आंदोलन व्यक्तीविरोधात नको व्यवस्था सुधारण्यासाठी हवे; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

    06-Aug-2026
Mohan Bhagwat Gen Z Dialogue
 
मुंबई : (Mohan Bhagwat Gen Z Dialogue) आंदोलन हा देखील संवादाचाच एक मार्ग असला तरी संवादातूनच प्रश्न सुटू शकतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करण्याचा मार्ग दाखवून दिला आहे. त्यामुळे कुठलेही आंदोलन व्यक्तीविरोधात नव्हे तर व्यवस्था सुधारण्यासाठी व्हायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
 
गुरुवार, दि. ६ ऑगस्ट रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे 'जेन झी' आणि 'जेन अल्फा' यांच्यासोबत सरसंघचालकांनी मुलाखतीच्या माध्यमातून विशेष संवाद साधला. आयआयएमयूएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी ही मुलाखत घेतली. इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स' (आयआयएमयूएन) च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वार्षिक चॅम्पियनशिप कॉन्फरन्सच्या उद्घाटन समारंभाचा हा एक भाग होता. या कार्यक्रमात भारतातील १०० हून अधिक शहरांतील २,००० हून अधिक हायस्कूल विद्यार्थी उपस्थित होते.(Mohan Bhagwat Gen Z Dialogue)
 
उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले, नव्या पिढीशी सातत्याने संवाद होणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे. आम्ही जनरेशन झेडच्या वयाचे होतो, तेव्हा इतके प्रश्न विचारण्याची सवय नव्हती. मात्र आजची पिढी प्रत्येक गोष्टीमागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या प्रश्नांना उत्तर आणि समाधान अपेक्षित असते. ही पिढी केवळ विरोधासाठी विरोध करत नाही. त्यामागे काही कारण असते, काही सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांचे म्हणणे समजून घेणे आवश्यक आहे.(Mohan Bhagwat Gen Z Dialogue)
 
देशातील शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत सुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधत शिक्षणाला व्यावसायिक दृष्टिकोनातून न पाहता समाजनिर्मितीचे साधन म्हणून विकसित करण्याची गरज सरसंघचालकांनी व्यक्त केली. ते म्हणाले, भारताच्या शिक्षण व्यवस्थेत विशेषतः जेनझीच्या दृष्टीने अनेक सकारात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण हा कमर्शियल व्यवसाय नव्हे. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि सुलभ शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे; मात्र त्यापूर्वी आपण स्वतः काय करू शकतो, याचा विचार होणे अधिक महत्त्वाचे आहे. (Mohan Bhagwat Gen Z Dialogue)
 
त्यांनी गावपातळीवरील एका सकारात्मक उपक्रमाचा उल्लेख करत सांगितले की, काही गावांमध्ये स्थानिक नागरिकांनी एकत्र येत आपल्या शाळांच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली. अशा प्रकारे समाजाने पुढाकार घेतल्यास शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडू शकतो. पुढील पिढी घडविण्याच्या उद्देशाने शिक्षण दिले जात असल्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे सांगत त्यांनी समाजाच्या सहभागावर भर दिला. समाजाला सोबत घेऊन शिक्षण सुधारण्याचे पाऊल उचलले, तर निश्चितच व्यापक आणि दीर्घकालीन परिवर्तन घडेल, असा विश्वास सरसंघचालकांनी व्यक्त केला.(Mohan Bhagwat Gen Z Dialogue)
 
अन्य राष्ट्रांप्रमाणे १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावरील निर्बंध आणि नव्या पिढीच्या रोल मॉडेल्सविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, केवळ कायदे करून समस्या सुटत नाहीत, तर त्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. नियम बनवणे योग्य आहे; पण त्याचा खरा परिणाम तेव्हाच दिसून येईल, जेव्हा समाजाची वृत्ती बदलेल आणि समाज त्या नियमांना स्वीकारेल. समाजाने मान्यता दिली, तरच कायदा प्रभावीपणे चालतो. सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही माहितीवर पडताळणी केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. माहितीची सत्यता तपासणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपला आदर्श आपणच ठरवायचा असतो. मात्र प्रत्येकाने हेही लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्याकडे पाहूनही अनेक जण प्रेरणा घेत असतात. त्यामुळे आपल्या आचरणाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. जर आजच्या जनरेशन झेडला हिंसा आवडत नसेल, तर ती हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना आदर्श म्हणून स्वीकारणार नाही. त्यामुळे समाजात चांगले आदर्श निर्माण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.(Mohan Bhagwat Gen Z Dialogue)
 
जंतर मंतरवर आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, कोणत्याही घटनेबाबत निष्कर्ष काढण्यापूर्वी ती घटना नेमकी का घडली, त्यामागील सत्य काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. खरे-खोटे जाणून घेतल्याशिवाय मत बनवू नये. मात्र डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवायचा झाला, तर मी जनरेशन झेडवर विश्वास ठेवेन.(Mohan Bhagwat Gen Z Dialogue)
 
मानवता राजकीय भेदांच्या पलीकडे
 
देशांमधील संघर्षांमुळे द्विपक्षीय संबंधांचे कायमचे नुकसान होऊ नये. पाकिस्तान आणि चीन यांसारख्या देशांना भारताचे 'पूर्ण शत्रू' मानले जाऊ नये. वादांमुळे संबंध तात्पुरते थांबवले जाऊ शकतात, परंतु ते संपुष्टात येऊ नयेत. संघर्षाच्या काळात आपण द्विपक्षीय संबंध बिघडवू नयेत; प्रश्न सुटेपर्यंत ते तात्पुरते थांबवले जाऊ शकतात, परंतु ते तोडले जाऊ शकत नाहीत. पाकिस्तान आणि चीन हे आपले पूर्ण शत्रू आहेत असे नाही. राज्यकारभाराचे राजकारणही यात भूमिका बजावते. संघर्षाच्या काळात लोकांनी सरकारच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, शेवटी मानवता राजकीय भेदांच्या पलीकडे आहे. संघर्षाच्या वेळी आपण सरकारच्या सोबत असतो, पण आपल्याला हे देखील माहीत आहे की कधीकधी आपल्याला एक व्हावे लागते. मानवता एक आहे", असे ते म्हणाले.(Mohan Bhagwat Gen Z Dialogue)
 
एलजीबीटीक्यू समुदायास सामावून घेण्याची जुनी परंपरा
 
एलजीबीटीक्यू समुदायावर बोलताना डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले की, हा समाज आपल्याच देशाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांना सामावून घेण्याची आपली जुनी परंपरा आहे. मात्र, विवाह आणि एकत्र राहणे (कंपॅनियनशिप) यातील फरक असा की, विवाह ही केवळ दोन व्यक्ती एकत्र राहण्याची सोय नसून ती भारतीय समाजाची एक मूलभूत संस्था आहे. त्यामुळे समलैंगिक विवाहाला पाठिंबा न देता, अशा जोडप्यांच्या एकत्र राहण्यासाठी समाजाने योग्य ती रचना किंवा व्यवस्था निर्माण केली पाहिजे.
 
महिलांमध्ये नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता
 
संघामधील महिलांच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, संघाचे जितके प्रकल्प आहेत, त्यामध्ये महिला समानतेने पुढे येत आहेत आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र विभागही तयार करण्यात आला आहे. महिला विविध क्षेत्रांत सक्रियपणे कार्यरत असून बैठकांमध्ये सुद्धा त्यांच्या विचारांना पूर्ण महत्त्व दिले जाते. महिलांमध्ये नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता असून त्यांना समान अधिकार मिळायलाच हवेत.
 
 




संबंधित मजकूर