बंगालमध्ये ‘जैश’शी संबंधित जाळे उद्ध्वस्त!

    04-Aug-2026
Jaish-e-Mohammed
 
भारतद्वेष या एकाच ध्येयासक्तीने पछाडलेला पाकिस्तान हरतर्‍हेने भारताचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी त्यांचे अनेक हस्तक भारतात आहेत. देशातील कोणत्याही अनुचित घटनेचा लाभ भारतविरोधी कारवाईसाठी कसा उचलता येईल, यासाठी ते प्रयत्नशील असतात. हेच प. बंगालमध्ये अटक केलेल्या पाकी हस्तकांच्या चौकशीअंती सिद्ध झाले आहे.
 
पश्चिम बंगालमध्ये कार्यरत ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेशी संबंधित एक जाळे, पोलिसांनी नुकतेच उद्ध्वस्त केले. आपल्या पाकिस्तानमधील हस्तकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या हस्तकांकडे राजकीय नेत्यांचा मागोवा घेणे, जी आंदोलने होतात त्यावर लक्ष ठेवणे, भविष्यात ज्या दहशतवादी कारवाया करायच्या आहेत, त्यासंदर्भातील माहिती गोळा करणे आदी जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या होत्या. प. बंगाल सरकारच्या विशेष पथकाने ‘जैश’शी संबंधित हे जाळे उद्ध्वस्त केले. राजकीय नेते, पोलीस अधिकारी आणि देशभर आयोजित केल्या जाणार्‍य सार्वजनिक सभा या संदर्भातील माहिती, या हस्तकांकडून पाकिस्तानपुरस्कृत यंत्रणेला पुरविली जात असल्याचा संशय आहे. जे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले, त्यात सहभागी असलेल्यांवर, त्वरित दहशतवादी हल्ला न करता आवश्यक ती माहिती गोळा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या हस्तकांकडून जी इलेट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली, त्यांची सखोल तपासणी करता, मोंडल आणि सरकार या नावाचे दोन आरोपी पाकिस्तानमधून सूचना घेत असल्याचे आढळले. या हस्तकांचा पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’शी; तसेच शाहजाद भट्टी याच्या हस्तकांशी संबंध असू शकतो, असा तपास करणार्‍या पथकास संशय वाटतो.
 
भारतात दंगेधोपे करण्यासाठी भरती करणे आणि भारतात कार्यरत असलेल्या हस्तकांना मार्गदर्शन करणे यामध्ये हे हस्तक गुंतल्याचा संशय आहे. पाकिस्तानस्थित हस्तक भारतातील आपल्या हस्तकांना राजकीय हालचाली, सार्वजनिक निदर्शने आणि जेथे जमाव मोठ्या संख्येने जमतो, अशा कार्यक्रमांवर लक्ष देण्यास सांगण्यात आले होते. तसेच भारतातील नेत्यांना मोहजालात गुंतवून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती काढून घेण्याची योजना आहे का, याची माहिती गोळा केली जात आहे. या सर्व कामामध्ये शाहजाद भट्टी आणि त्याच्या हस्तकांची मोठी भूमिका असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी जे डिजिटल पुरावे, आर्थिक देवाणघेवाण झाल्यासंदर्भातील पुरावे आणि संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून मिळालेली माहिती याची छाननी तपास पथकाकडून केली जात आहे.
 
‘जैश’ची प. बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना ठार मारण्याची योजनाही होती. तसेच एका ज्येष्ठ मंत्र्याच्या मुलास मोहजालात अडकविण्याची आणि राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर अलीकडेच झालेल्या निदर्शनामध्ये घुसखोरी करण्याचा मानसही त्यांचा होता. ‘जैश’चा हस्तक हमीम मोंडल याला पाकिस्तानमधील हस्तकांकडून सूचना मिळत होत्या, असाही संशय आहे. मोंडल याला बर्धमान येथून, गेल्या दि. ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी हमीमची साथीदार असलेल्या अर्पिता सरकारला, शेजारच्या झारखंड राज्यातील साहिबगंज येथून अटक केली. पोलीस त्या दोघांची कसून चौकशी करीत आहेत. प. बंगालमधील एका मंत्र्याच्या मुलास मोहजालात अडकविण्याची आणि त्यासाठी अर्पिता सरकारकडे जबाबदारी सोपविण्याची ‘जैश’ची योजना होती. जंतरमंतरवरील निदर्शनांमध्ये आपली माणसे घुसवून हे आंदोलन अधिक कसे पेटेल, यादृष्टीनेच हा हस्तकांकडून पावले टाकली जात होती.
 
भारतात दहशतवादी कारवाया करून, प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करून, मंत्र्याच्या मुलाला मोहजालात अडकवून भारतात अधिकाधिक अस्थिरता कशी निर्माण करता येईल, असा ‘जैश’चा हेतू होता. पण, प. बंगाल पोलिसांच्या विशेष पथकाने वेळीच हे जाळे नष्ट केले. पाकिस्तानचे हस्तक देशाच्या विविध भागांमध्ये कार्यरत असल्याचे अशाच घटनांवरून लक्षात येते. अशा हस्तकांचा बंदोबस्त करण्यासाठी, पोलिसांच्या बरोबरीने जनतेनेही सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
 
कर्नाटकात परीक्षेत घोटाळा! 
 
