सायबर गुलामीचे जाळे

    07-Aug-2026   

cyber slavery
 
 
चिनी शेफ, फिजिओथेरपिस्ट, ड्रायव्हर आणि एका व्हिएतनामी तरुणीला सोबत घेऊन हाओ पॉन श्रीलंकेमध्ये आला. त्यांना तो महिन्याला प्रत्येकी तीन हजार रुपये डॉलर्स पगार द्यायचा. पण, काही दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाले आणि काही तासांनंतर त्याचा मृतदेह डोळे बांधलेल्या अवस्थेत ६० किलोमीटर दूर एहेलियागोडा येथे सापडला. त्याच्या मृत्यूच्या चौकशीत समजले की, तो चिनी आंतरराष्ट्रीय सायबर माफियाचा मोठा म्होरक्या होता. पण, त्याचा खून कोणी आणि का केला? त्याच्या खुनाच्या उलगड्याने आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांचे विश्व आणि चिन्यांचे वर्चस्व जगासमोर उघडे पडले. चिनी सायबर ठगांनी सध्या श्रीलंकेला आश्रयस्थळ बनवले आहे. यांचे मुख्य केंद्र अर्थातच चीनमध्येच! तर, हाओ पॉनसुद्धा या आंतरराष्ट्रीय चिनी ‘सायबर क्राईम सिंडिकेट’चा मुख्य सदस्य होता.
 
रिसॉर्ट आणि ब्युटीपार्लरच्या नावाने कंपनी उघडून चिनी सायबर हॅकर्सच्या मदतीने त्याने अनेक लोकांना जाळ्यात ओढले. करोडोंची माया जमवली. मात्र, हाओ पॉनने सहयोगी चिनी हॅकर्सना आणि चिनी सायबर गुन्हेगारांना फसवणुकीतून मिळालेल्या संपत्तीचा हिस्सा दिला नाही. ऐशआरामात राहता येईल, इतकी रक्कम घेऊन उरलेली संपत्ती त्याने कंबोडियाच्या बँकेत ठेवली. कंबोडियामार्गे तो श्रीलंकेत आला. मात्र, चिनी सायबर गुन्हेगारांनी त्याला शोधूनच काढले. २२ जुलै रोजी त्यातल्या लोकांनी शस्त्राचा धाक दाखवत हाओ पॉनचे अपहरण केले. काही तासांनी हाओ पॉनचा मृतदेह सापडला. त्याचवेळी विमानतळावर श्रीलंकन पोलिसांनी काही लोकांना पकडले. त्यांची चौकशी केली. तेव्हा सत्य कळाले की, त्यांनीच हाओ पॉनचा खून केला होता. कारण, हाओ पॉनने आंतरराष्ट्रीय ‘सायबर क्राईम सिंडिकेट’ला फसवले होते. हाओ पॉनकडून त्यांना ते पैसे वसूल करायचे होते. कंबोडियातील बँकेचा तपशील हाओ पॉनच्या मोबाईलमध्ये होता, तो मोबाईल आणि त्याचा पासवर्ड त्यांनी हाओ पॉनकडून मागितला. मात्र, हाओ पॉनने सांगितले की, त्याचे अपहरण होत असताना मोबाईल कुठेतरी पडला. हाओ पॉनचे म्हणणे त्यांना खोटे वाटले आणि त्यांनी त्याला भरपूर मारहाण केली, त्यातच त्याचा मृत्यू झाला.
 
पुढे हाओ पॉनचा मोबाईल शोधण्यासाठी ते मारेकरी पुन्हा कोलंबो बंदराकडे आले. त्यांची शोधाशोध आणि संशयास्पद हालचाली पाहून कोलंबो बंदराच्या पोलिसांनी त्यांचे फोटो काढले. पुढे संशयास्पद म्हणून त्यांना विमानतळावरच पकडण्यात आले. यानंतर श्रीलंकन पोलिसांनी संशयित ठिकाणावर धाडी टाकल्या, तेव्हा त्यांना तिथे एक हजारांच्या वर परदेशी लोक सापडले. त्यांना तिथे सायबर गुन्हे करण्यासाठी अक्षरशः गुलाम म्हणून राबवण्यात येत होते.
 
या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच भारतातील २०० युवकांनाही श्रीलंकेमध्ये असेच पकडले होते. हे तरुण श्रीलंकेत असेच सायबर गुलाम म्हणून राबत होते. ते तिथे कसे पोहोचले, तर एक जाहिरात सर्वत्र प्रकाशित झाली. त्यामध्ये मजकूर होता, "श्रीलंकेमध्ये ‘आयटी’ क्षेत्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी. कॉल सेंटर आणि डेटा एन्ट्रीची मोठी नोकरी. महिन्याला १ ते दीड लाख रुपये पगार, राहणे-खाणे मोफत.” भारतातील शेकडो तरुणांनी या जाहिरातीला प्रतिसाद दिला. ते श्रीलंकेत गेले. मात्र, तिथे गेल्यावर संबंधित लोकांनी या भारतीय तरुणांचे पासपोर्ट काढून घेतले. त्यांना सायबर गुन्हेगारी करण्यास भाग पाडले. ज्यांनी नकार दिला, त्यांना मारहाण आणि विजेचे शॉक देण्यात आले. त्यांना पगार नव्हता की, पोटभर अन्न मिळत नव्हते. काही तास झोप आणि दिवसरात्र सायबर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना फसवणे हेच काम. त्यातून आलेले पैसे ती चिनी टोळी चीनला पाठवत असे.
 
एकंदर चिन्यांनी श्रीलंकेमध्ये सायबर गुन्हेगारीचे जाळे विणले आहे. श्रीलंकेमध्ये येण्यासाठी चिन्यांना सवलत असल्याने ते सहज श्रीलंकेमध्ये येतात. तिथून भारत, व्हिएतनाम आणि इतर देशांतील लेाकांना सायबरच्या माध्यमातून फसवतात. श्रीलंकेच्या जमिनीहून भारतीयांची आर्थिकता दुर्बळ करण्यासाठी चिन्यांचे हे कटकारस्थान! मात्र, श्रीलंकने या आंतरराष्ट्रीय ‘सायबर क्राईम सिंडिकेट’विरोधात लढा उभारला आहे.





योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर