मुंबई : (Jantar Mantar Movement) नीट पेपरफुटी प्रकरणावरून जंतर-मंतर येथे झालेल्या सीजेपीच्या आंदोलनात अल्पवयीन मुलांचा सहभागावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. अॅड. रिंकी चॅटर्जी सिंह यांनी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी क्राइम ब्रँचमध्ये सौरव दास, अभिजित दिपके आणि आंदोलनाच्या आयोजकांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत झिरो एफआयआर दाखल करण्याबाबत तक्रार दाखल केली आहे. आंदोलनात १२ वर्षांच्या मुलीला का सहभागी करून घेण्यात आले, असा प्रश्नही त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला आहे.
अॅड. रिंकी चॅटर्जी सिंह यांच्या मते, आंदोलनाच्या आयोजकांविरोधात पॉक्सो कायद्याच्या कलम १३, १४ आणि १५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांनी सांगितले की, २० जुलै रोजी जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असताना पोलिसांनी लाठीमार केला. या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचाही वापर करण्यात आला.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह व्हिडिओ पोस्ट करून, आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांनी केलेल्या अशोभनीय वक्तव्यांबद्दल त्यांना माफ करत असल्याचे आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नसल्याचे म्हटल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.(Jantar Mantar Movement)
तक्रारीनुसार, अभिजित दिपके आणि सौरव दास यांनी १२ वर्षांच्या मुलींवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आणि त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी करणारे व्हिडिओ प्रसिद्ध केले. यावर प्रतिक्रिया देताना अॅड. रिंकी चॅटर्जी सिंह यांनी प्रश्न उपस्थित केला की, एवढ्या लहान मुलींना आंदोलनात कोण घेऊन आले?
ज्या वयात त्यांना संरक्षणाची गरज असते, त्या वयात त्यांना आंदोलनात सहभागी का करण्यात आले?
यासाठी आयोजकांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई व्हावी, अशी त्यांनी मागणी केली. तसेच, या आंदोलनाला निधी कोण पुरवत आहे आणि हा पैसा कुठून येत आहे, याचाही शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.(Jantar Mantar Movement)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक