मुंबई: (siddharth jadhav) 'आता होऊ दे धिंगाणा'च्या चारही पर्वांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कलाकारांची धमाल, अनपेक्षित खेळ, टास्कमधला थरार आणि खळखळून हसवणारे क्षण यामुळे हा कार्यक्रम घराघरात पोहोचला. ‘आता होऊ दे धिंगाणाचं’ पाचवं पर्व पाचपट मनोरंजनाची मेजवानी घेऊन सज्ज झालं आहे. 'धिंगाण्याच्या बेटावर' ही यंदाच्या पर्वाची भन्नाट संकल्पना प्रेक्षकांना एका रंगीबेरंगी ट्रॉपिकल आयलंडची सफर घडवणार आहे. सोनसळी वाळू, डोलणारी नारळाची झाडं, समुद्रकिनाऱ्याचा मनमोहक नजारा, वॉटर स्पोर्ट्सची मजा आणि भन्नाट बीच गेम्स यामुळे संपूर्ण सेट एका खऱ्याखुऱ्या बेटात रूपांतरित करण्यात येणार आहे.
टीमवर्कची खरी कसोटी पाहणारे खेळ आणि उत्साहाने भरलेलं वातावरण यामुळे प्रत्येक भागात प्रेक्षकांना एखाद्या परदेशी बेटावर सुट्टीसाठी आल्याचा अनुभव मिळणार आहे. यंदाच्या पर्वात स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांना सुद्धा सहभागी होता येणार आहे. (siddharth jadhav)
या सगळ्या धमाल सफरीचा कॅप्टन पुन्हा एकदा असणार आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव. आपल्या भन्नाट शैलीत, उत्स्फूर्त विनोदाने आणि जबरदस्त एनर्जीने सिद्धार्थ जाधव ‘आता होऊ दे धिंगाणाचं’ पाचवं पर्व पुन्हा एकदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. (siddharth jadhav)
या नव्या पर्वाविषयी सांगताना सिद्धार्थ जाधव म्हणाला, आता होऊ दे धिंगाणा हा माझ्यासाठी फक्त एक शो नाही, तर प्रेक्षकांसोबतचा धमाल प्रवास आहे. या कार्यक्रमाने मला वेगळी ओळख दिली. आजही कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत असताना आता होऊ दे धिंगाणाचा प्रेक्षकांकडून आवर्जून उल्लेख होतो. यंदाचं पाचवं पर्व ट्रॉपिकल आयलंडच्या भन्नाट थीममुळे आणखी खास ठरणार आहे. खेळ, मस्ती, साहस आणि कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांची एनर्जी यामुळे प्रत्येक भाग प्रेक्षकांना खऱ्या आयलंड व्हेकेशनचा अनुभव देईल. यावेळी धिंगाणा अक्षरशः पाचपट होणार आहे. (siddharth jadhav)