'राँग साइड' वाहने चालवणाऱ्यांना दणका..

ठाणे वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई... Thane

    07-Aug-2026
 
Thane 2
 
ठाणे : (Thane)  वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने म्हणजेच 'राँग साइड'ने वाहन चालवणाऱ्यांविरोधात मुंब्रा वाहतूक विभाग आणि डायघर पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे धडाकेबाज कारवाई केली आहे. खिडकाळीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील कल्याण फाटा येथे अवघ्या तीन तासांत ३० वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मोटारगाड्या, दुचाकी तसेच एका महिला दुचाकीस्वाराचाही समावेश आहे. या कारवाईमुळे 'राँग साइड'ने वाहन चालवणे चांगलेच महागात पडले आहे.
 
मुंब्रा वाहतूक विभाग तसेच डायघर पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे सोमवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कल्याण फाटा येथे विशेष मोहीम राबवली. खिडकाळीहून कल्याण फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अनेक वाहनचालक वाहतूक नियमांना हरताळ फासत विरुद्ध दिशेने बेशिस्तपणे वाहने चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अपघाताचा धोका लक्षात घेऊन कारवाईया प्रकारामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित वाहनचालकांना ताब्यात घेतले. या कारवाईत मोटारगाड्या, दुचाकी तसेच एका महिला दुचाकीस्वाराचाही समावेश आहे. (Thane)
 
विशेष म्हणजे, केवळ दंड आकारण्यावर न थांबता धोकादायक पद्धतीने वाहन चालवून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी संबंधित चालकांविरोधात शीळ-डायघर पोलिस ठाण्यात थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंब्रा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांनी दिली. दरम्यान, या धडाकेबाज कारवाईमुळे राँग साइडने वाहने चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (Thane) 
 
वाहतूक पोलिसांचे आवाहन
 
"वाहतुकीचे नियम प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आहेत. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे धोकादायक असून त्यामुळे वाहतुक कोंडी तसेच अपघात होण्याचीही शक्यता असते. तरी, नागरिकांनी स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन विरुद्ध दिशेने वाहतूक करणे टाळावे व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे."
- पंकज शिरसाट, उप आयुक्त ठाणे वाहतूक विभाग
 
  




संबंधित मजकूर