१,९१२ स्वयंसेवकांकडून ३७८ गावांतील ४०,१६८ पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

    06-Aug-2026   

RSS Assam Flood Relief
 
मुंबई (RSS Assam Flood Relief) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघप्रेरित विविध सेवा संस्थांचे स्वयंसेवक पूर्व आसाममधील पूरग्रस्त कुटुंबांसाठी बचाव व मदतकार्यात सक्रीय आहेत. शिवसागर, चराईदेव आणि जोरहाट या सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांतील हजारो कुटुंबे बेघर झाली असून त्यांच्यासमोर अन्न, स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षित निवारा आणि तातडीच्या वैद्यकीय सेवेचे गंभीर संकट उभे राहिले आहे. या अत्यंत बिकट परिस्थितीत संघाचे स्वयंसेवक आपत्तीग्रस्तांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. गेल्या अनेक आठवड्यांपासून १,९१२ स्वयंसेवक बचावकार्य, मदतवाटप, घरबांधणी आणि स्वच्छता मोहिमेत सातत्याने सहभागी आहेत. अलीकडील पुरामुळे प्रभावित झालेल्या शिवसागर, चराईदेव, जोरहाट आदी जिल्ह्यांतील ३७८ गावांमधील तब्बल ४०,१६८ कुटुंबांपर्यंत स्वयंसेवकांनी मदत पोहोचवली आहे. (RSS Assam Flood Relief)
 
शिवसागर जिल्ह्यातील बेटबारी परिसरातील काकती गाव, क्रमांक २ कोनवार गाव, नेपाळी खुती, बिहुबार आणि चेतिया कोईबर्ता या गावांतील सुमारे २०० नागरिकांना स्वयंसेवकांनी लहान बोटींच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले. तसेच सुंदर पुखुरी, बामुन पुखुरी, गेलेकी आणि राजाबारी येथील अडकलेल्या ग्रामस्थांना शिजवलेले अन्न, स्वच्छ पिण्याचे पाणी, जीवनावश्यक औषधे, कपडे आणि इतर अत्यावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. (RSS Assam Flood Relief)
 
जोरहाट जिल्ह्यातील एलेंगमोरा, कातीराम चुक, कुलई चुक, नालिया चुक, शेंचोवा चुक आणि चारिघोरिया चुक या भागांमध्येही मदतकार्य करण्यात आले. पूरग्रस्त कुटुंबांना तांदूळ, साखर, लापशी, सुका खाऊ, बालआहार, बिस्किटे, मीठ, स्वच्छ पिण्याचे पाणी, बटाटे, कपडे, अंथरूण-पांघरूण यांसह मेणबत्त्या, साबण, तुरटी, औषधे, डास प्रतिबंधक कॉइल्स आदी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. (RSS Assam Flood Relief)
 
दरम्यान, स्वयंसेवकांनी नॅशनल मेडिकोस ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने पूरग्रस्त भागात ५० हून अधिक वैद्यकीय शिबिरे आयोजित केली. पुराच्या पाण्याने अनेक गावकऱ्यांचे घरगुती साहित्य आणि उपजीविकेची साधने वाहून गेल्याने त्यांना सर्व प्रकारच्या आवश्यक वस्तूंची नितांत गरज निर्माण झाली आहे. (RSS Assam Flood Relief)
 
पूराच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्वयंसेवकांनी लहान बोटींच्या साहाय्याने अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना अन्न व पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. त्यानंतर वृद्ध, महिला, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. सध्या उत्तर आसाम प्रांतातील स्वयंसेवक विविध माध्यमांतून पूरग्रस्त कुटुंबांना मदत करत आहेत. त्यांनी वाचलेल्या जनावरांसाठी चारा व औषधांचीही व्यवस्था केली आहे. तसेच शेतकऱ्यांना पुन्हा शेती उभी करण्यासाठी भात लागवडीमध्ये प्रत्यक्ष श्रमदान करून मदत केली जात आहे. (RSS Assam Flood Relief)
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा भारती यांचे हे मानवतावादी कार्य संघाच्या सेवापरंपरेचे जिवंत उदाहरण आहे. संकटसमयी तत्परतेने धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीबद्दल समाजाकडून नेहमीच त्यांचे कौतुक केले जाते. नरसेवा हीच नारायण सेवा या तत्त्वाचा प्रत्यक्ष आचरण करत संघाचे स्वयंसेवकांनी आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या सेवेत पुन्हा एकदा आपली समाजनिष्ठा आणि सेवाभाव सिद्ध केला आहे. (RSS Assam Flood Relief)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर