मुंबई : (Karanja Fishing Port Development) रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा मत्स्य बंदर विकास प्रकल्प अत्याधुनिक सुविधांसह पूर्ण करण्यासाठी अनुभवी तंत्रज्ञ आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या प्रकल्पामुळे वार्षिक ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता निर्माण होणार असून सुमारे ६,६०० मच्छीमारांना थेट लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत करंजा मत्स्य बंदराच्या विकासाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Karanja Fishing Port Development)
करंजा मत्स्य बंदराचा विकास ५.२३ हेक्टर क्षेत्रावर करण्यात येत असून पहिल्या टप्प्यासाठी १४९ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली होती. या टप्प्यातील बहुतांश कामे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) पूर्ण केली असून, आतापर्यंत १३६.३९ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या निधीत राज्य शासनासह केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून आर्थिक योगदान देण्यात आले आहे. मंजूर २४ कामांपैकी १३ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. (Karanja Fishing Port Development)
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर करंजा मत्स्य बंदरावर मच्छीमारांसाठी आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये अतिरिक्त क्वे वॉल, प्रवेश जलमार्गाचे रुंदीकरण, बोट पार्किंग, चार आधुनिक मासळी लिलाव हॉल, मत्स्य प्रशासन कार्यालय, फिशिंग गिअर शेड, जाळी दुरुस्ती केंद्र, मच्छीमार विश्रांतीगृह, रेस्टॉरंट, रेडिओ कम्युनिकेशन स्टेशन, गार्ड हाऊस आणि सुशोभीकरण यांचा समावेश आहे. तसेच बंदर परिसरात काँक्रीट पृष्ठभाग विकसित करून माल हाताळणी आणि वाहतुकीची सुविधा अधिक कार्यक्षम केली जाणार आहे. (Karanja Fishing Port Development)
दरम्यान, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १५१.२९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात आवश्यक सुधारणा करून तो पुनर्सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३७० रनिंग मीटर अतिरिक्त क्वे वॉल, बोट पार्किंगची वाढीव क्षमता आणि इतर आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. (Karanja Fishing Port Development)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, करंजा मत्स्य बंदराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नसून राज्यातील मत्स्य व्यवसायाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. आधुनिक सुविधांमुळे मासळीची साठवणूक, लिलाव आणि वाहतूक अधिक सुलभ होईल, मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. (Karanja Fishing Port Development)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.