ठाणे : (Ambarnath) अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या महत्त्वाच्या उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा संयम सुटू लागला असून, या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी अत्यंत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी पीपीई किट परिधान करून उड्डाणपुलावरील खड्ड्यांमध्ये 'मूनवॉक' करत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर उपरोधिक प्रहार केला.
अंबरनाथ शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या या उड्डाणपुलावर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांची तीव्रता आणखी वाढली असून, दररोज हजारो वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा मोठा फटका बसत असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनांची गती मंदावते आणि परिणामी पुलावर वाहतुकीची कोंडीही नियमितपणे होत आहे. (Ambarnath)
या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलावर पीपीई किट घालून खड्ड्यांमध्ये 'मूनवॉक' करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. "उड्डाणपुलावरील खड्डे पाहिल्यानंतर आपण चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत असल्याचा भास होतो. त्यामुळेच 'मूनवॉक' करून आम्ही पालिकेचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न केला," अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली. (Ambarnath)
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत उड्डाणपुलावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली. अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, या अनोख्या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा रंगली असून, उड्डाणपुलावरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडूनही जोर धरू लागली आहे. (Ambarnath)