दमा हा श्वसनसंस्थेचा आजार. पावसाळ्यात तसेच हिवाळ्यात हा त्रास वातावरणातील बदलांमुळे अधिकच बळावतो. प्रसंगी रुग्णाच्या दिनचर्येवर आणि एकूणच आरोग्यावरही त्याचा बरेचदा परिणाम जाणवतो. तेव्हा, सध्या सुरु असलेल्या पावसाळ्यात दम्याची लक्षणे आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचारांची माहिती देणारा हा लेख...
पावसाळा सुरू झाला की अनेक आजार त्याच्या सोबतीने येतात. त्यातलाच एक अत्यंत त्रासदायक आजार म्हणजे दमा. इंग्रजीत त्याला 'Asthama' म्हटले जाते, तर आयुर्वेदातील नाव आहे तमकश्वास.'
आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की, हा श्वसन संस्थेचा आजार आहे, ज्यामध्ये श्वासनलिकांना सूज येते, त्या आक्रसतात आणि काही वेळा अधिक कफ तयार करतात. त्यामुळे श्वास घेणे त्रासदायक होते. परिणामी, कष्टाने होणारी श्वासोच्छ्वासाची क्रिया, खोकला, छाती आवळून आल्यासारखं वाटणे, ही लक्षणे निर्माण होतात. श्वासोच्छ्वासाचा एक विशिष्ट ध्वनी येतो, ज्याला 'wheezing’ म्हणतात. आयुर्वेदात त्याचे वर्णन ‘कपोतकूजनवत् ध्वनी’ म्हणजे कबूतर घुमल्यासारखा आवाज असे केले आहे.
प्रत्येक व्यक्तीनुसार लक्षणांमध्ये फरक असतो. ही लक्षणे रात्री, आकाशात मेघ दाटल्यावर व शारीरिक कष्ट झाल्यावर वाढतात. परागकण, धूर, धूळ, विशिष्ट तीव्र वास, थंड व कोरडी हवा, शारीरिक व मानसिक ताण यांमुळे ही लक्षणे अचानक उद्भवल्यासारखी दिसतात. ‘तमक’ म्हणजे अंधार. अंधार्या वातावरणात उद्भवणारा व उद्भवल्यावर डोळ्यांसमोर अंधारी आणणारा तो तमकश्वास! यामध्ये वात आणि कफ दोन्ही दोघांमध्ये बिघाड असतो. वात खूप वाढल्यामुळे छोट्या छोट्या श्वासनलिकांना कोरडं करतो व त्यांचा संकोच होतो. त्यामुळे श्वासोच्छ्वासाची क्रिया अवघड होते. तो कोरडेपणा घालवण्यासाठी त्या ठिकाणी फुप्फुसांमधून अधिक स्राव निर्माण होतो. पण, त्या स्रावामुळे श्वासवाहिन्यांना चिकटपणा येतो. खोकून खोकून तो कफ बाहेर थुंकला, तरच आराम वाटतो. बसलेल्या स्थितीत आराम वाटतो. झोपलं की खोकला आणि श्वासकष्टताही वाढते. परिणामी, झोपही घेता येत नाही, ऑक्सिजन पुरवठाही कमी होतो आणि रुग्ण हैराण होतो.थकून जातो.
हे सर्व बघून किंवा अनुभवून तुम्हाला माहीत आहेच. महत्त्वाचं आहे, ते यावर उपाय काय?
‘तमके तु विरेचनम्’ असं सूत्र आयुर्वेदाने सांगितलं आहे. तमकश्वासाच्या रुग्णाला विरेचन द्या. मग हे विरेचन कधी द्यायचं? दम्याचा अॅटॅक आला, तरी द्यायचं आणि दर महिन्यात एक वेळा न चुकता विरेचन द्यायचं. याशिवाय, शरद ऋतूमध्ये म्हणजे नवरात्र संपल्यावर एक स्नेहपानसहित विरेचन घ्यायचं. महिन्यातून एकदा आणि शरद ऋतूमध्ये विरेचन घेत राहिलं, तर दम्याचा अॅटॅक येण्याची शयता कमी होत जाईल आणि आलाच, तरी तीव्रता कमी असेल.
विरेचनामुळे काय होईल? वरच्या दिशेने फेकल्या जाणार्या वायूला अनुलोम गती मिळेल. म्हणजे तो खालच्या दिशेला वळेल आणि अधोमार्गाने बाहेर पडेल. त्यामुळे छातीवर येणारा ताण कमी होईल. विरेचनासाठी कोणते औषध वापरायचे, हा त्या त्या वेळी वैद्याने रुग्णानुरूप घ्यायचा निर्णय आहे.
महिन्यातून एकवेळ घ्यायचं विरेचन मात्र आपण एरंडेल तेलाचं घेऊ शकतो. एरंडेल तेल विरेचनाचा फायदा सांधेदुखी, वाढणारं वजन, पाळीच्या तक्रारी, अम्ल-पित्त या सर्वांमध्ये होतो. दम्याच्या रुग्णाने पाव चमचा मिरेपूड, पाव चमचा सुंठ, पाव चमचा हळद (चहाच्या चमच्याने पाव चमचा - २५० मिग्रॅ) यांचा एक कप पाण्यात काढा बनवायचा. त्यामध्ये १५ मिली एरंडेल तेल मिसळायचं आणि चांगलं फेटून मग प्यायचं. त्यानंतर किमान अर्धा तास शांत पडून राहायचं. शयतो, पहाटे ४ वाजेच्या सुमारास हा काढा व एरंडेल प्यावं आणि मग तास दोन तास झोपलात, तरी चालेल. हे विरेचन घेतल्यादिवशी दूध, कॉफी, फळं, कच्ची सलाड्स, मांसाहार वर्ज्य करावा. सकाळी नाश्त्याला बिनदुधाची रव्याची कणेरी, दुपारी पेज व रात्री मूगडाळ खिचडी असा आहार घ्यावा.
शरद ऋतूमध्ये घ्यायच्या विरेचनामध्ये साधारण पाच दिवस औषधी तूप प्यायला देतात. नंतर संपूर्ण शरीराला शेक मालिश करून मग विरेचनाचे औषध देतात. हे अर्थातच वैद्यकीय देखरेखीखाली करावे.
पावसाळ्यात व हिवाळ्यात दर महिन्याला संपूर्ण शरीराला शेक मालिश घेतल्याने वात व कफ साठत नाहीत. तसेच जर कफ बनण्याचे प्रमाण जास्त असेल, तर वसंत ऋतूमध्ये म्हणजे होळीनंतर वमन चिकित्सा करून घ्यावी.
दमा या लक्षणातच अंतर्भूत होणारा, पण वेगळ्या कारणांनी होणारा, असा आयुर्वेदात वर्णन केलेला व्याधी प्रकार म्हणजे ‘पित्तज कास’. यामध्ये पित्त व वायूचं प्राबल्य असतं. (तमकश्वासात कफ व वायू दोष बिघडलेले असतात.) पित्तज कासातही खोकला खूप येतो, श्वास घ्यायला त्रास होतो; पण पावसाळ्यात किंवा ढगाळ वातावरणातच तो होईल, असं नाही. जेव्हा काही कारणाने शरीरात पित्त वाढतं, त्यावेळी श्वसन नलिकांचा दाह होतो, त्यांना सूज येते व संकोच निर्माण होतो. परिणामी, श्वासकष्टता होऊ लागते व दम लागतो.
या ठिकाणी चिकित्सा करतानाचा विचार वेगळा असतो. पित्त-वात वाढलेले आहेत, म्हणून अनुलोमनासाठी विरेचन तर द्यायचंच, पण पित्तशामक चिकित्सा खूप महत्त्वाची ठरते. दम लागतोय, म्हणून उष्ण पदार्थ किंवा औषधं घेतली, तर दमा कमी होण्याऐवजी वाढतो. माझ्या रुग्णांना तर मी काही वेळा व्हॅनिला आईसक्रीम खायला देते आणि दम लागणे कमी होतं. मात्र, निदान अचूक हवं.
पित्तज कासाचा दमा हा कधीतरी कोणाला तरी होणारा आजार आहे, तर ‘तमकश्वास’ हा त्या रुग्णाला वारंवार होणारा आजार आहे. पित्तज कासाचा रुग्ण सांगेल की, यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. याउलट तमकश्वासाच्या रुग्णाकडे वारंवार लक्षणे उद्भवण्याचा इतिहास असतो. पण, तरीही पित्तज कासाच्या रुग्णाने जर पित्ताची योग्य चिकित्सा केली नाही, पथ्य पाळले नाही, तर त्याच्यासाठीसुद्धा हा नेहमी होणारा आजार ठरू शकतो.
दोन्ही प्रकारच्या रुग्णांनी फरसाण, आंबवलेले पदार्थ, दही, शिळं खाणं, कडधान्यांचे वारंवार सेवन टाळावं. धूळ-धुराचा त्रास दोघांनाही होऊ शकतो. तमकश्वासाच्या रुग्णाला थंड हवा, एसी, आईसस्क्रीम, सरबतं, मिल्कशेक्स हे पदार्थ त्रासदायक ठरतील, तर पित्तज कासाच्या रुग्णासाठी चायनिज, मसालेदार पदार्थ, आलं-लसूण यांचं अधिक सेवन, गरम वातावरणात जास्त वेळ राहणं (खूप वेळ स्वयंपाक करणं, इस्त्री करणं इ.) यांमुळे दम्याचा त्रास उद्भवू शकतो.
याशिवाय, दम लागणे हे लक्षण हृदयरोगात, रक्ताल्पतेमध्ये, यकृताच्या विकारामध्येसुद्धा दिसू शकते. म्हणून चिकित्सकाकडून योग्य निदान करून घ्या. ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’ किंवा प्रभातफेरी सल्लागार मंडळावर अवलंबून राहू नका.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे आणि आयुर्वेदाने याला शास्त्रीय मान्यता दिली आहे. किंबहुना, आयुर्वेदाच्या अभ्यासकानेच या म्हणीला जन्म दिला असावा. त्यामुळे एका व्यक्तीची चिकित्सा दुसर्या व्यक्तीला तंतोतंत लागू पडत नाही. दमा हे समान लक्षण असले, तरी वात-कफ की वात-पित्त या दोषांच्या कारनाम्यावर निदान व चिकित्सा ठरेल किंवा इतरही काही कारण असू शकेल, हे लक्षात घ्या. ढोबळमानाने जरी मी वर्णन केलं असलं, तरी हा स्वतःच स्वतःचे उपचार करून पाहण्याचा आजार नक्कीच नाही. त्याला योग्य वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच आपल्या आजाराचं निदान व प्रतिबंध करून घ्या म्हणजे कांदाभजी खायचा मार्ग मोकळा!
- वैद्या चंदाराणी बिराजदार
(लेखिका एमडी आयुर्वेद आहेत.)
(लेख आरोग्य भारती कोकण प्रांताद्वारे प्रकाशित)