मुंबई (Dr. Annapurni Subramaniam Vikram Sarabhai Medal 2026) : इटलीतील फ्लॉरेन्स येथे आयोजित ४६ व्या कॉस्पर वैज्ञानिक अधिवेशनात ३ ऑगस्ट रोजी भारतासाठी अभिमानाचा क्षण ठरला. देशातील ख्यातनाम खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेचे ‘विक्रम साराभाई पदक २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. विकसनशील देशांमध्ये अंतराळ विज्ञानाच्या प्रसारासाठी आणि या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. या पुरस्कारामुळे त्यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा गौरव वाढवला आहे. या सन्मानाबद्दलचा आनंद त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त करत पुरस्कार स्वीकारतानाची छायाचित्रेही शेअर केली. (Dr. Annapurni Subramaniam Vikram Sarabhai Medal 2026)
इस्रो आणि कॉस्पर यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ‘विक्रम साराभाई पदक’ मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला वैज्ञानिक ठरल्या आहेत. तसेच हा सन्मान मिळवणाऱ्या त्या जगातील केवळ तिसऱ्या महिला वैज्ञानिक आहेत. स्टेलर फिजिक्स, ब्ल्यू स्ट्रॅगलर तारे, अॅस्ट्रोसॅट मोहिम आणि खगोलशास्त्रीय उपकरणांच्या विकासातील त्यांच्या मोलाच्या योगदानामुळे त्यांना हा जागतिक सन्मान बहाल करण्यात आला. (Dr. Annapurni Subramaniam Vikram Sarabhai Medal 2026)
डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांच्यापूर्वी भारतातील केवळ तीन वैज्ञानिकांना हा सन्मान मिळाला होता.
प्रा. यू. आर. राव (१९९६) - पदकाचे पहिले भारतीय मानकरी आणि इस्रोचे माजी अध्यक्ष.
डॉ. गुरबक्ष सिंह लखीना (२०१४) - स्पेस प्लाझ्मा आणि स्पेस वेदर फिजिक्समधील योगदानासाठी.
डॉ. अनिल भारद्वाज (२०२४) - अंतराळ विज्ञान आणि ग्रह संशोधनातील उत्कृष्ट कार्यासाठी.
कोण आहेत डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यम?
डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांचा जन्म केरळमधील पालक्काड जिल्ह्यातील एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. विज्ञानाविषयीच्या गाढ आकर्षणामुळे त्यांनी पालक्काड येथील व्हिक्टोरिया महाविद्यालयातून भौतिकशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बेंगळुरू येथे प्रवेश घेतला आणि ‘स्टार क्लस्टर्स अँड स्टेलर इव्होल्यूशन’ या विषयावर संशोधन करून १९९६ मध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली.विज्ञानाइतकीच त्यांची कला क्षेत्रातही आवड आहे. त्या एक कुशल कर्नाटक संगीताच्या व्हायोलिनवादक आहेत. त्यांचा व्यावसायिक आणि वैज्ञानिक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. १९९० च्या दशकात आयआयए मध्ये संशोधन फेलो म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या डॉ. अन्नपूर्णी यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर प्राध्यापकपद मिळवले आणि नंतर संस्थेच्या ५० हून अधिक वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला संचालक होण्याचा मान पटकावला. त्यांच्या संशोधनाचा मुख्य भर तारकागुच्छ, मॅगेलॅनिक क्लाउड्स आणि आपल्या आकाशगंगेतील गुंतागुंतीच्या संरचनांच्या अभ्यासावर राहिला आहे. (Dr. Annapurni Subramaniam Vikram Sarabhai Medal 2026)
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमांमध्येही त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. भारताच्या पहिल्या समर्पित अंतराळ वेधशाळा अॅस्ट्रोसॅट (२०१५) मधील अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप या प्रमुख उपकरणाच्या कॅलिब्रेशनमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे शास्त्रज्ञांना अतिनील प्रकाशात ताऱ्यांची निर्मिती आणि उत्क्रांती अधिक अचूकपणे समजून घेणे शक्य झाले. याशिवाय, त्या बहु-अब्ज डॉलर्सच्या आंतरराष्ट्रीय थर्टी मीटर टेलिस्कोप प्रकल्पामध्ये भारताच्या वैज्ञानिक पथकाचे नेतृत्व करत आहेत. भारत सरकारने २०२४ मध्ये अंतराळ विज्ञानातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल त्यांना ‘विज्ञानश्री’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय सन्मानाने गौरविले. त्या इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या फेलो असून इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन यांच्या सक्रिय सदस्य आहेत. (Dr. Annapurni Subramaniam Vikram Sarabhai Medal 2026)
कॉस्पर म्हणजे काय?
.
कॉस्पर ही जगभरातील अंतराळ संशोधक आणि वैज्ञानिकांची आंतरराष्ट्रीय संस्था असून तिची स्थापना १९५८ मध्ये इंटरनॅशनल सायन्स कौन्सिल यांनी केली. जगभरात शांततापूर्ण अंतराळ संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि वैज्ञानिक ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. दर दोन वर्षांनी आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात अंतराळ तंत्रज्ञान, नवीन खगोलीय शोध आणि विविध देशांमधील वैज्ञानिक सहकार्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांचा कॉस्परतर्फे गौरव केला जातो. या सन्मानांपैकी ‘विक्रम साराभाई पदक’ हे अत्यंत प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक असून ते कॉस्पर आणि इस्रोच्या संयुक्त विद्यमाने प्रदान केले जाते. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेले हे पदक विशेषतः विकसनशील देशांमध्ये अंतराळ विज्ञान आणि संशोधनाला नवी दिशा देणाऱ्या तसेच या क्षेत्रात क्रांतिकारी योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांना प्रदान केले जाते. (Dr. Annapurni Subramaniam Vikram Sarabhai Medal 2026)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक