धावत्या लोकलमध्ये स्टंट करणारा तरुण आरपीएफच्या जाळ्यात

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल, कळव्याच्या २२ वर्षीय तरुणाला दंडासह ताकीद

    07-Aug-2026
Kalwa stunt
 
ठाणे : (Central Railway) सोशल मीडियावर लाईक्स आणि रील्सच्या नादात जीवाशी खेळणाऱ्यांवर आता मध्य रेल्वे आरपीएफने कडक कारवाई सुरू केली आहे. धावत्या उपनगरीय लोकलमध्ये धोकादायक स्टंट करून स्वतःसह इतर प्रवाशांचा जीव धोक्यात आणणाऱ्या एका तरुणाला आरपीएफने ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले.
 
नेमकं काय घडलं ?
 
कळवा येथील रहिवासी मोहम्मद खुर्शीद (वय २२) याने २ ऑगस्ट २०२६ रोजी कळवा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वरून जाणाऱ्या धावत्या लोकलमध्ये स्टंट केला. या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करून त्याने तो व्हिडिओ थेट इन्स्टाग्रामवर अपलोड केला. व्हिडिओ व्हायरल होताच मध्य रेल्वे आरपीएफ पथकाने तातडीने हालचाली केल्या. (Central Railway)
 
आरपीएफच्या पथकाने कळवा-मुंब्रा परिसरात शोध मोहीम राबवून ४ ऑगस्ट रोजी कळवा पूर्व परिसरातून खुर्शीदला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने स्टंट केल्याची कबुली दिली. मुंब्रा आरपीएफ पोस्टवर त्याच्याविरुद्ध रेल्वे कायदा कलम १५४, १४५ आणि १५६ नुसार नोंद करण्यात आली. (Central Railway)
 
कोर्टाने ठोठावला दंड
 
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ३५(३) नुसार नोटीस बजावून त्याला बुधवारी कल्याण येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दंड ठोठावून भविष्यात अशी कृती न करण्याची ताकीद देऊन सोडून दिले. (Central Railway)
 
मध्य रेल्वेचा इशारा - "स्टंट नको, जीव महत्त्वाचा"
 
या घटनेनंतर मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, रील्सच्या नादात धावत्या गाड्या, फूटबोर्ड किंवा छतावर स्टंट करू नका. विजेचा धक्का, गाडीतून पडणे किंवा धडक यांसारखे जीवघेणे अपघात होऊ शकतात. अशा कृती केवळ गुन्हा नसून इतरांनाही त्याचे अनुकरण करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे अशा व्हिडिओ आणि व्यक्तींवर आरपीएफची करडी नजर असल्याचं मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. (Central Railway)
 
 




संबंधित मजकूर