अवघ्या विश्वाचे सुख चिंतणार्या संतपरंपरेत संत नामदेवांचे स्थान दीपस्तंभासारखेच! त्यांच्या विठ्ठलभक्तीचा अधिकार हा उच्च होता. या अधिकाराचेच चित्र त्यांच्या अभंगांतून प्रतिबिंबित होते. देवावर अधिकार असणे म्हणजे काय, याचे उत्तम उदाहारण म्हणजे नामदेवांचे अभंग. नामस्मरणाच्या सहज वाटेने त्यांनी अध्यात्म सर्वसामान्यांच्या दारी आणले. ते भक्तीचळवळीचे सर्वकालिक श्रेष्ठ अधिष्ठान झाले. आजही भारतात अनेक संप्रदायांमध्ये संत नामदेवांना गुरुस्थानी मानले जाते. अशा संत नामदेवांचा समाधी दिवस म्हणजे आषाढ वद्य त्रयोदशी. येत्या सोमवारी, दि. १० ऑगस्ट रोजीच्या संत नामदेव महाराज समाधी दिनानिमित्ताने, त्यांच्या चरित्रगाथेतील घटनांचा घेतलेला मागोवा...
आषाढी एकादशीला पंढरपूर नगरी वारकर्यांच्या गलबल्याने आणि चैतन्याने न्हाऊन निघते; परंतु त्रयोदशीला मात्र नकोशी वाटावी, अशीच शांतता पसरलेली असते. स्थानिक भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला जातात खरे, पण त्यांची पाऊले नामदेव पायरीपाशीच थबकतात. वारीच्या गर्दीत असे मोजकेच वारकरी असतात, ज्यांना या पायरीचे मोल माहीत आहे. स्थानिक वैष्णव मात्र अत्यंत श्रद्धेने ही पायरी चढण्यापूर्वी प्रथम नमस्कार करतात. संतश्रेष्ठ नामदेवांची ही पायरी. संत नामदेव यांच्या भक्तीचा अधिकार इतका मोठा, की साक्षात पांडुरंग त्यांच्या हातून जेवला होता!
मात्र, नामदेवांचा इथवरचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नाही. भक्तीचे बाळकडू तर संत नामदेवांना बालपणीच मिळाले होते. त्यांची भक्ती इतकी उत्कट होती, की त्यात उणेपण शोधूनही सापडले नसते. उणीव होती, ती त्यांच्या दृष्टिकोनात. त्यांचा विठ्ठल नितांत खरा होता, पण तो पंढरीच्या विटेपुरताच आणि गाभार्याच्या भिंतींपुरता मर्यादितच राहिला होता. जेव्हा भक्तीची दृष्टी अशी अरुंद राहते, तेव्हा त्याच भक्तीच्या गर्भातून नकळत अहंकाराचाच जन्म होतो. ‘माझा देव फक्त माझ्याशीच बोलतो, म्हणजेच मी इतरांहून काहीसा वेगळा आणि श्रेष्ठ आहे,’ ही सूक्ष्म जाणीव नामदेवांच्या मनात अलगद का होईना रुजली होतीच. हा अहंकार असा चटकन डोळ्यांत भरणारा नसतो; कारण त्याला साक्षात देवाचेच नाव दिलेले असते आणि तो टाळ-मृदंगाच्या गजरात, भजनाच्या सुरात इतका बेमालूम मिसळून जातो की, खुद्द भक्तालाही त्याची जाणीव होत नाही.
या अजाणत्या ‘मी’पणाची पाळेमुळेही त्यांच्या बालपणातच दडलेली दिसतात. दामाशेटी शिंपी जेव्हा बाहेरगावी निघाले, तेव्हा त्यांनी छोट्या नामदेवाकडे नैवेद्याचे ताट दिले आणि देवाला नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी सोपवली. इवलासा नामदेव ते ताट घेऊन गाभार्यात गेला, विठुरायासमोर उभा राहिला आणि देव जेवेल या भाबड्या आशेवर वाट पाहात बसला. जेव्हा लाकडा-दगडाचा देव घास घेईना, तेव्हा या बालभक्ताने हट्टच धरला; डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या आणि ‘तू जेवल्याशिवाय मी इथून हलणार नाही,’ असा निग्रह केला. त्या निरागस, अटीतटीच्या हट्टापुढे साक्षात ईश्वरालाही झुकावे लागले आणि त्याने तो नैवेद्य आनंदाने ग्रहण केला. पण या कथेचा पूर्वार्ध जितका गोड आहे, तितकाच तिचा उत्तरार्धही गहन आहे, जो अनेकदा अज्ञाताच्या पडद्याआड राहतो.
