आसमंत : विचारापासून कृतीपर्यंतचा प्रवास

    05-Aug-2026
 
 
Aasamant Foundation
 
 
 आज अनेक संस्था समाजहिताची उद्दिष्टे जाहीर करतात; परंतु उद्दिष्टे निश्चित करणे आणि ती सातत्यपूर्ण, परिणामकारक कृतीत उतरवणे, यात मोठा फरक असतो. ‘आसमंत’ ही संस्था याच कृतिप्रधान दृष्टिकोनामुळे वेगळी ठरते. लहान मुलांचा सर्वांगीण विकास, भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार आणि निसर्ग व पर्यावरणाचे संवर्धन ही ‘आसमंत’ची तीन प्रमुख कार्यक्षेत्रे असून या प्रत्येक क्षेत्रात केवळ उपक्रम नव्हे, तर दीर्घकालीन परिणाम घडवणारे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्यानिमित्ताने ‘आसंमत’ संस्थेचे कार्यविचार मांडणारा हा लेख...
 
विद्यार्थी हे राष्ट्राचे भविष्य आहेत, या विश्वासातून ‘आसमंत’ने अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांशी सामंजस्य करार करून ज्ञानाधिष्ठित उपक्रमांची प्रभावी साखळी उभी केली आहे. विविध विषयांवरील कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शाळा-महाविद्यालयांना अभ्यासपूर्ण पुस्तकांच्या भेटी, प्रयोगशाळांसाठी आवश्यक उपकरणांचे साहाय्य आणि शैक्षणिक संस्थांसमवेत संयुक्त संशोधन प्रकल्प अशा अनेक माध्यमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. शिक्षण केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न राहता, संशोधन, निरीक्षण आणि प्रत्यक्ष कृतीशी जोडले जावे, हा या प्रयत्नामागील मूलभूत विचार आहे.
 
भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातही ‘आसमंत’ने वेगळी वाट निवडली आहे. केवळ मैफिली आयोजित करून किंवा नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, एवढ्यावर न थांबता, शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास वाढावा, यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. नवोदित गायकांकडून अनवट, दुर्मीळ किंवा क्वचित सादर होणार्‍या रागांचे सादरीकरण करून ते दर महिन्याला आसमंतच्या युट्यूब वाहिनीवर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई’'Aasamant-Ratnagiri’ प्रकाशित केले जाते. त्यामुळे रसिकांना नवे राग ऐकण्याची संधी मिळते, कलाकारांना अभ्यासाची प्रेरणा मिळते आणि भारतीय संगीताची समृद्ध परंपरा जतन होण्यास हातभार लागतो. नियमित शास्त्रीय संगीत कार्यक्रम, अभ्यासपूर्ण सादरीकरणे आणि संगीतसंवर्धनाचे विविध उपक्रम या कार्याला अधिक बळ देतात. निसर्ग आणि पर्यावरण ही केवळ चर्चेची नव्हे, तर कृतीची क्षेत्रे आहेत. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाच्या अस्तित्वाशी त्यांचा थेट संबंध आहे. ही जाणीव ठेवून ‘आसमंत’ने पर्यावरण संवर्धनासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांपैकी ‘आसमंत जैवविविधता उद्यान’ हा केवळ एक उद्यान प्रकल्प नसून भविष्यातील शाश्वत शहरांचा एक आदर्श नमुना आहे. अशा प्रकारची शहरी वने केवळ हवेचे शुद्धीकरण करत नाहीत, तर कीटक, फुलपाखरे, पक्षी आणि इतर असंख्य जीवांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करतात. स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांसाठी विश्रांतीस्थळे उपलब्ध करून देतात आणि शहरांमध्ये हरवत चाललेल्या जैवविविधतेचे संवर्धन करतात. आजच्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.
 
सागरी पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने ‘आसमंत’चा ’SEAVERSE’ सागर महोत्सव हा एक महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. सागराविषयी आदर, वैज्ञानिक दृष्टी, संवेदनशीलता आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू झालेला हा महोत्सव आता पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे. प्रत्येक वर्षी अधिक व्यापक स्वरूप धारण करत हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करत आहे. देशातील वरिष्ठ वैज्ञानिक, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (NIO), कोकण कृषी विद्यापीठ, तसेच अनेक नामांकित शैक्षणिक संस्था या महोत्सवाशी जोडल्या गेल्या आहेत.
 
शासनाचेही या उपक्रमाला सहकार्य लाभत असून, विज्ञान, शिक्षण आणि समाज यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून हा महोत्सव विकसित होत आहे. संशोधन हा पर्यावरण संवर्धनाचा पाया आहे. या जाणिवेतूनच ‘आसमंत’ने गेल्या वर्षी कोकण किनारपट्टीवरील सागरी किल्ल्यांच्या परिसरातील दोन ऋतूंमधील फौना आणि जैवविविधतेचा अभ्यास पूर्ण केला. अशा प्रकारचे क्षेत्राधारित वैज्ञानिक दस्तऐवजीकरण भविष्यातील संवर्धन धोरणांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. निरीक्षण, नोंद, विश्लेषण आणि संशोधन यांच्या आधारे निसर्ग समजून घेण्याचा हा प्रयत्न संस्थेच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची साक्ष देतो.‘आसमंत’चा प्रवास हा केवळ संस्थेचा प्रवास नाही; तो समाज, विज्ञान, संस्कृती आणि निसर्ग यांना एका समान धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न आहे. ज्ञान, संस्कार, संशोधन आणि संवर्धन यांच्या आधारावर समाजात दीर्घकालीन सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा हा संकल्प आहे. आज पेरलेली ही बीजे उद्याच्या सक्षम, संवेदनशील आणि पर्यावरणजागरूक भारताचे भक्कम पायाभूत कार्य ठरतील, याची खात्री वाटते.
 
(लेखक ’आसमंत बेनवोलेन्स फाऊंडेशन’ चे
संस्थापक-संचालक आहेत.)
- नंदकुमार पटवर्धन




संबंधित मजकूर