कर्नाटकात सध्या काँग्रेसची राजवट असून, डी. के. शिवशंकर हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची जबाबदारी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांच्याकडे आहे. कर्नाटकात पोलीस भरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत अनियमितता आढळली आहे. ही परीक्षा सुरळीत घेण्यात, तेथील काँग्रेस सरकारला सातत्याने अपयश आल्याचा आरोपही कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला. राज्यसभेत ‘नीट’ परीक्षेसंदर्भात बोलताना, मल्लिकार्जुन खर्गे यांनी खूपच बोंबाबोंब केली होती. (बोंबाबोंब हा शब्दच खर्गे यांनी जी भाषा वापरली होती, त्यास योग्य ठरेल.) ‘नीट’ परीक्षेवरून केंद्र सरकारला धारेवर धरणार्‍या काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना, आपल्या कर्नाटक राज्यात काय चालले आहे, हे मात्र दिसले नाही. आपल्या पायाखाली काय जळत आहे, हे त्यांच्या लक्षात कसे आले नाही? आपल्या पक्षाच्या हातात जे राज्य आहे, त्या कर्नाटकात अनेक घोटाळे होत असताना त्यांचे निराकरण करायचे सोडून, केंद्र सरकारवर आगपाखड करण्यात त्यांची जीभ धजतेच कशी?
 
दि. २ ऑगस्ट रोजी पोलीस भरतीसाठीची लेखी परीक्षा घेण्यात आली. पण, त्या परीक्षेच्या काळात विविध केंद्रांवर गैरप्रकार घडले. त्याबद्दल परीक्षार्थींनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. भाजप नेते आर. अशोक यांनी, ‘या प्रकाराबद्दल गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे,’ अशी मागणी केली आहे. कर्नाटक पोलीस दलातील ३ हजार, ९९१ पदांसाठी, या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेत त्रुटी ठेवून शासन हजारी तरुणांच्या भवितव्याशी खेळत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. परीक्षा पद्धतीचे पारदर्शी आणि व्यावसायिक व्यवस्थापन करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही भाजपने केला. या परीक्षेत जी अनियमितता दिसली, त्याची स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री शिवकुमार यांनी परीक्षार्थींना न्याय द्यावा, अशी मागणीही विरोधी नेते अशोक यांनी केली आहे. आपल्या राज्यात घेतल्या जाणार्‍या परीक्षा योग्य प्रकारे घ्यायच्या नाहीत आणि ‘नीट’ परीक्षेवरून जे कथित आंदोलन झाले, त्यात आपली पोळी भाजून घ्यायची, हा काँग्रेसचा हेतू जनतेच्या लक्षात आल्यावाचून राहिला असेल का?

‘बीबीसी इंडिया’कडून संघ वृत्त देण्यावर बंदी?
 
‘बीबीसी’चे ज्येष्ठ पत्रकार रेहान फजल यांनी ‘बीबीसी इंडिया’कडून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भातील बातम्या दाबून टाकल्या जात आहेत किंवा त्या नाकारल्या जात आहेत किंवा अशा बातम्यांना, माहितीपटांना उशिराने प्रसिद्धी दिली जात असल्याचा आरोप एका चर्चेदरम्यान केला. ‘डबल चेक’ या पॉडकॉस्टवरील कार्यक्रमात बोलताना, रेहान फजल यांनी हा दावा केला आहे. रेहाना फजल हे ‘बीबीसी’च्या सेवेत प्रदीर्घ काळ राहिले आहेत. त्या संस्थेतील संपादकीय प्रक्रिया कशी असते, यासंदर्भातील त्यांचा स्वत:चा अनुभव या चर्चेदरम्यान त्यांनी कथन केला. काही विशिष्ट विचारसरणीने प्रभावित असलेल्या संपादकीय मंडळींकडून, असे निर्णय घेतले जात असल्याची टीकाही ‘बीबीसी’वर खूप पूर्वीपासून होत आहे. ‘बीबीसी इंडिया’ बातम्या देताना किंवा अन्य कार्यक्रम सादर करताना, पक्षपातीपणा करीत असल्याचे फजल यांच्या वक्तव्यावरून दिसते. संघासंदर्भातील कार्यक्रम प्रसिद्धीसाठी तयार झाले असताना, त्यास संपादकीय मान्यता न मिळाल्याने ते प्रदर्शित होऊ शकले नाहीत, असाही आरोप त्यांनी केला.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरूजी यांच्यावरील एक माहितीपट तयार करण्यात आला होता. त्या महितीपटास पूर्वअनुमती घेण्यात आली असतानाही, त्याचा प्रदर्शनास विलंब करण्यात आला. असे प्रकार केवळ एखाददुसर्‍या कार्यक्रमाबाबत घडलेले नाहीत; तर सातत्याने अशा घटना घडल्याकडे फजल यांनी लक्ष वेधले. ‘बीबीसी’ची निष्पक्ष कार्यक्रम करण्याबद्दल एकेकाळी ख्याती होती. पण, आताची ‘बीबीसी इंडिया’ ही संस्था तशी राहिली नाही, असाच या सर्वांचा अर्थ!
 
- दत्ता पंचवाघ 




संबंधित मजकूर