बालपण हे निरागसतेचे, वाढीचे आणि नव्या शयतांचे प्रतीक मानले जाते. परंतु, याच वयात उद्भवणारे काही आजार सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेपुढील गंभीर आव्हान ठरतात. त्यांपैकी रक्ताचा कर्करोग अर्थात ‘बाल ल्युकेमिया’ हा सर्वाधिक महत्त्वाचा आजार. सुरुवातीची लक्षणे साध्या संसर्गासारखी भासत असल्याने निदान अनेकदा विलंबाने होते आणि उपचारांचे आव्हान वाढते. त्यामुळे ‘बाल ल्युकेमिया’कडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधिक अधोरेखित होत आहे.
बालवयात होणार्या कर्करोगांमध्ये ‘ल्युकेमिया’ हा सर्वाधिक आढळणारा आजार. दक्षिण आशियातील ‘बाल ल्युकेमिया’च्या सुमारे ७० टक्के रुग्ण भारतात असल्याचे अलीकडेच एका अहवालातून समोर आले आहे. याचा अर्थ, भारतात या रोगाचा असामान्य उद्रेक झाला आहे, असा नाही; परंतु देशाची लोकसंख्या, उपचार केंद्राच्या मार्यादा, निदानातील विलंबांमुळे भारतात याचे प्रमाण जास्त आहे. देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे; कारण ‘बाल ल्युकेमिया’मध्ये निदानात होणारा विलंब धोका वाढवणारा ठरतो.
‘ल्युकेमिया’ हा रक्तनिर्मिती करणार्या अस्थिमज्जा अर्थात ‘बोन मॅरो’चा घातक विकार आहे. सामान्यतः ‘बोन मॅरो’मध्ये लाल रक्तपेशी, पांढर्या रक्तपेशी आणि रक्तबिंबिका यांची संतुलित निर्मिती होते. मात्र, जनुकीय पातळीवरील बदलांमुळे एखादी अपरिपक्व पांढरी रक्तपेशी अनियंत्रितपणे वाढू लागते. या विकृत पेशी ‘बोन मॅरो’तील निरोगी पेशींना प्रभावित करतात. परिणामी, रक्तक्षय, रक्तबिंबिकांची कमतरता आणि कार्यक्षम पांढर्या रक्तपेशींची संख्या घटते. यामुळे अशक्तपणा, रक्तस्रावाची प्रवृत्ती आणि वारंवार होणारे संसर्ग यांची मालिकाच सुरू होते.
बालकांमध्ये सर्वाधिक आढळणारा प्रकार म्हणजे ‘अयूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया.’ एकूण रुग्णांपैकी जवळपास ८० टक्के मुले याच प्रकारातील असतात. उर्वरित रुग्णांमध्ये ‘अयूट मायेलॉईड ल्युकेमिया’ आढळतो. हे दोन्ही प्रकार जलद गतीने वाढणारे असल्याने, संशय आल्याबरोबरच तपासण्या सुरू करणे आवश्यक असते.
या आजाराचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. बहुतेक मुलांमध्ये कोणतेही स्पष्ट कारण सापडत नाही. काही अनुवांशिक विकार, गुणसूत्रांतील बदल, ‘डाऊन सिंड्रोम’सारख्या जन्मजात स्थिती किंवा तीव्र किरणोत्सर्गाचा संपर्क यांमुळे हा धोका वाढू शकतो. मात्र, आहार, एखादा संसर्ग, मोबाईलचा वापर किंवा लसीकरणामुळे ‘ल्युकेमिया’ होतो, अशा समजुतींना तथ्यावर आधारित नाहीत.
या आजाराचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे, त्याची सुरुवातीची लक्षणे अत्यंत सामान्य स्वरूपाची असतात. वारंवार ताप येणे, मुलाची खेळण्यातील रुची कमी होणे, सतत थकवा जाणवणे, त्वचा फिकट दिसणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे, अंगावर सहज निळे डाग पडणे, हिरड्या किंवा नाकातून रक्त येणे, हाडे व सांधे दुखणे, तसेच मान किंवा काखेतील ‘लिम्फ’ ग्रंथी सुजणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. अनेकदा या तक्रारी सामान्य व्हायरल संसर्ग समजून दुर्लक्षित होतात. परिणामी, निदान उशिरा होते आणि रोगाचा प्रसार वाढलेला असतो.
सुदैवाने, ‘ल्युकेमिया’चे निदान आज तुलनेने अचूक आणि जलद पद्धतीने करता येते. संपूर्ण रक्ततपासणी हा पहिला टप्पा असला, तरी अंतिम निदानासाठी ‘बोन मॅरो’ तपासणी, ‘फ्लो साईटोमेट्री’, ‘इम्युनोफेनोटायपिंग’ आणि आवश्यकतेनुसार जनुकीय व गुणसूत्रीय चाचण्या केल्या जातात. या तपासण्यांवरून केवळ रोगाचा प्रकारच नव्हे, तर त्याचा धोका आणि उपचाराची तीव्रताही निश्चित करता येते.
गेल्या दोन दशकांत उपचारांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. ‘केमोथेरपी’ हा उपचाराचा मुख्य आधार असला, तरी निवडक रुग्णानिहाय औषधे, ‘इम्युनोथेरपी’ आणि ‘बोन मॅरो’ प्रत्यारोपणाचा उपयोग केला जातो. आज उपचार हा संसर्ग नियंत्रण, पोषण, रक्तघटकांचे व्यवस्थापन, मानसोपचारात्मक आधार आणि नियमित तपासणी यांचा भाग आहे. उपचारांमध्ये सातत्य राखल्यास विशेषतः रोगमुक्तीचे प्रमाण ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचते.
उपचारादरम्यान पालकांनी ताप, खोकला किंवा इतर संसर्गाची कोणतीही लक्षणे गांभीर्याने घ्यावीत. वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे बंद करणे, पर्यायी उपचारांकडे वळणे किंवा उपचाराचा एखादा टप्पा टाळणे धोकादायक ठरू शकते. स्वच्छता, संतुलित आहार, नियोजित तपासण्या आणि उपचारांचे शिस्तबद्ध पालन हेच यावर यशस्वी उपचाराचे आधारस्तंभ आहेत.
‘बाल ल्युकेमिया’ हा आजही गंभीरच आजार आहे; परंतु तो असाध्य नाही. आधुनिक वैद्यकशास्त्राने या आजाराविरुद्ध प्रभावी उपचार उपलब्ध करून दिले आहेत. आता खरी गरज आहे, ती संशयित प्रत्येक मुलाचे वेळेत निदान, जिल्हास्तरावर सक्षम बाल कर्करोग सेवा आणि उपचारांपर्यंत समान प्रवेश सुनिश्चित करण्याची. कारण ‘बाल ल्युकेमिया’मध्ये सर्वांत प्रभावी औषध अद्यापही एकच आहे, ते म्हणजे वेळेत झालेले अचूक निदान!