शब्दाला खरेच एवढी ताकद असते का की, त्यामागे मानवी मेंदू, समूह मानसशास्त्र आणि नेतृत्वातील भावनिक बुद्धिमत्ता यांचे काही खोल नियम कार्यरत असतात? जेव्हा समाज आधीच निराशा, अन्यायाची भावना आणि भविष्याबद्दलच्या असुरक्षिततेने भारलेला असतो, तेव्हा नेतृत्वातील एकच शब्द त्या सामूहिक भावनांना दिशा देऊ शकतो, कधी आशेकडे, तर कधी संतापाकडे... हा लेख त्या प्रक्रियेचे मानसशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न आहे.
असंतोष अचानक निर्माण होत नाही : भावनांची मानसशास्त्रीय उत्क्रांती
कोणतेही मोठे आंदोलन, सार्वजनिक संताप किंवा सामाजिक संघर्ष एका दिवसात निर्माण होत नसतो. त्यामागे अनेक महिने किंवा अनेक वर्षे साचत गेलेल्या भावनांचा प्रवास असतो. जेव्हा आपण एखाद्या आंदोलनाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला त्याचा शेवटचा टप्पा दिसतो; परंतु मानसशास्त्रज्ञाचे लक्ष त्या प्रवासाकडे असते, ज्यातून तो संताप जन्माला आला. लोक रागाने सुरुवात करत नाहीत. उलट, त्यांची सुरुवात आशेने होते. एखादा विद्यार्थी स्पर्धा-परीक्षेची तयारी सुरू करतो, एखादा शेतकरी नवीन पीक घेतो, एखादा उद्योजक उद्योग उभारतो किंवा एखादा नागरिक शासनव्यवस्थेवर विश्वास ठेवतो, या सर्वांच्या केंद्रस्थानी एकच भावना असते - माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना न्याय मिळेल.
या आशेभोवती संघर्ष उभा राहतो. व्यक्ती, वेळ, श्रम, पैसा, कौटुंबिक पाठबळ आणि अनेकदा स्वतःचे तारुण्यही त्या ध्येयासाठी समर्पित करते. त्यानंतर सुरू होते, प्रतीक्षा. निकालाची, संधीची, न्यायाची किंवा व्यवस्थेकडून प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा... परंतु, जेव्हा वारंवार अडथळे येतात, प्रक्रिया लांबते, अन्याय झाल्याची भावना निर्माण होते किंवा प्रयत्न असूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, तेव्हा आशेची जागा हळूहळू निराशा घेऊ लागते. ही निराशा तात्पुरती असू शकते; परंतु ती दीर्घ काळ टिकली, तर ती हताशेमध्ये रूपांतरित होते. हताशा म्हणजे केवळ दुःख नव्हे, तर माझ्या प्रयत्नांना काहीच अर्थ उरलेला नाही, अशी मानसिक अवस्था.
यानंतर एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय टप्पा येतो, अन्यायाची भावना (झशीलशर्ळींशव खपर्क्षीीींळलश). व्यक्तीला असे वाटू लागते की, समस्या केवळ वैयक्तिक अपयशाची नाही, तर व्यवस्था न्याय्यपणे कार्य करत नाही. संशोधनातून असे दिसून आले आहे की, लोकांना अपयशापेक्षा अन्याय अधिक अस्वस्थ करतो. कारण, अपयश स्वीकारता येते; परंतु अन्याय स्वीकारणे मनाला कठीण जाते. अन्यायाची भावना जेव्हा सार्वजनिक भाषेत, निर्णयांमध्ये किंवा वर्तनामध्ये अपमानाची छटा अनुभवते, तेव्हा भावनिक प्रक्रिया आणखी तीव्र होते. येथे प्रश्न केवळ अधिकारांचा राहात नाही; तो स्वाभिमानाचा बनतो. ‘माझे म्हणणे ऐकले जात नाही’ या भावनेचे रूपांतर ‘माझा अपमान केला जात आहे’ या भावनेत होते. मानसशास्त्रात हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो; कारण व्यक्ती आपल्या ओळखीला (identity) धोका निर्माण झाल्याचा अनुभव घेऊ लागते.
याच क्षणी वैयक्तिक भावना सामूहिक भावनेत रूपांतरित होऊ लागते. एका व्यक्तीची निराशा हजारो लोकांच्या अनुभवाशी जुळू लागते. ही केवळ माझी समस्या नाही; हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे, ही जाणीव सामूहिक ओळख (collective identity) निर्माण करते. समाजमाध्यमांच्या युगात ही प्रक्रिया आणखी वेगाने घडते. समान भावना असलेले लोक एकमेकांना शोधतात, आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करतात आणि एकत्रितपणे आपल्या भावनांना आवाज देऊ लागतात. म्हणूनच सार्वजनिक संताप हा एखाद्या एका घटनेचा परिणाम नसतो. तो अनेक भावनिक टप्प्यांतून विकसित झालेला असतो. एखादी घटना, एखादा निर्णय किंवा एखादे विधान हे त्या प्रक्रियेची सुरुवात करत नाही; ते केवळ आधीपासून साचलेल्या भावनांना दिशा देणारी ठिणगी ठरते.
