जंतरमंतरवरील ‘सीजेपी’च्या आंदोलनातून नेमके काय काय वाईट घडले, ते देशासमोर ठळकपणे आलेच. पण, ज्याप्रकारे समुद्रमंथनातून अमृतही हाती लागले होते, तसेच या आंदोलनातूनही काही चांगल्या गोष्टी देशासमोर आल्या आहेत. ‘वाईटातूनही चांगले घडते’ या उक्तीनुसार, ‘जेन-झी’च्या या आंदोलनातूनही पुढे आलेल्या अशाच काही चांगल्या गोष्टींचा आढावा घेणारा हा लेख...
चीनची एक लोककथा आहे. एक शेतकरी असतो, त्याचा घोडा हरवतो. शेजारीपाजारी येतात आणि त्याला म्हणतात, "खूप वाईट झाले.” तो म्हणतो, "वाईट झाले की चांगले झाले, कोण जाणे.” काही दिवसांनंतर जंगलातून तो घोडा परत येतो आणि येताना आपल्याबरोबर चार जंगली घोडे घेऊन येतो. शेजारी पुन्हा येतात आणि म्हणतात, "व्वा, खूप चांगले झाले. तुला चार नवीन घोडे मिळाले.” तो म्हणतो, "वाईट झाले की चांगले झाले, कोण जाणे.”
काही दिवसांनंतर राजाचे शिपाई गावात येतात. राजाचा हुकूम असतो की, जे धडधाकट आहेत, त्यांना सैन्यात भरती व्हायचे आहे. शेतकर्याचा मुलगा जंगली घोड्यांना प्रशिक्षण देत असताना खाली पडतो आणि त्याचा पाय मोडतो. राजाचे शिपाई शेतकर्याला म्हणतात, "हा मुलगा आमच्या कामाचा नाही, त्याची सैन्यात भरती होऊ शकत नाही.” पुन्हा शेजारी येतात, "तू भाग्यवान आहेस. तुझा मुलगा वाचला.” शेतकरी पुन्हा तेच उत्तर देतो, "वाईट झाले की चांगले झाले, कोण जाणे.”
आपल्या भाषेत आपण याला ‘वाईटातूनही चांगले घडते’ असे म्हणतो. जंतरमंतरवर आंदोलन झाले. त्याचे स्वरूप, त्यात घुसलेले गुंड आणि अराजकवादी यांचे उघडेनागडे दर्शन देशाला झाले. तरुण आणि विशेषतः युवतींकडून अत्यंत घाणेरड्या भाषेतील व्हिडिओ व्हायरल झाले, ते आपण ऐकले. म्हटला तर सर्व प्रकार वाईट झाला; पण त्यातून काही चांगल्या गोष्टी पुढे आल्या, त्या अशा- दीर्घकाळ शासनात असलेले राज्यकर्ते जागे झाले. युवकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे त्यांंना जाणवले. पंतप्रधानांनी दोन व्हिडिओ संदेशांमार्फत सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, ही चांगली गोष्ट झाली.
त्याहून चांगली गोष्ट म्हणजे, अराजकवादी कुठेही घुसून भावना भडकावून अराजकतेच्या दिशेने देशाला घेऊन जाण्याचा कसा प्रयत्न करीत आहेत, हे लोकांना समजले. देशातील सज्जनशक्ती निरंतर जागरूक असते असे नाही. तिला जाग आली आणि ती अभिव्यक्त होऊ लागली. बातम्यांच्या विविध वाहिन्यांवरून जंतरमंतरचा प्रकार देशाच्या ऐक्य आणि स्थैर्याच्या दृष्टीने किती घातक आहे, याच्या चर्चा झाल्या. या चर्चेत आपली राज्यघटना आणि तिची मूल्ये कशाप्रकारे धोयात आणण्याचा प्रयत्न चालू आहे, हे या शक्तीला समजले आणि आपण सक्रिय असलो पाहिजे, याची जाणीव झाली ही चांगली गोष्ट झाली.
कोवळ्या वयातील युवतींच्या तोंडातून अभद्र भाषा समाजाच्या कानावर पडली आणि समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागी झाली. मुले अशा भाषेत बोलू लागली, तर आपल्या जीवनमूल्यांचे काय होणार? असा गंभीर प्रश्न या सदसद्विवेकबुद्धीपुढे उभा राहिला. आपला समाज कुटुंबप्रधान समाज आहे आणि प्रत्येक कुटुंबात आईवडील आपल्या मुलांना शिक्षण देतात की, मोठ्यांचा आदर करावा, त्यांच्याशी नम्र भाषेत बोलावे, ते घरी आले असता त्यांच्या पाया पडावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावे. माझा एक नातू आहे. तो जेमतेम चार वर्षांचा आहे, आता कुठे तो बोलायला लागला आहे. खूप धावपळ करीत असतो. एकदा तो मला म्हणाला, "ये आजोबा, मी काय केले ते बघ.” त्याची आई त्याला म्हणाली, "किआन, असे बोलायचे नाही. ‘अहो आजोबा’ म्हणायचे.” हा बालपणापासून होणारा संस्कार आहे.
