पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत

    07-Aug-2026
Bavankule
 
नागपूर : (Nagpur) महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा पूर्ण करण्यात आला असून एनडीआरएफच्या निकषांनुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली.
 
नागपूरमधील पूरस्थितीबाबत बोलताना श्री. बावनकुळे म्हणाले की, महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या निकषांनुसार नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असून या संदर्भात आपण स्वतःही आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. (Nagpur)
 
दोषींवर कठोर कारवाई
 
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. (Nagpur)
 
सर्व समाजांना समान निकषांवर न्याय
 
मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, जात वैधता समिती ही स्वतंत्र संस्था असून हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील आहे. मुख्यमंत्री, आमदार किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. एक टक्क्यांपेक्षा कमी अर्ज नाकारण्यात आले असून सुमारे ९९ टक्के प्रकरणांमध्ये वैधता प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. सर्व समाजांना समान निकषांवर न्याय दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Nagpur)
 
 
 
पक्षाचा अंतर्गत विषय
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय सल्लागार किशोर प्रशांत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी तो संबंधित पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगितले. महायुतीमध्ये परस्परांबाबत एक आचारसंहिता असून कोणत्याही घटक पक्षाला हानी पोहोचणार नाही, याची सर्व नेते काळजी घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. (Nagpur)
 
लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी अशा प्रकारची भाषा अयोग्य असल्याचे सांगितले. प्रसाद लाड यांनी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये समन्वय राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगत त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, असे आवाहन त्यांनी केले. (Nagpur)
 
प्रस्तावांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल
 
मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबाबत ते म्हणाले की, संबंधित विषयावर मंत्रिमंडळाच्या उपसमितीत चर्चा होईल आणि सरकारसमोर येणाऱ्या प्रस्तावांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल. राज ठाकरे यांनी बीएलओ नियुक्तीबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना बीएलओ म्हणून पुढे करावे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला अधिक बळ मिळेल आणि शासनालाही मदत होईल. (Nagpur)
 




संबंधित मजकूर