समाजसेवेचा ‘गायत्री’मंत्र...

    06-Aug-2026   
 
Gayatri Keskar
 
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ज्यांनी शिक्षण, कर्तृत्व आणि समाजसेवेचा ध्यास सोडला नाही, अशा गायत्री केसकर यांचा जीवनप्रवास...
 
अडचणी कुठल्याही व्यक्तीला खचवण्यासाठी नसतात, तर त्या अधिक सक्षम बनवण्यासाठी असतात. या वाक्याचा प्रत्यय ज्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासातून येतो, असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे गायत्री ओंकार केसकर.
 
मूळच्या सांगलीच्या आणि विवाहानंतर बार्शीच्या झालेल्या गायत्रीताई आज पुण्यातील ‘क्विक हील फाऊंडेशन’च्या ‘सीएसआर’ विभागात कार्यरत आहेत. गायत्री यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आघात त्यांना त्या अवघ्या १२ वर्षांच्या असताना बसला. कावीळच्या आजारामुळे त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील आधारवड हरपल्यानंतर संसाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईच्या खांद्यावर आली. अशा कठीण परिस्थितीतही त्यांच्या आईने कधीही हार मानली नाही. तीनही मुलींना शिक्षण देऊन स्वाभिमानाने उभे करण्याचा निर्धार त्यांनी केला. सुट्यांमध्ये इतर मुलांप्रमाणे सहलींना न पाठवता त्यांनी आपल्या मुलींना व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांमध्ये पाठवले. त्या शिबिरांतून मिळालेल्या संस्कारांनी गायत्री यांना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाला.
 
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी दहावीच्या परीक्षेत तब्बल ८७ टक्के गुण मिळवले. विज्ञान शाखेत शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यासाठी लागणारी फी परवडत नव्हती. अनेकदा विनंती करून, फीमध्ये सवलत मिळवून त्यांनी अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी ‘बीसीएस’ (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स) पदवी पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच त्यांनी आपल्या परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी शिकवणी वर्ग सुरू केला. सुरुवातीला अवघ्या दहा-पंधरा मुलांपासून सुरू झालेला हा उपक्रम केवळ उत्पन्नाचे साधन नव्हता; तर समाजातील वंचित मुलांचे भविष्य घडवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता.
 
उत्तम पगाराची नोकरी त्यांच्या हाताशी आली होती. मुलाखतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्या पोहोचल्या होत्या. मात्र, त्या नोकरीसाठी बंगळुरूला जावे लागणार होते. त्याच काळात त्यांच्या आईची प्रकृती बिघडली. करिअर आणि कुटुंब यांपैकी निवड करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी कोणताही विचार न करता कुटुंबाची निवड केली. मोठ्या पगाराच्या संधीला नकार देत त्यांनी सांगली येथील भारतीय समाजसेवा केंद्रात अवघ्या ५ हजार, ५०० रुपयांच्या पगारावर लार्क म्हणून काम सुरू केले. त्यांचे ‘मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स’ करण्याचे स्वप्न याच काळात मागे पडले. पण, त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी नंतर पुण्यातील ‘कर्वे इन्स्टिट्यूट’मधून ‘मास्टर्स ऑफ सोशल वर्क’ करण्याचा निर्धार केला आणि तो पूर्णही केला. त्यांच्या सामाजिक कार्याच्या प्रवासाची खरी सुरुवात २०१४ पासून झाली.
 
शिक्षण घेत असतानाच, विविध स्वयंसेवी संस्थांशी जोडले जाऊन अनेक सामाजिक प्रकल्पांमध्ये अर्धवेळ काम केले. याकाळात पुण्यातील कोथरूड येथील अंध मुलींच्या शाळेत एक वर्ष ‘केस वर्कर’ म्हणून कार्य केले. शैक्षणिक अभ्यास आणि क्षेत्रीय संशोधनाचा भाग म्हणून त्यांना छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त आदिवासी भागांमध्ये प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळाली. त्यानंतर ‘शेल्टर असोसिएट्स’ या संस्थेमार्फत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता आणि शौचालय प्रकल्पांवर काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेने आपल्या कोल्हापूर शाखेत सामाजिक कार्यकर्ती म्हणून त्यांना जबाबदारी दिली. कोल्हापूरमध्ये ‘एक घर-एक शौचालय’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत ३३ झोपडपट्ट्यांमध्ये नेतृत्व करत काम केले. याशिवाय, तीन झोपडपट्ट्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविले. तसेच ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेअंतर्गत घरकुल प्रकल्पात नागरिकांच्या सहभागातून विकासाचे कार्य केले.
 
लग्नानंतर आदिवासी, ग्रामीण आणि शहरी भागात काम करताना मिळालेल्या अनुभवांचा विचार केला आणि समाजातील विशेषतः युवकांचा विकास, शिक्षण आणि व्यापक सामाजिक परिणाम घडविण्यासाठी ‘सीएसआर’ क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. २०२२ मध्ये ‘क्विक हील फाऊंडेशन’मध्ये ‘सीएसआर’ प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. सध्या त्या भारतातील सहा राज्यांमध्ये राबविण्यात येणार्‍या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या राष्ट्रीय अभियानाचे नेतृत्व करत आहेत. तसेच कौटुंबिक वाद, तरुण वर्ग आणि दिशाहीन झालेल्या लोकांसाठी योग्य आणि मोफत समुपदेशन या करत आहेत. या सर्व कार्यात त्यांच्या कुटुंबीयांचा आणि त्यांना मदत करणार्‍या संस्थाचा हातभार आहे.
 
गायत्री केसकर यांना अनेक पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांचा जीवनप्रवास हा केवळ एका व्यक्तीच्या यशाचा इतिहास नाही; तर संकटांशी दोन हात करत स्वतः उभे राहण्याचा, कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचा, शिक्षणासाठी झगडण्याचा आणि समाजासाठी आयुष्य समर्पित करण्याचा प्रेरणादायी आदर्श आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने अनेक शुभेच्छा!




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर