भेटी लागे जिवा :

    05-Aug-2026
 
 
Pandharpur Wari Experience
 
वारीत सहभागी होण्याचं हे आमचं दुसरं वर्ष. यावेळी वारीत आम्ही चाललो, ते फक्त पंढरपूरच्या दिशेने नव्हे; तर स्वतःच्या अंतरंगाकडेही. प्रत्येक माऊलीने नकळत जगण्याचा एक नवा धडा दिला. शिस्त, समर्पण, सामूहिकता, समाधान आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे नामातलं सुख. हरिनामाच्या गजरात चालण्याचा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असतो, डोक्यावर तुळस घेऊन चालण्याचा आत्मिक आनंद प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवावा. आमचा अनुभव शब्दातीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
दीपालीताई, आलात का वारीवरून?” वारीत भेटलेल्या दीपालीताईंना हा प्रश्न विचारायचीच खोटी! त्या भरभरून बोलू लागल्या. "खूप खेळलो ताई.फुगड्या घातल्या, नगरप्रदक्षिणा केली, कळसाला नमस्कार केला आणि मग घराची वाट धरली. वारीचे दिवस कसे गेले कळलंच नाही. आता घरी आल्यावर पुन्हा संसार सुरू झाला.”वारी संपली होती, पण वारीने दिलेलं समाधान अजूनही त्यांच्या प्रत्येक शब्दातून झिरपत होतं.यंदाची आमची, म्हणजे मी आणि माझी मैत्रीण डॉ. माधवीची ही दुसरी वारी. गेल्या वर्षी आम्ही दोघींनी ठरवलं होतं, जमेल तसं, पण दरवर्षी एक-दोन दिवस तरी वारी करायची.
 
जून महिना सुरू होताच, तयारीलाही सुरुवात झाली. आम्ही दोघी निघणार होतो; पण पाहता पाहता आमच्यासोबत आणखी सहाजणी वारीचा अनुभव घेण्यासाठी तयार झाल्या.हभप हणमंत महाराज यांच्या परवानगीने त्यांच्या गुरुवर्य वै. हभप ज्ञानोबा माऊली गोजेगावकर (बापू) यांच्या दिंडीत सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. मारुतीभाऊ आणि शिवाजीभाऊ यांनी यासाठी आम्हाला मोलाची मदत केली. मुंबईहून निघालेली आमची यात्रा सुपे गावापासून दिंडीसोबत पायी सुरू झाली.वारीतील प्रत्येक दिंडीचं वेळापत्रक अत्यंत काटेकोर असतं आणि गोजेगावच्या दिंडीचंही तसंच होतं. सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचं जेवण,
 संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण सगळं वेळेवर. भजन, कीर्तन, आरती, प्रसाद आणि पुन्हा पुढच्या टप्प्याकडे प्रस्थान.
 
जवळपास ६०० वारकर्‍यांचं रोजचं इतकं सुरळीत नियोजन पाहून मन थक्क होत होतं. एका दिवशी थोरातभाऊंच्या घरी दुपारच्या जेवणासाठी थांबलो असताना स्वयंपाकघरात डोकावलं. सात-आठमहिलांची लगबग सुरू होती. कोणी भाकर्‍या थापत होतं, कोणी पिठलं करत होतं, तर कोणी पंगतीची तयारी करत होतं. कुणी कुणाला आदेश देत नव्हतं; पण, प्रत्येकाला स्वतःचं काम आणि त्याची वेळ माहीत होती.वेळेवर पंगती उठत होत्या, दुसर्‍या बसत होत्या आणि दिंडी पुन्हा मार्गस्थ होत होती. दोन रांगांमध्ये शिस्तबद्ध चालणारे वारकरी, कुठेही गोंधळ नाही, आरडाओरडा नाही. सुनीता मंगल कार्यालयात मुक्कामाच्या ठिकाणी वीज नव्हती; तरी कीर्तन, आरती आणि जेवणावळी कोणतीही धावपळ न होता, सुरळीत पार पडल्या.मनात सहज विचार आला, या ग्रामीण महिलांनी कुठला ‘हॉटेल मॅनेजमेंट’चा अभ्यासक्रम केला असेल? पण लगेच उत्तरही मिळालं. हा व्यवस्थापनाचा धडा कोणत्याही महाविद्यालयात शिकवला जात नाही. तो शिकवते, निष्ठा, सामूहिक जबाबदारी आणि माऊलीवरील अखंड श्रद्धा.
 
