मुंबई : (Mumbai Mayor On Ranibaug Tender) राणीच्या बागेतील हेरिटेज बंगल्याच्या परिसरातील कामांसाठी काढण्यात आलेल्या टेंडरवरून सुरू झालेल्या वादावर महापौरांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना, "विरोधकांना सकाळी, संध्याकाळी आणि झोपेतही महापौरच दिसतात," असा टोला त्यांनी लगावला.
महापौर म्हणाल्या की, विरोधकांकडून महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी नवीन टेंडर काढल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. प्रत्यक्षात संबंधित टेंडर हे राणीच्या बागेतील झू विभागाच्या अखत्यारीतील हेरिटेज बंगल्याच्या परिसरासाठी असून त्याचा महापौर निवासाशी कोणताही संबंध नाही. टेंडरवर 'डायरेक्टर, झू' यांची स्वाक्षरी असून ते झू विभागामार्फत काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Mumbai Mayor On Ranibaug Tender)
महापौरांनी टेंडरची प्रत पत्रकारांसमोर दाखवत सांगितले की, शीर्षकात 'हेरिटेज बंगला' असा उल्लेख झाल्यामुळे गैरसमज निर्माण झाला. झू प्रशासनानेही ही चूक मान्य केली असून टेंडर मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारल्याचेही त्यांनी सांगितले. (Mumbai Mayor On Ranibaug Tender)
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या आरोपांनाही फेटाळून लावत, "ज्या टेंडरची स्थायी समितीच्या निर्णयसूचीत नोंदही झालेली नाही, त्यावर कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचे आरोप करणे चुकीचे आहे. महापौर बंगल्यात सध्या साधा खिळाही ठोकण्याचे काम सुरू नाही," असे स्पष्ट केले. (Mumbai Mayor On Ranibaug Tender)
महापौर म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिकेत गेल्या काही महिन्यांत पारदर्शक कामकाज सुरू असून कंत्राटदार लॉबीसह अनेक चुकीच्या पद्धतींना आळा घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच विरोधकांकडून दिशाभूल करणारे कथानक तयार करून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे.(Mumbai Mayor On Ranibaug Tender)
राणीच्या बागेतील साऊंड बॅरिअर, पाण्याच्या टाक्या आणि इतर प्रस्तावित कामांबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, या बाबींबाबत सविस्तर माहिती झू विभागाकडून घेण्यात येईल. कोणत्या कामाची आवश्यकता आहे, याचे उत्तर संबंधित प्रशासकीय अधिकारी देतील. मात्र या सर्व कामांचा महापौर बंगल्याशी कोणताही संबंध नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. (Mumbai Mayor On Ranibaug Tender)
प्रभातफेरी बंद करण्याच्या निर्णयावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. केंद्रीय झू प्राधिकरणाकडून परवानगी नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याने तात्पुरता निर्णय घेण्यात आल्याचे सांगत, ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादित मार्ग खुला ठेवण्याचा पर्याय प्रशासनाला सुचविल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राणीच्या बागेतील शिस्त आणि स्वच्छता राखण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनीही समिती स्थापन करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. (Mumbai Mayor On Ranibaug Tender)
दरम्यान, महापौर बंगल्याच्या सुरक्षेबाबत लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सविषयी त्यांनी सांगितले की, परिसरात रात्री मोठ्या वाहनांचे पार्किंग आणि संशयास्पद हालचाली दिसत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचा टेंडर किंवा नूतनीकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Mumbai Mayor On Ranibaug Tender)