तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्येक क्रांतीने, मानवी सभ्यतेला नवी ताकद दिली; पण त्या ताकदीसोबत नवे धोकेही आणले. वाफेच्या इंजिनाने उत्पादन वाढवले; पण पर्यावरणाचा प्रश्न निर्माण केला. इंटरनेटमुळे माहितीचा प्रसार सर्वत्र झाला; पण दिशाभूल वाढली. कृत्रिम बुद्धिमत्तेची कहाणीही याला अपवाद नाही. मात्र, यावेळचा धोका वेगळा आहे. यंत्रशक्तीचे भय मानवाला पूर्वीही होतेच; आता त्याच्या बुद्धिमत्तेचीही चिंता निर्माण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांत घडलेल्या दोन घटनांनी ही चिंता आर्थिक, सामरिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या चौकटीत पोहोचल्याचेही स्पष्ट केले आहे.
अमेरिकेत ‘अॅपल’ आणि ‘ओपनएआय’ यांच्यात सुरू झालेला न्यायालयीन संघर्ष या बदलाची नांदी ठरतो. ‘अॅपल’चा आरोप आहे की, कंपनीच्या ‘एआय’ विभागाशी संबंधित काही अधिकारी ‘ओपनएआय’मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी भविष्यातील प्रकल्पाबाबतची संवेदनशील माहिती ‘ओपनएआय’ला दिली. ‘अॅपल’ने न्यायालयाकडे हस्तक्षेपाची मागणी करत, अशा माहितीचा वापर किंवा प्रसार रोखण्याची विनंती केली आहे. ‘ओपनएआय’ने हे सर्व आरोप फेटाळले असून, कोणत्याही गुपितांचा वापर झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. आरोप-प्रत्यारोपांचे सत्य न्यायालयच ठरवेल. परंतु, या प्रकरणाने नव्या अर्थव्यवस्थेतील संपत्तीचे बदलते स्वरूप अधोरेखित केले.
एकेकाळी उद्योगसमूहांचे सामर्थ्य त्यांच्या उत्पादन क्षमतेत मोजले जाई. डिजिटलयुगात त्याची जागा ‘डेटा’ने घेतली. आता ‘एआय’च्या काळात संशोधन, अल्गोरिदम, संगणकीय प्रारूपे आणि भविष्यातील योजना हीच सर्वांत मोठी संपत्ती ठरत आहेत. म्हणूनच, ‘अॅपल’ची चिंता बौद्धिकसंपदेच्या असुरक्षिततेचीही आहे. ‘एआय’मधील वाढत्या स्पर्धेमुळे माहितीचे महत्त्व अतोनात वाढले आहे. त्यातूनच अधिकाधिक माहिती मिळवण्याची स्पर्धाही वाढली. पूर्वी प्रतिस्पर्ध्याच्या कारखान्यातील आराखडे चोरण्याचा प्रयत्न होई. आता एखाद्या संशोधकाच्या अनुभवातून, अल्गोरिदमच्या संकल्पनेतून किंवा अद्याप बाजारात न आलेल्या उत्पादनांच्या माहितीमधूनच अब्जावधी डॉलरची मूल्यनिर्मिती होते.
याचा दुसरा अर्थही आहे. ‘एआय’ क्षेत्रातील स्पर्धा आता उत्पादन विकण्यापुरतीच मर्यादित नाही. पुढील दहा वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व कोण करणार, डिजिटल अर्थव्यवस्थेचे नियम कोण ठरवणार आणि ग्राहकांच्या हातात पोहोचणार्या साधनांचे स्वरूप कसे असेल, याचीच लढाई प्रत्यक्षात आज संशोधन प्रयोगशाळांमध्ये सुरू आहे. त्यामुळे एखाद्या अभियंत्याचे स्थलांतरही आता अब्जावधी डॉलरच्या स्पर्धेचाच भाग ठरते आहे.
ही चिंता ताजी असतानाच, दुसर्या घटनेने ‘एआय’वरील चर्चेला अधिकच गंभीर स्वरूप दिले. ‘ओपनएआय’च्या एका चाचणीत, ‘एआय’ एजंटला सायबर सुरक्षेशी संबंधित लक्ष्यपूर्तीसाठी नियम ठरवून दिले होते. प्रयोगादरम्यान त्या एजंटने उपलब्ध साधनांचा वापर करून अपेक्षेपेक्षा अधिक स्वायत्तपणे माहिती शोधणे, सुरक्षा उणिवा ओळखून लक्ष्यसिद्धीसाठी नियमबाह्य पर्यायी मार्गांचा वापर केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतंत्र कृती करू शकते, याचीच ही एक झलक ठरली.
आजवरची संगणकीय व्यवस्था आदेशांचे पालन करीत होती. कृत्रिम बुद्धिमत्ता मात्र आदेशाचा अर्थ समजून, त्यापर्यंत पोहोचण्याचे मार्गही शोधू लागली आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेच्या व्याख्येलाच नवे परिमाण लाभले आहे. आतापर्यंत सुरक्षाव्यवस्थेचा केंद्रबिंदू मानवी हल्लेखोर होता. आता कृत्रिम बुद्धिमत्ताच स्वतंत्र जोखीम म्हणून समोर येत आहे. सर्वच क्षेत्रांचे वाढते डिजिटल अवलंबित्व पाहता, ही चिंता राष्ट्रीय सुरक्षिततेचा अविभाज्य भाग ठरते.
या दोन्ही घटनांमध्ये एका ठिकाणी बौद्धिकसंपदा धोक्यात आहे; तर दुसरीकडे तीच बुद्धिमत्ता स्वायत्ततेकडे-कृतीकडे झुकताना दिसते. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेभोवतीचा वाद रोजगार, ‘डीपफेक’ किंवा उत्पादकता इतकाच मर्यादित राहू शकत नाही. आता त्यात आर्थिक सार्वभौमत्व, बौद्धिकसंपदा, सायबर संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक विश्वास या सर्वांचा समावेश झाला आहे. म्हणूनच, कृत्रिम बुद्धिमत्तेकडे केवळ नव्या उद्योगक्रांतीचे साधन म्हणून पाहणे अपुरे ठरेल. ती मानवी बुद्धिमत्तेची सर्वोच्च निर्मिती असली, तरी तिची बंडखोरी रोखण्यासाठी आतापासूनच सजग राहण्याची गरज आहे.
- कौस्तुभ वीरकर