मुंबई : (Mumbai SRA) मुंबईतील अंतर्गत पीएपी फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५ कोटी ५७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तिघांवर भारतीय न्याय संहिताअंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये खासदार वर्षा गायकवाड यांचे स्वीय्य सहायक असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत वर्षा गायकवाड यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.
तक्रारदार आकाश राधेश्याम सोनी हे प्रॉपर्टी व्यवसायिक असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१७ मध्ये त्यांनी आणि त्यांचे भागीदार अँजेलो परेरा यांनी एसआरए पीएपी फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी आरोपींनी एसआरए कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे सांगून अंधेरी, वाकोला, कलिना, वांद्रे, कांदिवली आणि माटुंगा परिसरातील पीएपी फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी विविध बैठका घेऊन प्रत्येक फ्लॅटचे दर निश्चित करण्यात आले होते. (Mumbai SRA)
तक्रारीनुसार, या प्रकरणात शैलेश काकण, रुपेश बेळणेकर, अभिषेक गुजर आणि विश्वनाथ जाधव यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून तक्रारदारांनी ४७ ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. हे पैसे धनादेश आणि आरटीजीएसद्वारे आरोपी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. फ्लॅटचे अलॉटमेंट लेटर, ताबा पत्र आणि चाव्या देण्याचे वारंवार आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही फ्लॅट वाटप झाले नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. (Mumbai SRA)
एफआयआरनुसार, या व्यवहारात तक्रारदार व गुंतवणूकदारांचे एकूण ५,५७,५०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी बीएनएस कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, कथित व्यवहारांचा कालावधी १२ डिसेंबर २०१७ ते ३० जुलै २०२६ असा असून, तक्रारीनंतर दि.३१ जुलै २०२६ रोजी एफआयआर क्रमांक ०६५९ नोंदविण्यात आला. (Mumbai SRA)