एक चेहरे पे कई चेहरे...

    06-Aug-2026   
 
Rahul Gandhi Student Outreach
 
 
सापडला... सापडला... ममा, मला ‘नेता’ बनून सगळीकडे झळकायचा मुद्दा सापडला. ‘छात्रों की गुंज’ नावाचा मी कार्यक्रम घेत आहे. मी म्हणजे, आपले उरलेसुरले काँग्रेस पदाधिकारी-नेते तो कार्यक्रम घेणार आहेत. विद्यार्थी जमणार आहेत प्रयागराजला! मी त्यांच्याशी संवाद साधणार. ममा, हे बघ ‘कॉकरोच’चे स्पेलिंग ‘सी’ अक्षरावरून सुरू होते आणि आपल्या काँग्रेसचे स्पेलिंग? तेपण ‘सी’ अक्षरावरूनच स्टार्ट होते. जनतेलाही माहिती आहे, ‘सी फॉर काँग्रेस’ आणि ‘सी फॉर कॉकरोच’ ‘सी’ फॉर... नको-नको... ‘जेन-झी’च नाही, तर त्यांचे आजोबा-पणजोबा पण ‘सी फॉर’ म्हणत शिवीगाळ करतील. काय म्हणता? मी विद्यार्थ्यांशी काय बोलणार? काय म्हणजे, मी राजकुमार आहे, पिढ्यान्पिढ्या सत्तेत राहायची सवय आहे. मनमोहन अंकल पंतप्रधानपदी असताना मी त्यांच्या आदेशाचा कागद टराटरा फाडला होता. माझ्याकडे जन्मजात ‘पॉवर’ आहे. ममा, हे कोण म्हणाले की, माझ्याकडे ‘सुपर पॉवर’ आहे, अगदी हास्यजत्रेतल्या त्या दत्तूसारखी! असू दे, तर मी सांगत होतो की, विद्यार्थ्यांशी मला काय बोलायचे आहे, ते तर आधीच ठरले.
 
जसे- ‘संविधान खतरे में हैं’, देशात हुकूमशाही आहे, नरेंद्र मोदी, भाजप आणि रा. स्व. संघ यांच्यावर टीका करायची. अगडा-पिछडा समाज करत, समाजामध्ये भेद कसा करता येईल त्यावर बोलायचे. ‘देखो भैया...‘ माझी वर्षानुवर्षाची ‘स्क्रिप्ट’ रेडी आहे. काय म्हणता, या विद्यार्थ्यांना ‘आलू’पासून ‘सोना’ बनवण्यासारख्या दुसर्‍या भन्नाट आयडिया मी देणार आहे की नाही? हे बघा, तुम्ही विनोद करू नका. आजही सगळ्या मीडियामध्ये ही आयडिया चर्चेत आहे. काय म्हणता, लोक विनोद करत होते? असू दे, मी असाच भोळाभाबडा आहे. काय म्हणता? मी भोळा आहे तर परदेशात जाऊन देशाची बदनामी का करतो? समाजात भेद होईल अशी विधाने का करतो? देश अस्थिर करणार्‍यांचे समर्थन का करतो? नेहमी सत्ता मिळवण्याचा हव्यास का करतो? हे बघा, प्रश्न विचारू नका. मी जन्मजात नेता आहे. वाटल्यास महाराष्ट्रातल्या राऊतांना विचारा. ‘आप आये बहार आयी’ असे ते मला म्हणतात. काय म्हणता? सिंगापूर, मलेशिया, थायलंड, चीन वगैरे वगैरे देश आणि मी, याबाबत सगळा देश माझ्यासाठी गाणे म्हणतोय? कोणते? ‘जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग!’
 
झारखंडचे खरे ‘जेन-झी’
 
कॉकरोच पार्टी तुमच्या सोबत आहे. मी आजारी असल्याने तिथे प्रत्यक्ष येऊ शकत नाही,” असे कॉकरोच, शिवीगाळ, अश्लीललता आंदोलनफेम अभिजित दीपकेने झारखंडच्या विद्यार्थ्यांना सांगितले. हे विद्यार्थी काँग्रेसशासित झारखंडमध्ये पेपरफुटी झाली, भ्रष्टाचार झाला म्हणून गेले ११ दिवस आंदोलन करत आहेत. यावर झारखंडच्या विद्यार्थ्यांनी काय म्हणावे? तर, त्यांनी म्हटले, "दीपके, आमच्या आंदोलनात अजिबात येऊ नकोस. आमचे आंदोलन पूर्णतः विद्यार्थ्यांचे आहे, राजकीय नाही. आमच्या आंदोलनात आम्हाला ‘आझादी’सारखे नारे एकायचे नाहीत. ना ही धर्मभेद आणि जातिभेद करायचा आहे.” थोडक्यात, झारखंडवाल्यांनी झुरळाला नाकारले.
 
या घटनेतून एक स्पष्ट झाले. दीपकेला भ्रम होता की, अख्खी तरुणाई त्याच्यापाठी फिदा आहे आणि तोच त्यांचा तारणहार. पण, तो भ्रमाचा भोपळा फुटला. खरेतर सत्य हेच आहे की, देशातली बहुसंख्य तरुणाई कधीही दीपकेच्या ‘झुरळ’ आंदोलनाचा भाग नव्हतीच. या आंदोलनात जास्तीत जास्त लोक हे विरोधी पक्षाचे नेते होते, त्यांनी त्यांच्या परिसरातील युवा कार्यकर्ते आणि इतर हौशी लोकांना गोळा करून आणले. फुकटचे खायचे-प्यायचे, मजा करायची, दिल्ली फिरायची आणि वर सोशल मीडियावर रील्स बनवून ‘फॉलोअर्स’ वाढवायचे, ही आमिषे त्यासाठी पुरेशी होती. यातील बहुसंख्याकांचा ‘नीट’ परीक्षेशी संबंध नव्हता. मात्र, या सगळ्यांच्या धिंगाण्याला नाव जोडले गेले ते, ‘भारत के जेन-झी!’ छे! हे असले लोक ‘जेन-झी’ आहेत, तर मग झारखंडमध्ये खरोखर वयाने तरुण असलेले आणि विद्यार्थीच असलेले ते युवक कोण आहेत? तर, तेच खरे भारताचे ‘जेन-झी’ आहेत. मात्र, विशेष असे की, कोणत्याही विरोधी पक्षाने झारखंडच्या ‘जेन-झी’ला समर्थन दिले नाही. कारण, स्पष्ट आहे. त्यांना ‘जेन-झी’बद्दल काही देणेघेणे नाही. इतर देशांत जशी विद्यार्थी आंदोलने झाली आणि सत्ता पालटली, तसे त्यांना भारतात करायचे होते. पण, ते शक्य झाले नाही. कारण, भारताची ‘जेन-झी’ ही अजूनही देश, समाज आणि कुटुंबाशी जोडलेली आहे. त्यामुळेच झारखंडच्या ‘जेन-झी’ने दीपकेला त्याची जागा दाखवली. ही ‘जेन-झी’ देशभरातल्या युवकांचे प्रतिनिधित्व करते, हे नक्की!




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर