मुंबई मेट्रोचा ३० कोटी प्रवाशांचा टप्पा; मुंबई मेट्रोवर मुंबईकरांचा वाढता विश्वास

Mumbai Metro
 
मुंबई : (Mumbai Metro) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) संचलित मेट्रो नेटवर्कने ३० कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी हा विक्रम नोंदविण्यात आला असून, वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला मुंबईकरांकडून मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादाचे हे द्योतक मानले जात आहे.
 
एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिका २अ (दहिसर पूर्व-अंधेरी पश्चिम), मार्गिका ७ (दहिसर पूर्व-गुंदवली), मार्गिका २ब (टप्पा-१) (डायमंड गार्डन-मंडाळे) आणि मार्गिका ९ (टप्पा-१) (दहिसर पूर्व-काशीगाव) या चार मार्गिकांवर मिळून हा टप्पा पूर्ण झाला आहे.(Mumbai Metro)
 
विशेष म्हणजे, शेवटचे ५ कोटी प्रवासी अवघ्या १७९ दिवसांत नोंदविण्यात आले असून, मेट्रो सेवा सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात वेगवान प्रवासी वाढीचा टप्पा ठरला आहे. या कालावधीत सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७० लाखांवरून २.७९ लाखांपर्यंत पोहोचली असून, त्यात सुमारे ३.३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. शनिवार-रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि हंगामी प्रवासाचा परिणाम असूनही प्रवासीसंख्येतील वाढ कायम राहिल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले.(Mumbai Metro)
 
दि. ७ एप्रिल २०२६ रोजी मेट्रो मार्गिका २ब (टप्पा-१) आणि मार्गिका ९ (टप्पा-१) सुरू झाल्यानंतर नेटवर्कमध्ये नऊ नवीन स्थानकांची भर पडली. त्यामुळे संपर्कक्षमता वाढली आहे. दि.२ एप्रिल २०२२ रोजी सुरू झालेल्या या मेट्रो नेटवर्कने अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत ३० कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला आहे. पहिल्या ५० लाख प्रवाशांच्या तुलनेत आजची सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या सुमारे ९.४ पट वाढली असून, १० कोटी ते १५ कोटी प्रवाशांच्या टप्प्याच्या तुलनेतही सध्याची दैनंदिन प्रवासीसंख्या २३ टक्क्यांहून अधिक वाढली आहे.(Mumbai Metro)
 
“३० कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठणे हा एमएमआरडीए आणि महामुंबई मेट्रोसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. अलिकडचे ५ कोटी प्रवासी केवळ १७९ दिवसांत नोंदवले गेले आणि दररोज सरासरी जवळपास २.८ लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत, यावरून मेट्रो ही मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याचे स्पष्ट होते.”(Mumbai Metro)
 
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए (Mumbai Metro)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर