_202608051409186544_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
क्षणभंगुर आभासी प्रसिद्धीपेक्षा चिरंतन कर्तृत्वालाच अधिक प्राधान्य देत, आपल्या अथक परिश्रमांनी यशाला गवसणी घालणार्या कबीर सोनोलेविषयी...
काच काळात जन्मलेली पिढी कधीच एकसारखी नसते. तिच्याही अंतरंगात अनेक प्रवाह एकाच वेळी वाहत असतात. काही प्रवाह डोळ्यांना लगेच दिसतात. त्यांच्याभोवती गर्दी जमते, टाळ्या वाजतात, घोषणाबाजी होते आणि क्षणभरासाठी तेच वास्तव असल्याचा भासही निर्माण होतो. पण, याच काळात काही प्रवाह शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता आपला मार्ग तयार करत असतात. आजच्या समाजाकडे पाहताना हे द्वैत अधिक प्रकर्षाने जाणवते. एका टोकाला क्षणिक प्रसिद्धीच्या झगमगाटात आणि समाजमाध्यमांवरील आभासी दुनियेत रमलेला एक वर्ग आहे; तर दुसर्या टोकाला त्याच वयाची असंख्य मुले आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून परिश्रमांतून संधीचे सोने करत आहेत. कुणी विज्ञानाच्या विश्वात नवी क्षितिजे गाठत आहे, कुणी वेदपरंपरेत नवे विक्रम प्रस्थापित करत आहे, तर कुणी आपल्या कर्तृत्वाने देशाचे नाव सीमांपलीकडे पोहोचवत आहे. ऐरोलीचा कबीर सोनोले हा अशाच तेजस्वी प्रवाहाचा एक प्रतिनिधी!
२०१३ साली सामान्य मराठी कुटुंबात जन्मलेल्या कबीरच्या आयुष्याची सुरुवात इतर मुलांसारखीच झाली. वडील निलेश सोनोले पोलीस दलात कार्यरत, तर आई प्रेरणा सोनोले या रुईया महाविद्यालयाच्या ग्रंथालयात कार्यरत. त्यामुळे घरात शिस्त, ज्ञान आणि राष्ट्रप्रेमाचा संस्कार नकळत रुजत गेला. वयाच्या चौथ्याच वर्षी कबीरची ओळख पाण्याशी झाली. मोठा भाऊ जलतरणाचा सराव करत असल्याने, त्याबरोबर कबीरही जलतरण तलावात उतरू लागला. सुरुवातीला तो केवळ खेळ होता; पण खेळताखेळता पाण्याची भीती नाहीशी झाली आणि त्या निळ्याशार पाण्याशी त्याची आयुष्यभराची मैत्री जुळली.
पालकांनी मुलाच्या या आवडीकडे केवळ छंद म्हणून पाहिले नाही. पाण्यातील त्याची सहजता, शिकण्याची गती आणि खेळाविषयीचा ओढा त्यांनी अचूक हेरला. योग्य प्रशिक्षण मिळाले तर हा मुलगा मोठी झेप घेऊ शकतो, हा विश्वास त्यांनी मनाशी बाळगला आणि त्याला नियोजनबद्ध जलतरण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. समवयस्क मुले सुट्यांचा आणि मोकळ्या वेळेचा आनंद विविध प्रकारे घेत असताना, कबीरला मात्र जलतरण तलावाचीच ओढ असे. त्याला स्पर्धेपेक्षा खेळ शिकण्यात अधिक रस होता. जलतरणातील प्रत्येक बारकावे, प्रत्येक तंत्र आणि प्रत्येक हालचाल आत्मसात करण्यासाठी त्याने तब्बल चार-पाच वर्षे मेहनत घेतली. घाईघाईने पदके जिंकण्यापेक्षा स्वतःला खेळाडू म्हणून घडवण्यावरच त्याने भर दिला. त्याच पायावर त्याचा पुढचा प्रवास उभा राहिला.
वयाच्या दहाव्या वर्षी, २०२३ मध्ये, कबीरने पहिली राज्यस्तरीय स्पर्धा खेळली आणि त्याच वर्षी त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडही झाली. पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत ५० स्पर्धकांमध्ये आठवा क्रमांक मिळवणे, ही नवोदित खेळाडूसाठी उल्लेखनीय कामगिरीच होती. सभोवतालच्या सर्वांनीच त्याचे कौतुक केले; पण कबीरच्या मनात मात्र हुकलेल्या पदकाचीच सल होती. त्याने ती खंत निराशेत बदलू दिली नाही. पुढील स्पर्धेत पदक जिंकायचेच, एवढाच निर्धार त्याने केला.
मात्र, प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला संघर्ष येतोच. सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे कबीरला तब्बल दोन महिने पाण्यापासून दूर राहावे लागले. खेळाडूसाठी हा काळ शारीरिकपेक्षा मानसिकदृष्ट्याही कठीण असतो. अशा वेळी त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत, त्याला मानसिक आधार दिला. आईने त्याच्या आहाराची काटेकोर जबाबदारी घेतली व आजतागायत त्या ती निभावत आहेत. यामुळे कबीरने पुनरागमन केले आणि नव्या जोमाने सराव सुरू केला.
त्या जिद्दीचे फळ फार लवकरच मिळाले. २०२४च्या राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना, त्याने राष्ट्रीय स्पर्धेतही ‘सुवर्णपदक’ पटकावले, तर ‘रिले’ प्रकारात ‘कांस्यपदका’ची कमाई केली. राष्ट्रीय स्तरावरील हे त्याचे पहिलेच ‘सुवर्णपदक.’ २०२५ मध्येही त्याने राष्ट्रीय स्पर्धेत ‘कांस्यपदक’ जिंकत सातत्याची परंपरा कायम राखली. सध्या तो राजस्थानमध्ये आपल्या चौथ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला असून, याही वेळी ‘सुवर्णपदक’ जिंकण्याचा आत्मविश्वास त्याने बाळगला आहे.
कबीरच्या या यशामागे त्याची जिद्द आहेच; पण त्याचबरोबर पालकांचा त्याग, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची आहे. त्याचा दिवस पहाटे ४.३० वाजता सुरू होतो. पहाटे ५ ते ६.३० जलतरणाचा सराव, त्यानंतर शाळा, संध्याकाळी तंदुरुस्तीसाठी व्यायामशाळा आणि रात्री ९ ते ११ पुन्हा जलतरणाचा सराव, हा दिनक्रम रोज न चुकता सुरू असतो. या प्रवासात प्रशिक्षक अनिकेत सुपले, स्वतेज कोळंबकर आणि सत्यम साई यांचे योगदानही तितकेच मोलाचे आहे.
आज आठवीत शिकणार्या कबीरने जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये शंभरहून अधिक पदके जिंकली आहेत. खेळाइतकाच अभ्यासातही तो प्रगतिशील असून, इयत्ता सातवीत त्याला ९० टक्के गुण मिळाले. अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स हा त्याचा आदर्श. जलतरणातील सर्व प्रकारांत भारतासाठी ‘ऑलिम्पिक’ पदके जिंकण्याचे, तसेच ‘राष्ट्रकुल’ स्पर्धांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचा ‘तिरंगा’ अभिमानाने फडकविण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे. लहानग्या वयात देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न बाळगणार्या कबीर सोनोले याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
- कौस्तुभ वीरकर