संत गोरोबाकाकांच्या तेर गावात एकदा भक्तीचा आणि ज्ञानाचा अनोखा मेळाच भरला होता. ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताई यांच्यासह चोखामेळा, सावता माळी, विसोबा खेचर आणि नामदेव अशी संत प्रभावळ तिथे जमली होती. संवादाच्या रसाळ प्रवाहात ज्ञानदेवांची धाकटी बहीण, मुक्ताईने एक अत्यंत मार्मिक कोटी केली. मडकी भाजल्यावर ती ठोकून पाहण्याची आणि आवाजावरून ती कच्ची की पक्की हे ओळखण्याची गोरोबांची हातोटी सर्वश्रुत होती. मुक्ताई हसून म्हणाली, "काका, इथे बसलेली ही सगळी मंडळीसुद्धा एका अर्थाने मडकीच आहेत; जरा पारखून पाहा ना कोण कच्चं आणि कोण पक्कं!” वयाने सर्वांत लहान असूनही, या अधिकारी संतांचे कच्चे-पक्केपण पारखण्याची भेदक नजर आणि त्याचा अधिकार मुक्ताईकडे होता!
गोरोबांनी आपले थापटणे हाती घेतले आणि एकेकाच्या मस्तकावर ठेवत ते पुढे सरकू लागले. नामदेवांपाशी आल्यावर त्यांचे हात क्षणभर थबकले आणि अत्यंत शांत, निर्विकार स्वरात ते म्हणाले, "हे मडकं मात्र अजून कच्चं आहे.” सभेत हसू पसरलं. नामदेवांना मात्र ते शब्द जिव्हारी लागले. ज्याच्या हातचा घास साक्षात विठ्ठल खातो, तो ‘कच्चा’ कसा असू शकतो? याच प्रश्नाचा आणि अपमानाचा अंगार उरी बाळगून ते ताडकन उठले. दुखावलेलं आणि सांत्वन शोधणारं मन साहजिकच आपल्या हक्काच्या विसाव्याकडे धाव घेतं. नामदेवांचीही पावलं आपसूकच थेट पंढरीच्या दिशेने वळली!
आपल्या लाडक्या विठुरायासमोर उभे राहून, त्यांनी अश्रूंवाटे आपले गार्हाणे मांडले. पण तिथे अंतरातून जे उत्तर उमटले, त्याने या ‘कच्चेपणाचे’ नेमके मर्मच उलगडून दाखवले. गोरोबा जे बोलले, "ते शतप्रतिशत खरे आहे नाम्या. तुला अद्याप गुरूचा अनुग्रह लाभलेला नाही आणि म्हणून मी तुला फक्त इथेच, या विटेवरच दिसतो. या गाभार्याबाहेर तू मला कधी पाहिलंच नाहीस, मग तू ‘पक्का’ कसा होणार?” गोरोबांच्या शब्दांचे मर्म उलगडताच, आपले कच्चेपण भक्तीतील उणिवेमुळे नसून केवळ ज्ञानाच्या अभावात दडले आहे, या जाणिवेनेच नामदेवांना त्यांची पुढची वाट दाखवली. ती वाट होती, औंढा नागनाथची. विसोबा खेचरांची.
परंतु, तिथे मंदिरात पोहोचल्यावर जे दृश्य दिसले, त्याने नामदेवांच्या संतापात पुन्हा भर घातली. एक म्हातारा माणूस साक्षात शिवपिंडीवर पाय ठेवून, अत्यंत निवांत पहुडला होता. संतापलेल्या नामदेवांनी त्याला कडक शब्दांत दटावले. त्या वृद्धाने शांतपणे डोळे उघडले, एक स्मितहास्य केले आणि म्हणाला, "बाबा रे, या वार्धयाने आता मला उठवतच नाही. तूच कर माझ्यावर उपकार, माझे हे पाय उचल आणि जिथे देव नसेल, तिथे नेऊन ठेव!” नामदेवांनी रागाने त्यांचे पाय उचलून बाजूला ठेवले, पण तिथेही जमिनीतून शिवपिंडी उगवली. जिकडे पाय ठेवावे, तिकडे ईश्वरी रूप प्रगट होऊ लागले! गोरोबांचे थापटणे केवळ मस्तकावरच पडले होते, पण विसोबांचे हे पाय मात्र नामदेवांच्या थेट काळजाला भिडले. देव केवळ विटेपुरता मर्यादित नाही आणि आपल्या नैवेद्याच्या ताटापुरता तर मुळीच नाही, हा साक्षात्कार त्यांना त्या क्षणी झाला. ईश्वर सर्वव्यापी आहे, तो कुणा एकाची खासगी मक्तेदारी असूच शकत नाही, या प्रखर जाणिवेच्या प्रकाशातच त्यांच्या भक्तीतला ‘माझा’ हा शब्द कायमचा गळून पडला. गुरुमुखातून प्राप्त झालेल्या त्या अथांग ज्ञानाने, त्यांची अपूर्ण भक्ती खर्या अर्थाने पूर्णत्वास गेली. पुढे नामदेवांनी भक्तीची ध्वजा भारतभर नेली.
त्यांच्या या प्रवासाची खर्या अर्थाने सांगता झाली, ती पुन्हा पंढरीतच. अज्ञानाकडून पूर्णत्वाकडे जाणार्या या प्रवासाचे अंतिम आणि सर्वांत सुंदर फळ म्हणजे, आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी पांडुरंगाकडे केलेली ती अनोखी मागणी. त्यांना आता गर्भगृहातली खास जागा नको होती की, मंदिराचा सुवर्णकळस नको होता. जिथे पंढरीत येणार्या प्रत्येक अज्ञात भक्ताचे पाय लागतील आणि विठुनामाचा गजर करणार्या वारकर्यांच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या मस्तकी बसेल, नेमकी तीच जागा मला हवी आहे, अशी आर्त साद त्यांनी घातली.अशी मागणी का? कारण एके काळी देवाजवळच्या खास जागेवर हक्क सांगणार्या नामदेवांना गुरूने शिकवले होते की, देव सर्वत्र आहे. जो सर्वत्र आहे, त्याच्यापासून ‘जवळ’ की ‘दूर’ हा हिशोबच खोटा ठरतो. गाभारा अधिकाराचे प्रतीक आहे आणि भक्तीत अधिकाराला नव्हे, तर लीनतेला महत्त्व असते. ईश्वर प्रत्येक वारकर्याच्या हृदयात वसलेला आहे. याच विशाल जाणिवेमुळे देवाच्या चरणांपेक्षा, त्या देवाकडे धाव घेणार्या भक्तांच्या पायाची धूळ नामदेवांना श्रेष्ठ वाटू लागली.
पंढरीत दरवर्षी रंगणार्या दिंड्यांच्या सोहळ्याचे खरे गमक आत्मपरीक्षणात आहे. आपली भक्ती केवळ मूर्ती, तीर्थ किंवा एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित तर राहिली नाही ना, हाच प्रश्न स्वतःला त्यावेळी विचारायचा असतो. भाव कितीही खरा असला, तरी चराचरांत आणि माणसांतही देव पाहणार्या सर्वसमावेशकतेचा ‘पैस’ त्याला मिळाला नाही, तर तिथे अहंकार पाय रोवतोच; नामदेवांचे कच्चेपण नेमके याच स्वरूपाचे होते. परंतु, उणीव निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी राग धरला नाही किंवा सारवासारवही केली नाही. उलट, नम्रपणे गुरूंचा शोध घेत ते औंढ्याला पोहोचले आणि इथेच त्यांचे खरे मोठेपण सिद्ध झाले. भक्ती कितीही उत्कट असली, तरी ‘ज्ञानाची भट्टी’ लागल्याशिवाय मडके पक्के होत नाही, हाच या कथेचा महान संदेश. महाद्वारातील ‘नामदेव पायरी’वर नतमस्तक होताना, आपणही नकळत पांडुरंगाकडे हीच भक्तीची नम्रता आणि ज्ञानाची दृष्टी मागत असतो.
- आसावरी पाटणकर