मुंबई : (Jantar Mantar Violence) दिल्लीतील जंतर-मंतर येथे नुकत्याच झालेल्या कॉकरोच जनता पार्टी आयोजित आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारामागे सुनियोजित 'डिजिटल जिहाद' असल्याचे उघड झाले आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल आणि फॉरेन्सिक पथकाने दोन आठवड्यांच्या सखोल तांत्रिक तपासानंतर आंदोलनाला हिंसक वळण देण्यासाठी सोशल मीडियावर नियोजनबद्ध पद्धतीने फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या कटात हजारो बनावट सोशल मीडिया प्रोफाइल्स आणि परदेशी बॉट नेटवर्कचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० ते २३ जुलै या कालावधीत विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह रिल्स, चिथावणीखोर व्हिडिओ आणि वादग्रस्त विधानांचा अक्षरशः पूर आला होता. ही सामग्री केवळ सामान्य पद्धतीने शेअर न करता, बॉट नेटवर्कच्या माध्यमातून सोशल मीडिया अल्गोरिदममध्ये हस्तक्षेप करून कृत्रिमरीत्या मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली. या दिशाभूल करणाऱ्या आणि चिथावणीखोर सामग्रीमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आक्रमकता वाढली आणि त्याचे रूपांतर जंतर-मंतर, जनपथ, टॉलस्टॉय मार्ग आणि संसद मार्ग परिसरात चार दिवस चाललेल्या हिंसक आंदोलनात झाले. या काळात आंदोलकांनी कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवर तसेच वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. (Jantar Mantar Violence)
या डिजिटल कटाचा उलगडा करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने मेटा, गूगल आणि एक्स या प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांना अधिकृत नोटिसा पाठवल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे बनावट प्रोफाइल्स आणि बॉट खात्यांचे संचालन करणाऱ्या मुख्य सर्व्हरचे लॉग्स आणि आयपी अॅड्रेस; संबंधित खात्यांचा लॉगिन इतिहास, प्रत्यक्ष स्थान आणि वापरलेली उपकरणे; हजारो खात्यांचे नियंत्रण एखाद्या केंद्रीय टूल किंवा सर्व्हरद्वारे स्वयंचलितरीत्या केले जात होते का, याबाबतची माहिती तसेच संशयित प्रोफाइल्स तयार करणाऱ्या आणि त्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींचा मूळ तपशील इ. माहितीची मागणी केली आहे. (Jantar Mantar Violence)
'ऑपरेशन सिंदूर' आणि पाकिस्तानी हँडल्सशी कथित संबंध
तपासादरम्यान सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे या डिजिटल मोहिमेचे धागेदोरे भारताबाहेरून चालविल्या जाणाऱ्या सोशल मीडिया खात्यांशी जोडले जात असल्याचा दावा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे ४८० पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्स या मोहिमेत सक्रिय असल्याचे आढळले असून, हीच खाती यापूर्वी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतविरोधी आणि चिथावणीखोर सामग्री प्रसारित करत असल्याचा संशय होता. देशातील वातावरण बिघडविण्यासाठी परदेशी संस्था किंवा समाजविघातक घटकांची मदत घेण्यात आली होती का, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. (Jantar Mantar Violence)
सीजेपी पदाधिकाऱ्यांची चौकशी होणार
संबंधित कटाचा उलगडा झाल्यानंतर दिल्ली पोलीस आता सीजेपीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके, प्रवक्ते सौरभ दास, सक्रिय कार्यकर्ते आशुतोष रांका तसेच इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावून चौकशीसाठी बोलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात कायदेतज्ज्ञांचा सल्लाही घेतला जात आहे. तपासादरम्यान आंदोलनात सहभागी झालेल्या २,८७३ व्यक्तींची ओळख पटली असून, त्यापैकी अनेकांवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Jantar Mantar Violence)
निधीपुरवठा आणि सूत्रधारांचा शोध
फॉरेन्सिक तज्ज्ञ सध्या या संपूर्ण डिजिटल मोहिमेला आर्थिक पाठबळ कोणी दिले, तसेच आंदोलनासाठी गर्दी जमविण्याचे संसाधन कुठून उपलब्ध झाले, याचा तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार उत्स्फूर्त जनआक्रोश नसून, पूर्वनियोजित रणनीतीचा भाग म्हणून घडवून आणण्यात आलेला उपद्रव असल्याचा संशय आहे. या संपूर्ण डिजिटल आणि प्रत्यक्ष नेटवर्कमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी आर्थिक व्यवहार आणि कॉल डिटेल रेकॉर्ड्स यांचाही तपास सुरू आहे. (Jantar Mantar Violence)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक