महिलाद्वेष्टी काँग्रेस

    05-Aug-2026   
Congress Anti-Women Remarks

 
राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ संबोधून काँग्रेसने पुन्हा एकदा महिलाद्वेष्टेपणाचाच परिचय पुनश्च करून दिला. राज्याच्या महिला उपमुख्यमंत्र्यांविषयी अशी टिप्पणी करताना काँग्रेसला लाज वाटायला हवी. कारण, मुळात ज्या पक्षाचे अध्यक्षपद इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांसारख्या महिलांनीच एकेकाळी भूषविले, आज त्याच काँग्रेसचे नेते एका राज्याच्या महिला उपमुख्यमंत्र्यांविषयी अशी भाषा वापरतात, यावरून काँग्रेसचा दुटप्पीपणाच दिसून येतो. पण, काँग्रेसकडून महिलांचा पहिल्यांदाच अपमान, उपमर्द वगैरे झाला, असे मुळीच नाही. कारण, महिलांच्या अपमानापासून ते कार्यकर्त्यांच्या अत्याचारापर्यंत काँग्रेसचा याबाबतचा पूर्वेतिहासच हा पुरेसा बोलका ठरावा.
 
काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान कंगना राणावत यांच्यावर ‘मंडी में क्या भाव चल रहा हैं’ अशा शब्दांत ‘ट्विट’ करून अश्लाघ्य टीका केली होती. यावरून वादंग होताच ‘ते ट्विट मी केले नाही’ अशी सारवासारवही त्यांनी केली. तसेच काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनीही हरियाणातील एका सभेत भाजप खासदार हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. एवढेच नाही, तर काँग्रेसमधील महिला कार्यकर्त्यांनीही वेळोवेळी अत्याचाराचे, शोषणाचे आरोपही कार्यकर्त्यांवर, नेतेमंडळींवर केले. केरळम्मधील काँग्रेस नेत्या सिमी रोझबेल जॉन यांनी पक्षातील महिलांच्या शोषणाची संस्कृती असल्याचा जाहीर आरोप केला होता. या आरोपानंतर उलट काँग्रेसने जॉन यांच्यावरच शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली, तर पश्चिम बंगाल प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रमुख श्रबंती सिंग यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शुभंकर सरकार यांच्यावर महिला कार्यकर्त्यांचा छळ आणि अपमानाचे आरोप केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या महिलांवरील अत्याचारांची यादी मोठीच. आता सुनेत्रावहिनींना ‘गुंगी गुडिया’ म्हणून हिणवणे, हा केवळ त्यांचाच अपमान नाही, तर महाराष्ट्रातील तमाम महिलावर्गाचा आणि ज्या अजितदादांनी आपली बहुतांश कारकीर्द काँग्रेससोबत घालवली, त्यांच्या स्मृतींचाही अपमानच! एकीकडे देवाभाऊंचे सरकार महिलांचा सन्मान करीत असताना, दुसरीकडे काँग्रेसकडून महिला उपमुख्यमंत्र्यांचा होणारा अपमान हा त्या पक्षाच्या ढासळलेल्या संस्कृतीचेच द्योतक ठरावा.
 
उर्मट उदयनिधी
 
सत्ता हातची गेल्यानंतरही तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे दिवटे आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधीला आपल्या वाचाळवाणीला लगाम घालता आलेला नाहीच. पण, आता सत्तेत नसतानाही उदयनिधीकडून होणारी उथळ विधाने ही निव्वळ राजकीय अहंकार आणि घराणेशाहीचा दर्पच अधोरेखित करणारी ठरावी. कालही तामिळनाडूत उदयनिधीच्या अशाच एका टिप्पणीने नवीन वादाला तोंड फोडले आणि हा वाद अगदी न्यायालयापर्यंतही गेला.
 
त्याचे झाले असे की, कावेरी नदीच्या जलवाटपासंबंधी सभेला उदयनिधी संबोधित करीत होता. यावेळी समोरच्या गर्दीतून ‘तृषा...तृषा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. ही तृषा कोण, तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची खास मैत्रिण. आता या घोषणा ऐकल्यानंतर उदयनिधीने खरेतर त्याकडे दुर्लक्ष करणेच अपेक्षित होते. पण, समोरच्या घोषणांनी उदयनिधीलाही चेव चढला आणि तृषाचे नाव न घेता, "पाणी इतर कुठेही पोहोचो वा न पोहोचो, ते तिथे मात्र पोहोचलेच पाहिजे,” असे म्हणून पुढे लगेचच, "माझा उद्देश कावेरीबद्दल बोलण्याचा होता,” अशीही सारवासारव केली. उदयनिधीने साधलेली ही द्वयर्थी टिप्पणी निश्चितच निंदनीय होती. मुख्यमंत्री विजय यांच्यावर, सरकारच्या ध्येय-धोरणांवर विरोधी पक्षनेते म्हणून उदयनिधीला टीकेचा अधिकार आहेच; पण मुख्यमंत्र्यांच्या खासगी आयुष्यातील व्यक्तीवर अशी खोचक टिप्पणी करणे, हे राजकीय अपरिपक्वतेचेच लक्षण म्हणावे लागेल. मग काय, प्रकरण पोलिसांत आणि लगोलग न्यायालयातही गेले. न्यायालयाने उदयनिधीच्या मुक्ततेचे आदेश पोलिसांना दिले; पण पोलीस, कोर्टकचेरीला उदयनिधी तसा सरावलेलाच. कारण, सनातनची तुलना डेंग्यू, मलेरियाशी करून त्याच्या उच्चाटनाची नीच भाषा करणार्‍या उदयनिधीला न्यायालयानेही चांगलेच झापले होते. पण, उदयनिधीसारख्यांना त्याची ना खंत ना खेद. त्यामुळे मुख्यमंत्री विजय यांनी पोलीस कारवाईतून चांगलाच इंगा दाखवून उर्मट उदयनिधीला सूचक इशारा दिला आहे. त्यातून उदयनिधीने धडा घेतला तर ठीक. कारण, आता दीर्घकालीन बचावासाठी सत्तेची कवचकुंडले हाती नाहीत, हे ध्यानी
असलेले बरे!
 




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
संबंधित मजकूर