दिंडीत सर्व वयोगटांतील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहून अनेक प्रश्न पडत होते. दहा-बारा दिवस घराचं नियोजन कसं करत असतील? घरची आठवण येत नसेल का? एवढं चालून पाय दुखत नसतील का?या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याच तोंडून ऐकताना वारीचं खरं तत्त्वज्ञान उमगत गेलं.दीपालीताई म्हणाल्या, "वारीला यायचं, म्हणजे आधी घरची सगळी कामं करून यावी लागतात. मुलांच्या खाण्यापिण्याची सोय, शेताची कामं सगळं आवरूनच निघतो. पण, एकदा दिंडीत आलो की घराची अजिबात आठवण येत नाही. हे १२ दिवस आम्ही आमच्यासाठी जगतो. भजन, कीर्तन आणि ‘राम कृष्ण हरी’मध्ये इतके रमून जातो की बाकी कशाचाच विचार मनात येत नाही.”लक्ष्मीवहिनी म्हणाल्या, "दिंडीत आल्यावर खूप आनंद मिळतो. या दहा-बारा दिवसांचा आनंद आम्हाला वर्षभर पुरतो. मग पुन्हा पुढच्या वारीचीच वाट पाहात राहतो.”
 
गेली १७ वर्षे अखंड वारी करणार्‍या सरस्वतीवहिनींचे शब्द तर मनाला भिडले. "कितीही अडचणी आल्या, तरी मी दिंडी चुकवत नाही. इथे आल्यावर वेगळंच बळ मिळतं.”डॉ. माधवी रात्री मेडिकल कॅम्पमध्ये वारकर्‍यांची तपासणी करत असे. रात्री ‘पाय खूप दुखतायत’, ‘ताप आल्यासारखं वाटतंय’, ‘पोट बिघडलंय’ म्हणणार्‍या त्या माऊली सकाळी मात्र डोक्यावर तुळस घेऊन झपाझप चालताना दिसायच्या. आम्ही विचारायचो, "काल तर पाय खूप दुखत होते ना?” त्या हसून म्हणायच्या, "अहो, काल दुखत होते; आता नाहीत!” या एका वाक्यात श्रद्धेचं सामर्थ्य दडलं होतं. शरीर थकत होतं; पण मन विठ्ठलनामात इतकं रमून जायचं की, वेदनांनाही मागे हटावं लागायचं.या चार दिवसांच्या वारीत आम्ही चाललो, ते फक्त पंढरपूरच्या दिशेने नव्हे; तर स्वतःच्या अंतरंगाकडेही. प्रत्येक माऊलीने नकळत जगण्याचा एक नवा धडा दिला. शिस्त, समर्पण, सामूहिकता, समाधान आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, नामातलं सुख!टाळ-मृदंगाच्या नादात, हरिनामाच्या गजरात चालण्याचा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असतो. काही काळ का होईना, डोक्यावर तुळस घेऊन चालण्याचा आत्मिक आनंद प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवावा.
पंढरीच्या काळ्या-सावळ्या विठुरायाची जादू अशीच असावी. एकदा त्याची वाट धरली की, पाय परत फिरतात, पण मन मात्र तिथेच रेंगाळत राहतं. पुढच्या आषाढीची वाट पाहात. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘भेटी लागे जिवा, लागलीसे आस...’ ही आस केवळ विठ्ठलाच्या भेटीची नसते; ती स्वतःला पुन्हा एकदा भेटण्याचीही असते.
 
- पूर्णिमा नार्वेकर




संबंधित मजकूर