अभियंत्यांच्या बदल्या आता रँडमायझेशन पद्धतीने; मानवी हस्तक्षेपाला आळा

    05-Aug-2026
BMC Engineers Transfer
 
मुंबई : (BMC Engineers Transfer) महानगरपालिकेने अभियंत्यांच्या बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता आणण्यासाठी सॉफ्टवेअर आधारित ऑनलाइन बदली प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) विभागाने यासाठी रँडमायझेशनवर आधारित नवी प्रणाली विकसित केली असून ती ऑक्टोबर २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.
 
अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पक्षपात आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. हा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही गाजला होता. आरोपांनंतर बदली प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्याचबरोबर तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त अमित सैनी यांचीही बदली करण्यात आली होती. मात्र, या आरोपांबाबतची अधिकृत चौकशी आणि निष्कर्षाची प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू आहे. (BMC Engineers Transfer)
 
नव्या प्रणालीअंतर्गत उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाइन रँडमायझेशन पद्धतीने करण्यात येतील. विविध विभागांतील रिक्त पदे आणि बदलीस पात्र अभियंत्यांची संपूर्ण माहिती सॉफ्टवेअरमध्ये नोंदवली जाईल. त्यानंतर उपलब्ध रिक्त पदे आणि निश्चित निकषांच्या आधारे सॉफ्टवेअर आपोआप नवीन पदस्थापना निश्चित करेल. (BMC Engineers Transfer)
 
महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप अत्यल्प राहील. त्यामुळे शिफारस किंवा प्रभावाच्या आधारे पसंतीच्या विभागात बदली मिळाल्याच्या तक्रारी कमी होतील आणि बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल. (BMC Engineers Transfer)
 
महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रिक्त पदे आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन सॉफ्टवेअर स्वयंचलितपणे पदस्थापना करेल. त्यामुळे मॅन्युअल हस्तक्षेपाची शक्यता अत्यंत कमी राहील आणि बदली प्रक्रियेवरील अभियंत्यांचा विश्वास अधिक दृढ होईल. (BMC Engineers Transfer)
 
दरम्यान, भाजप आमदार अमित साटम यांनी या पारदर्शक व्यवस्थेचे स्वागत केले. मात्र, बदली करताना अभियंत्यांच्या विभागनिहाय तांत्रिक कौशल्याचाही विचार व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले. एखादा अभियंता अनेक वर्षे जल विभागात कार्यरत असेल तर त्याला अचानक कीटकनाशक नियंत्रणासारख्या पूर्णपणे वेगळ्या विभागात पाठवणे योग्य ठरणार नाही. अभियंते दीर्घ अनुभवातून विशिष्ट तांत्रिक कौशल्य विकसित करतात, त्यामुळे बदली धोरणात त्यालाही महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. (BMC Engineers Transfer)
 
उल्लेखनीय म्हणजे, काही महिन्यांपूर्वी पालिकेमध्ये एकाचवेळी सुमारे १९० अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्यांमध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. भाजपचे मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित केला होता. त्यानंतर बदली प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. आता ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने पालिकेने पाऊल उचलले आहे. (BMC Engineers Transfer)
 
 




संबंधित मजकूर