवा. एक-दोन विकासकांवर कठोर कारवाई झाली, तर इतरही नियमांचे पालन करतील आणि म्हाडासाठी राखीव असलेली किमान एक हजार घरे तातडीने उपलब्ध होतील," असे त्यांनी स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले. (MHADA Lottery)
 
लोढा यांनी यावेळी म्हाडामध्ये नागरिक आणि प्रशासनातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समित्या स्थापन करण्याची सूचनाही केली. स्थानिक लोकप्रतिनिधी, वास्तुविशारद, गृहनिर्माण तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा या समित्यांमध्ये समावेश करून स्थानिक स्तरावरील समस्या वेगाने सोडविता येतील, असे ते म्हणाले. (MHADA Lottery)
 
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत राज्यभरात सुमारे ५० हजार घरे संगणकीय सोडतीद्वारे वितरित करण्यात आली आहेत. मुंबई महानगर प्रदेशात पुढील काळात ७.५ लाख घरनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून क्लस्टर पुनर्विकास, भाडे तत्त्वावरील घरे, वर्किंग वुमेन्स हॉस्टेल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी निवास अशा नव्या संकल्पनांवर भर दिला जात आहे. (MHADA Lottery)
 
गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी म्हाडाच्या संगणकीय सोडत प्रक्रियेतील पारदर्शकतेचे कौतुक करत, सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. महापौर रितू तावडे यांनीही बीडीडी चाळ पुनर्विकासासह विविध गृहनिर्माण प्रकल्पांचा उल्लेख करत मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. (MHADA Lottery)
 
यंदाच्या सोडतीत विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, घाटकोपर, वांद्रे, दादर, वडाळा, पवई, माझगाव, गिरगाव, अँटॉप हिल आदी भागांतील अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठीच्या सदनिकांचा समावेश होता. संगणकीय आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या सोडतीचा निकाल तत्काळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. (MHADA Lottery)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर