‘वसुधैव कुटुम्बकम्’चा विश्वमंचावर हुंकार

    31-Aug-2026

Mohan Bhagwat New York speech
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी न्यूयॉर्कमध्ये दिलेल्या ‘विविधतेतील एकता’ या संदेशाने पुन्हा एकदा भारताचे जागतिक तत्त्वज्ञान अधोरेखित केले. हिंदुत्व ही सर्वसमावेशक जीवनपद्धती असून, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा विचारच आजच्या संघर्षमय जगाला मानवतेचा आणि विश्वशांतीचा खरा मार्ग दाखवू शकतो, हाच या वैश्विक संबोधनाचा अन्वयार्थ...
 
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात नुकतेच झालेले वैचारिक मंथन, संपूर्ण जगाला भारताच्या सनातन परंपरेची आणि व्यापक दृष्टिकोनाची नव्याने ओळख करून देणारे ठरले. निमित्त होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या भव्य कार्यक्रमात केलेले मार्गदर्शन. १८९३ साली स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्म परिषदेत विश्वबंधुत्वाचा जो ऐतिहासिक संदेश दिला होता, नेमया त्याच विचारांची आणि मूल्यांची आधुनिक काळातील प्रगल्भ मांडणी सरसंघचालकांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरे करत आहे. या ऐतिहासिक टप्प्यावर, एका अत्यंत शक्तिशाली आणि शिस्तबद्ध संघटनेच्या प्रमुखाकडून जगाला मानवतेचा, एकात्मतेचा आणि विश्वशांतीचा उदात्त संदेश मिळणे, हे संपूर्ण जगासाठीच अत्यंत आशादायी. या मंचावरून ३० देशांतील १८० धर्मनेत्यांनी जाहीर केलेला पंचसूत्री कृती आराखडा आणि एकमेकांना राखी बांधून संरक्षणाचा केलेला संकल्प, खर्‍या अर्थाने जागतिक बंधुभावाचा अप्रतिम अविष्कार होता.
 
पाश्चिमात्य देश अमेरिकेचा उल्लेख करतात, तेव्हा तेथील बहुविधता समोर येते. तथापि, भारताच्या बाबतीत ‘विविधतेतील एकता’ हेच सर्वांत मोठे वैशिष्ट्य ठरते. एकता आणि विविधता या दोन्ही गोष्टी भारताच्या ‘डीएनए’मध्येच आहेत, हे सरसंघचालकांचे प्रतिपादन भारताचे व्यापक चित्र जागतिक मंचावर सादर करणारे ठरले. शरीर, भाषा, संस्कृती, वेशभूषा आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या, तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात एकच चैतन्य आहे. विविधता हे एकतेचे खरे वैभव. त्यामुळे आपण या विविधतेचा उत्सव साजरा केला पाहिजे. जगातील अनेक संस्कृतींनी तुम्ही आमचे ऐका, तरच आम्ही तुम्हाला जगू देऊ, अशी राक्षसी प्रवृत्ती जोपासली. तथापि, भारताने ‘जगा आणि जगू द्या’ हाच विचार अंगीकारला. हेच खरे ‘वसुधैव कुटुम्बकम्’.
 
याच मंचावरून सरसंघचालकांनी हिंदुत्वाबाबत अत्यंत स्पष्ट विचार मांडून, अनेक गैरसमजांनाही पूर्णविराम दिला. "भारतात एकही मुस्लीम असू नये, असा विचार कुणी हिंदू करत असेल, तर तो हिंदू नाही,” हे त्यांचे विधान, हिंदुत्वाची ओळख सांगणारेच. हिंदुत्व ही एक अत्यंत प्रगल्भ आणि सर्वसमावेशक जीवनपद्धती आहे. "उपासनेचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. मात्र, या सर्व मार्गांचे अंतिम सत्य एकच आहे, हाच हिंदू धर्माचा गाभा. विविधता स्वीकारूनही एकतेची भावना कायम ठेवणे, हीच भारतीय परंपरेची विशेषता आहे. संवाद आणि निस्वार्थ सेवाकार्य हातात हात घालून चालले पाहिजेत,” यावर त्यांनी दिलेला भर महत्त्वाचाच. संघाच्या विचारधारेबाबत जे खोटे ‘नॅरेटिव्ह’ जाणीवपूर्वक पसरवले गेले, त्याला दिलेले हे सडेतोड उत्तर ठरावे.
 
याच विचारमंथनातून त्यांनी धर्म आणि आधुनिक राजकारणावरही, अत्यंत मार्मिक भाष्य केले. आज धर्माची व्याख्या काही कर्मकांडांपुरतीच मर्यादित ठेवली जाते; परंतु धर्माचा खरा उद्देश सत्यापर्यंत पोहोचणे हाच आहे. जो मार्ग समाजाला जोडतो, संतुलन राखतो आणि मध्यममार्गाचा पुरस्कार करतो, तोच खरा धर्म. तसेच, आधुनिक राजकारणात मी आणि माझे या स्वार्थी भावनेपेक्षा, आपण आणि आपले ही व्यापक भावना रुजवण्याची नितांत गरज आहे. राजकीय नेतृत्वाने समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी कार्य केले पाहिजे, हा त्यांनी दिलेला मंत्रही दिशादर्शक आहे.
 
अमेरिकेत आणि जगभरात स्थायिक झालेल्या भारतीयांनाही त्यांनी, अत्यंत मोलाचा संदेश दिला. "माणसाने जन्मभूमीची मूल्ये कधीही विसरू नयेत, पण ज्या देशात आपण राहतो त्या कर्मभूमीप्रतिही पूर्ण निष्ठा राखणे, हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे,” हा संदेश, भारतीयांची जागतिक स्तरावरील प्रगल्भता दर्शवणारा आहे. यासोबतच, समाजाप्रति आणि पर्यावरणाप्रति असणारी कृतज्ञताही त्यांनी अधोरेखित केली. आपण जगाकडून जे काही घेतले आहे, ते जगाला परत देणे, हेच आपले कर्तव्य आहे. शेतकरी, कामगार यांच्या परिश्रमावर आपले जीवन उभे असते, याचे भान ठेवले पाहिजे. मानवजन्माचा उद्देश संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहे, हा विचारही त्यांनी मांडला.
 
भारतीय तत्त्वज्ञान जगाला जोडण्याची आणि मानवतेची भाषा करताना, दुसरीकडे याच कार्यक्रमाबाहेर खलिस्तान समर्थक कट्टरपंथीयांनी जो गोंधळ घातला, तो त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचा पुरावा आहे.हे लोक पाकिस्तान आणि चीनसारख्या भारतविरोधी शक्तींच्या हातातील बाहुले आहेत. हिंदू आणि शीख समाजात दुही माजवण्याचा त्यांचा हा कुटिल डाव, अमेरिकेतील जागरूक भारतीयांनी हाणून पाडला. या विद्ध्वंसक प्रवृत्तींना संघर्षाने नव्हे, तर आपल्या एकजुटीने आणि प्रगल्भ विचारांनीच पराभूत करावे लागेल. शत्रूच्या नाशापेक्षा त्याची शत्रुबुद्धी दूर व्हावी, हीच भारतीय संतांची शिकवण आहे.
 
सध्याचे जग हे युद्ध, संघर्ष, दहशतवाद आणि आर्थिक अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया-युक्रेन, इस्रायल-‘हमास’ यांच्यातील रक्तरंजित संघर्षामुळे, जागतिक शांतता धोयात आहे. अशा या संघर्षाच्या काळात संत ज्ञानेश्वरांनी मागितलेले पसायदानच जगाला तारू शकते. ‘भूतां परस्परें पडो, मैत्र जीवांचें या माध्यमातूनच, दुरितांचे तिमिर जावों’, हे उद्दिष्ट साध्य होणार आहे. सरसंघचालकांनी अमेरिकेच्या भूमीवरून दिलेला हा संदेश खर्‍या अर्थाने, या पसायदानाचेच प्रकटीकरण आहे. भारताच्या या संदेशाच्या आचरणातच खर्‍या अर्थाने मानवतेचे वैश्विक कल्याण सामावलेले आहे.




संबंधित मजकूर