मुंबई (Oshiwara Maternity Hospital): बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जोगेश्वरी (पश्चिम) येथील कॅप्टन सामंत मार्गावर उभारण्यात आलेल्या नवीन ओशिवरा प्रसूतिगृहाचे लोकार्पण बुधवारी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पणानंतर प्रसूतिगृह तत्काळ नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले.(Oshiwara Maternity Hospital)
या कार्यक्रमाला स्थानिक आमदार हारून खान, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, नगरसेवक रुपेश सावरकर, विठ्ठल बंधिरे, नगरसेविका सुधा सिंग, परिमंडळ-४च्या उपआयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपआयुक्त शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांच्यासह अनेक अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.(Oshiwara Maternity Hospital)
यावेळी बोलताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, "हे प्रसूतिगृह केवळ एक इमारत नसून सुरक्षित मातृत्व आणि नवजात बालकांच्या उज्ज्वल भविष्याची हमी आहे. वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्यास प्रसूतीदरम्यान उद्भवणारे अनेक धोके टाळता येतात. त्यामुळे स्थानिक स्तरावर अशा सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे."(Oshiwara Maternity Hospital)
त्यांनी सांगितले की, जोगेश्वरी (पश्चिम), आदर्श नगर, बेहराम बाग, गौतम नगर, शास्त्री नगर आणि परिसरातील हजारो नागरिकांना या प्रसूतिगृहाचा थेट लाभ मिळणार आहे. गर्भवती माता आणि नवजात बालकांना घराजवळच दर्जेदार आरोग्यसेवा मिळाल्याने मोठ्या रुग्णालयांवरील ताणही कमी होण्यास मदत होईल.(Oshiwara Maternity Hospital)
५० खाटांचे आधुनिक प्रसूतिगृह
जुने ओशिवरा प्रसूतिगृह जीर्ण झाल्यानंतर तेथील सेवा तात्पुरत्या स्वरूपात टोपीवाला प्रसूतिगृहात हलविण्यात आल्या होत्या. आता सुविधा भूखंडावर तळमजला अधिक तीन मजली सुसज्ज इमारतीत नवीन प्रसूतिगृह उभारण्यात आले आहे.
या प्रसूतिगृहात एकूण ५० रुग्णखाटांची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये ३४ खाटा स्त्रीरोग व प्रसूती विभागासाठी, १० खाटा बालरोग विभागासाठी आणि ६ खाटा विशेष नवजात शिशू अतिदक्षता विभाग (एसएनसीयू) यासाठी राखीव आहेत.
याशिवाय आधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, बाह्यरुग्ण (ओपीडी), आंतररुग्ण (आयपीडी) विभाग तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
२४ तास उपलब्ध राहणार आरोग्यसेवा
या प्रसूतिगृहामध्ये स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ सेवा, बालरोग उपचार, सुरक्षित प्रसूती, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची देखभाल, नवजात शिशू सेवा, कुटुंब नियोजन, लसीकरण तसेच माता-बाल आरोग्य समुपदेशन अशा सर्वसमावेशक सेवा उपलब्ध असतील.
रुग्णालयात एक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दोन स्त्रीरोग तज्ज्ञ, एक बालरोग तज्ज्ञ आणि प्रशिक्षित परिचारिकांची टीम २४ तास नागरिकांना सेवा देणार आहे.