म्हणून, शिवीगाळ करणार्या मुली आणि मुलांविषयी लोकांनी प्रश्न उपस्थित केले की, तुमच्या आई-बापांनी तुम्हाला हेच शिकविले का? पंतप्रधान आणि जवानांना शिव्या देण्याचे धडे तुम्हाला तुमच्या आई-बापांनी दिले का? हे प्रश्न सोशल मीडियावर आल्यानंतर त्यांचे पालक स्वाभाविकपणे अस्वस्थ झाले. मुला-मुलींच्या क्षमायाचना प्रसारित होऊ लागल्या. ही आपल्या समाजाच्या सदसद्विवेकबुद्धीची शक्ती आहे, तिचे दर्शन घडले ही चांगली गोष्ट झाली.
मुलींच्या तोंडातील अभद्र भाषा सर्वांना अस्वस्थ करून गेली. आपली संस्कृती आपल्याला हे शिकविते की, स्त्री ही लक्ष्मीरूपा, सरस्वतीरूपा आणि दुर्गारूपा आहे. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा या प्रतीक आहेत. संपत्ती, विद्या आणि शक्तीची ती रूपे आहेत. अशा स्त्रीच्या मुखी अभद्र भाषा चांगली नाही आणि जर मुलीच अशा भाषेत बोलू लागल्या, तर उद्या त्या माता होणार आहेत, तर त्या पाल्यांना काय शिकवतील? आणि उद्या येणारी पिढी कोणते संस्कार घेऊन येणार? या प्रश्नाने समाजाचे जागरूक मन अतिशय अस्वस्थ झालेले आहे. ही जंतरमंतरची चांगली गोष्ट समजली पाहिजे.
आपली राज्यघटना सांगते की, सर्व शक्तीचा उगम समाज आहे. राज्यघटनेचा संबंध राजकीय शक्तीशी येतो. तिचा उगम समाज आहे, असा याचा अर्थ! परंतु, समाजाची तेवढीच शक्ती नाही, समाजाची सर्वांत मोठी शक्ती ही समाजाची सदसद्विवेकबुद्धी असते. समाजाला ती उपजत प्राप्त झालेली असते. ती जागृत झाली की, पारतंत्र्याच्या विरोधी आंदोलन सुरू होते. समाजातील दुष्ट रूढी, चालीरीती, अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू होते आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणून सत्तेला नमावे लागते आणि समाजाच्या सदसद्विवेकबुद्धीशी सुसंगत व्यवहार करावा लागतो.
समाजाची ही सदसद्विवेकबुद्धी जागृत करण्याचे काम महात्मा गांधींनी आपल्यापरीने केले. त्याचा परिणाम म्हणून एक काळ असा होऊन गेला की, गांधीजींनी मांडलेल्या जीवनमूल्यांवर जगणारी लाखो माणसे आणि परिवार उभे राहिले. डॉ. बाबासाहेबांनी हेच काम आपल्यापरीने केले, त्याचा परिणाम म्हणून जातिभेद आणि अस्पृश्यता आता आमच्या समाजात नको, हे स्वीकारणारे समाजमन तयार झाले. हेच काम आपल्यापरीने डॉ. हेडगेवारांनी केले. समाज नित्य जागृत असला पाहिजे, त्याची विवेकशक्ती जागरूक असली पाहिजे, चारित्र्यसंपन्नता याला अन्य पर्याय नाही, ही जीवनमूल्य मानणार्या पाच पिढ्या संघात तयार झाल्या.
जंतरमंतरच्या आंदोलनाने एक गोष्ट ठळकपणाने पुढे आणली की, समाजाची विवेकशक्ती, सदसद्विवेकबुद्धी, सतत जागरूक असली पाहिजे. लोकशाही राजवटीत एक शासन येते, काहीकाळ राहते, त्याची जागा दुसरे घेते, ही प्रक्रिया निरंतर चालू राहणार. कुणीही असे समजण्याचे कारण नाही की, सत्तासुंदरीने आम्हाला चंद्र-सूर्य असेपर्यंत सत्ता दिली आहे. सत्तेवर येण्यासाठी अन्य लोकांनी प्रयत्न करणे यातही काही गैर नाही. पण, जे काही करायचे, ते जीवनमूल्यांना तिलांजली देऊन करता येणार नाही. सत्ता येते आणि जाते. परंतु, जीवनमूल्ये कायम असतात. त्यामागे हजारो वर्षांचे संचित असते. ही मूल्ये प्रत्येक पिढीला जगावी लागतात. उगवत्या पिढीकडे ती हस्तांतरित करावी लागतात. ती आपल्या प्रत्येक परिवारात होत असतात. अनेक कारणांमुळे जर त्यात शिथिलता आली असेल, तर ती दूर करून जागरूक राहण्याची आवश्यकता जंतरमंतरच्या आंदोलनाने पुन्हा अधोरेखित केली, हे चांगले झाले.
- रमेश पतंगे