मुंबई महानगरपालिका सभागृहातील ध्वनियंत्रणा बदलणार; माईक उचलाउचलीची कटकट थांबणार

पालिकेकडून १ कोटी १४ लाखांचा खर्च

    07-Aug-2026
 
BMC Hall
 
मुंबई : (BMC) मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहातील ध्वनी व्यवस्था आता अधिक सक्षम करण्यात येणार आहे. प्रत्येक नगरसेवकाच्या टेबलावर स्वतंत्र वायरलेस माईक बसविण्यात येणार असून, या कामासाठी सुमारे १ कोटी १४ लाख ८७ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यापासून होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीत ही नवी ध्वनी व्यवस्था कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
 
महापालिका मुख्यालयातील ऐतिहासिक सभागृहाचे सन २००२ मधील आगीनंतर नूतनीकरण करण्यात आले होते. त्यावेळी बसविण्यात आलेली ध्वनी यंत्रणा आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळे ती बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. फेब्रुवारी २०२६ मध्ये नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी सभागृहातील चर्चेदरम्यान आवाज स्पष्टपणे ऐकू येत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी ध्वनी व्यवस्था बदलण्यासाठी पाठपुरावा केला. यासंदर्भातील प्रस्ताव गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. (BMC) 
 
नवीन ध्वनी यंत्रणा बसविण्यासाठी सुरुवातीला काढण्यात आलेल्या निविदेनुसार वायर्ड माईकची व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, नगरसेवक, गटनेते, विरोधी पक्षनेते तसेच सभागृह नेत्यांनी वायरलेस माईकची मागणी केली. त्यानंतर प्रस्तावात बदल करण्यात आला. वायरलेस माईकची किंमत अधिक असल्याने सुरुवातीला सभागृहात केवळ १० ते १३ माईक बसविण्यात आले. परिणामी, २३७ नगरसेवकांना बैठकीदरम्यान एकमेकांकडून माईक घेऊन बोलावे लागत होते. (BMC)
 
या व्यवस्थेबाबत सातत्याने नाराजी व्यक्त होत असल्याने ध्वनी यंत्रणेची पुन्हा चाचपणी करण्यात आली. त्यानुसार विद्यमान प्रणालीमध्ये अतिरिक्त वायरलेस माईक आणि आवश्यक उपकरणांचा समावेश करून संपूर्ण सभागृहात प्रत्येक नगरसेवकासाठी स्वतंत्र माईक उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (BMC)
 
महापालिकेने यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून, एडीजेएम टेक्नॉलॉजिज प्रा. लि. ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीमार्फत सभागृहात अद्ययावत वायरलेस ध्वनी व्यवस्था बसविण्यात येणार आहे. (BMC)
  




संबंधित मजकूर