मुंबई : (Metro Expansion) महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून, २०३० पर्यंत ३०० किलोमीटरहून अधिक नवीन मेट्रो मार्ग सुरू करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत राज्यातील विविध मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Metro Expansion)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारण्यात येत आहे. सध्या १७४ किलोमीटर मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू झाले असून २९१ किलोमीटर मार्गांवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे. याशिवाय १३० किलोमीटर मार्ग मंजुरीच्या प्रक्रियेत, तर ८७.१५ किलोमीटर मार्गांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहेत.(Metro Expansion)
राज्यात सुमारे २ लाख ८० हजार ७५५ कोटी रुपयांचे मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामध्ये केंद्र सरकारचा २७ हजार २१६ कोटी, राज्य सरकारचा ५० हजार २५० कोटी, तर एमएमआरडीए, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नियोजन प्राधिकरणांकडून ७५ हजार ७२९ कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध होणार आहे. उर्वरित निधी शासन हमी कर्जाद्वारे उभारण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली.(Metro Expansion)
६८३ किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क
राज्यात प्रस्तावित आणि कार्यान्वित मेट्रो जाळ्याची एकूण लांबी ६८३.५३ किलोमीटर इतकी होणार आहे. त्यामध्ये मुंबई महानगर प्रदेशात ४२८.८९ कि.मी., पुणे महानगर प्रदेशात १६९.४५ कि.मी. आणि नागपूर महानगर प्रदेशात ८५.२० कि.मी. मेट्रो नेटवर्कचा समावेश आहे. राज्य सरकारने वर्षनिहाय नियोजन केले असून, चालू वर्षात ८७ किलोमीटर लांबीचे ५६ स्थानकांसह नवीन मार्ग, तर २०२९-३० पर्यंत ३०२ किलोमीटर लांबीचे १६१ स्थानके उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.(Metro Expansion)
मेट्रो-१० प्रकल्पाला गती
बैठकीत मीरा गाव ते गायमुख या मेट्रो-१० प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. सुमारे ८ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या या ९.६८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर पाच उन्नत (एलिव्हेटेड) स्थानके असणार आहेत. आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.(Metro Expansion)
नवीन मेट्रो मार्गांचे नियोजन
राज्य सरकारने भविष्यातील मेट्रो विस्तारासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन केले आहे. त्यामध्ये मुंबई मेट्रो-११ (अणिक डेपो–गेटवे ऑफ इंडिया), मेट्रो-८ (सीएसएमआयए–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ), मेट्रो-१३ (शिवाजी चौक–वसई-विरार), मेट्रो-१४ (कांजूर–बदलापूर), मेट्रो-१२ए (मानपाडा–कल्याण–तळोजा) तसेच पुणे मेट्रो फेज-३ आणि नवी मुंबई मेट्रोच्या विस्तारित मार्गांचा समावेश आहे.(Metro Expansion)
राज्य सरकारच्या या नियोजनामुळे मुंबई, पुणे, नागपूर आणि मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याबरोबरच वाहतूक कोंडी कमी होऊन नागरी विकासालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.(Metro Expansion)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.