हे समजून घेतल्याशिवाय कोणतेही आंदोलन, सार्वजनिक असंतोष किंवा सामाजिक संघर्ष पूर्णपणे समजणे शक्य नाही. आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारू. समाज आधीच निराशा, अन्यायाची भावना आणि भविष्याविषयीच्या असुरक्षिततेने भारलेला आहे. अशा वेळी एखादा नेता, न्यायमूर्ती किंवा सार्वजनिक पदावरील व्यक्ती अनावश्यक अशी टिप्पणी करते. त्या व्यक्तीला कदाचित वाटत असेल की ती केवळ एक टिप्पणी करत आहे. परंतु, मानसशास्त्रीयदृष्ट्या त्या क्षणापासून तो शब्द केवळ शब्द राहात नाही; ती एक भावनिक घटना बनते.
नेता जे बोलतो आणि लोक जे ऐकतात, या दोन्ही गोष्टी नेहमी सारख्या नसतात. लोक शब्दांचा केवळ शब्दशः अर्थ ऐकत नाहीत; ते त्या शब्दांमधून स्वतःविषयी काय सांगितले जात आहे, याचा अर्थ शोधतात. विशेषतः जेव्हा ते आधीच तणावाखाली असतात, तेव्हा त्यांच्या मेंदूची संवेदनशीलता अधिक वाढलेली असते. याचे एक उदाहरण म्हणजे आंदोलन करणार्या काही तरुणांसाठी ‘कॉकरोच’ (झुरळे) आणि ‘पॅरासाईट’ (परजीवी) या शब्दांचा वापर. शब्दशः पाहता, तो एक उल्लेख किंवा उपमा असू शकते; परंतु अनेक तरुणांच्या मनात त्याचा भावनिक अर्थ वेगळाच निर्माण झाला. आपल्याला माणूस म्हणून नव्हे, तर तुच्छ समजले जात आहे. हा अनुभव केवळ असहमतीचा नव्हता; तो स्वाभिमानाला धक्का देणारा होता. जखमेवर मीठ चोळणारा होता. म्हणूनच त्या उपमेचेच प्रतीकात्मक रूपांतर करून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) ही ऑनलाईन व्यंगात्मक चळवळ उदयास आली. मानसशास्त्रीयदृष्ट्या हे अपमानकारक वाटलेल्या ओळखीचे सामूहिक प्रतीकात रूपांतर (symbolic reclaiming of identity) होते.
अशाच प्रकारे दुसर्या एका प्रसंगी ‘आम्हाला याबद्दल चर्चा करायला वेळ नाही,’ हे विधान समोर आले. या वायाचा प्रत्यक्ष हेतू काहीही असो, आधीच मानसिक तणाव अनुभवणार्या अनेक तरुणांनी त्याचा अर्थ ‘आमच्या प्रश्नांना आणि वेदनांना महत्त्व द्यायला वेळ नाही,’ असा लावला. मानसशास्त्राच्या दृष्टीने हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. लोक अनेकदा वक्त्याच्या प्रत्यक्ष हेतूला नव्हे, तर स्वतःला जाणवलेल्या भावनिक संदेशाला प्रतिसाद देतात.
यातून नेतृत्वासाठी एक मूलभूत धडा मिळतो. संकटाच्या काळात प्रत्येक सार्वजनिक शब्द हा केवळ माहिती देत नाही; तो समाजाच्या सामूहिक भावनांना दिशा देतो. तो आशा निर्माण करू शकतो, विश्वास दृढ करू शकतो; किंवा नकळत अपमान, संताप आणि संघर्षालाही चालना देऊ शकतो. ‘कॉकरोच’हा शब्द वापरला नसता, तर कदाचित हे आंदोलन झालेच नसते.
म्हणूनच सार्वजनिक नेतृत्वात शब्द हे संवादाचे साधन नसून, मानसशास्त्रीय हस्तक्षेप (Psychological Intervention) असतात. योग्य वेळी वापरलेला एक संवेदनशील शब्द तणाव कमी करू शकतो; तर निष्काळजीपणे उच्चारलेला एक शब्द अनेकदा आधीच धुमसणार्या असंतोषाला उघड्या ज्वालेत रूपांतरित करू शकतो.
प्रोफेसर डॉ शुभांगी रघुनाथ पारकर, या एमबीबीएस, एमडी, पीएचडी, ज्येष्ठ मनोचिकीत्सक आणि आंतरराष्ट्रीय संशोधक असून. केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे माजी अधिष्ठाता होत्या. जागतिक पातळीवर संशोधन लेखनासाठी त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मनोविकार, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक मानसशास्त्र या विषयांवर विविध वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकात विपुल लेखन करत जनजागृती करत असतात.