संस्कृत भाषा सर्वत्र, सर्वांसाठी!

    04-Aug-2026   
Dr. Madhavi Narsale

संस्कृत भाषेच्या सर्वांगीण संवर्धनासाठी अनेक दशके विचार-कार्य करणार्‍या डॉ. माधवी नरसाळे यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...

ऐंशीचे दशक होते. मुंबईच्या चेंबूर येथे राहणारे मोरेश्वर पेठे हे आपल्या लेकीला माधवीला ‘अमर चित्रकथा’ वाचायला द्यायचे. त्यात देवादिकांच्या, संस्कृतीच्या, धर्माच्या कथा असत. त्या वाचून लहानग्या माधवीला वाटे, या ‘अमर चित्रकथा’वाल्यांना देवादिकांच्या गोष्टी कशा कळल्या? कुणी सांगितल्या असतील? तिने तो प्रश्न तिच्या बाबांना विचारला. तेव्हा ते म्हणाले, "हे सगळे संस्कृत भाषेतील प्राचीन साहित्यात असते.” त्याक्षणीच माधवी यांचे संस्कृतशी नाते जुळले. त्याच पूर्वाश्रमीच्या माधवी पेठे (विवाहानंतर डॉ. माधवी नरसाळे) आज मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विषयाच्या प्राध्यापक आहेत. त्या मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ‘हिंदू अध्ययन केंद्रा’च्या संचालिका असून, ‘एशियाटिक सोसायटी’ची नुकतीच निवडणूक झाली, त्यामध्ये ‘स्क्रुटिनी समिती’च्या सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. बेल्जियम येथे नुकतीच जागतिक वैदिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जगभरातले ५५ विद्वान सहभागी झाले होते. त्यात माधवीसुद्धा होत्या. माधवी यांनी इंग्रजी-मराठी कोशाच्या तत्त्वज्ञान कोशामध्ये काम केले असून, ‘अणुशास्त्र परिभाषाकोशा’च्या तज्ज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले. ‘इंडॉलॉजिकल’ आणि ‘छंद अ‍ॅज वेदांग’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘छंद अ‍ॅज वेदांग’ हे पुस्तक तिरुपती बालाजी देवस्थानने प्रकाशित केले.
 
असो. ‘दलित साहित्याचा संस्कृतमध्ये अनुवाद करायचा असल्यास कोणती आव्हाने असतील?’ या विषयावर डॉ. माधवी नरसाळे यांनी जर्मनी येथे शोधनिबंध सादर केला. दलित साहित्यातील व्यथा, कथा, यश आणि अनुभूती, आशय हा संस्कृत भाषेत अनुवादित व्हायला हवा, असे डॉ. माधवी नरसाळे यांचे मत. तसेही त्यांनी संस्कृतसंबंधित आंतरराष्ट्रीय स्तराच्या शेकडो कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला असून, ५०च्या वर शोधनिबंध प्रकाशित आहेत. ‘वेद’, ‘पुराणे’, ‘महाभारत’, ‘रामायण’ यांवर त्यांचा विशेष आणि सातत्याने अभ्यास आहे.
 
‘शिवपुराणा’तील अर्थशास्त्र, संत कवयित्री, जुने मराठी आणि संस्कृत यांचे परस्पर अनुबंध काय आहेत? या विषयांच्या त्या गाढ्या अभ्यासक. त्याशिवाय, महाराष्ट्रातील दैवते जसे- कोल्हापूरची अंबाबाई, तुळजादेवी, रेणुकादेवी, मल्हारी, देवदेवता यांची, तसेच महाराष्ट्रातील विविध नद्यांचे संस्कृत भाषेतील आणि मराठी भाषेतील माहात्म्य त्यांनी अथक प्रयत्न आणि कष्टातून संकलित केले. हे सगळे करण्यामागचा हेतू होता की, त्यांना सिद्ध करायचे होते की, महाराष्ट्रात संस्कृत भाषेचे युग होते आणि आहे. संस्कृतीचा झरा संस्कृतच्या माध्यमातून निर्माण होऊन आजदेखील तो प्रवाही आहे. ‘स्टार’ वाहिनीवर प्रकाशित होणार्‍या ‘महाभारत’ या मालिकेच्या २७८ भागांसाठी संशोधक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
 
तर, अशा या संस्कृत भाषेच्या अभ्यासक आणि विद्वान असलेल्या डॉ. माधवी नरसाळे यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ. पेठे कुटुंब मूळचे कोकणातले. कामानिमित्त ते मुंबईत स्थायिक झाले. मोरेश्वर पेठे आणि मीना पेठे हे दोघेही शिक्षक. त्यांना तीन अपत्ये. त्यांपैकी एक माधवी. मोरेश्वर संस्कृतचे शिक्षक होते. धर्मनिष्ठा, संस्कृतीचा आदर हे घरातल्या संस्कारांतूनच माधवींमध्ये रुजत गेले. पुढे आठवीपासून त्यांना अभ्यासासाठी संस्कृत विषय आला आणि त्या संस्कृतमय झाल्या. दहावीनंतर त्यांनी कलाशाखेत प्रवेश घेतला. याच काळात ‘राष्ट्र सेविका समिति’ आणि ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’शी संपर्क झाला. समितिमध्ये दातृत्वासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मातृत्वासाठी माता जिजाऊ आणि कर्तृत्वासाठी राणी लक्ष्मीबाईंचे स्मरण केले जाते. स्त्रीशक्तीची महती स्मरण करताना त्यांच्यातला आत्मविश्वास दुणावला.
 
त्याच काळात कारसेवेने देशातले वातावरण ढवळून निघाले होते. स्व. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, तसेच साध्वी ऋतुंभरा यांची भाषणे ऐकूनही माधवी यांना प्रेरणा मिळाली. आपण प्रत्यक्ष कारसेवेला जरी नाही गेलो, तरीसुद्धा जिथे असू, तिथून आपली संस्कृती-धर्म संवर्धित करायचा, हे त्यांनी ठरवले. पुढे त्यांचा विवाह अर्थतज्ज्ञ राघव नरसाळे यांच्याशी झाला. राघव यांनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात माधवी यांना साथ दिली. त्यामुळेच लग्नानंतर माधवी या ‘पीएचडी’चे शिक्षण पूर्ण करू शकल्या. आज माधवी ‘पीएचडी’ करणार्‍या आठ विद्यार्थ्यांच्या ‘गाईड’ आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी सामाजिक भान जपले आहे. ‘कोरोना’ काळात माधवी आणि राघव यांनी पाहिले की, ‘कोरोना’ रुग्णांना प्रवासासाठी रुग्णवाहिका अपुर्‍या पडत आहेत. सार्वजनिक वाहतूक सुविधा बंद आहेत, त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. तेव्हा नवी मुंबई क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांना मदत म्हणून माधवी आणि राघव यांनी ‘टाटा रिंगर’ हे वाहन खरेदी केले आणि नाममात्र १०० रुपये शुल्कामध्ये रुग्णांना प्रवास सुविधा उपलब्ध केली. डॉ. माधवी म्हणतात, "यापुढेही संस्कृत भाषेच्या सर्वव्यापी स्वरूपासाठी काम करणार आहे.” डॉ. माधवी यांच्यासारख्या विद्वान, समाजशील स्त्रीशक्ती समाजापुढे आदर्श निर्माण करत असतात. त्यांच्या विचारकार्याची प्रेरणा समाजाला बळ देते.
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर