श्रावणातला मयूरस्पर्श

    31-Aug-2026
 Peacock feather
 
 
श्रावणधारा बरसू लागल्या की मोराचा पिसारा फुलतो आणि त्याचा केकारव आसमंतात घुमतो. मात्र बदलत्या अधिवासामुळे हा मनमोहक पक्षी दिवसेंदिवस दुर्मीळ होत असल्याची खंतही जाणवते. त्याविषयी आढावा घेणारा लेख...
नुकताच श्रावणमास सुरू झाला अन् निसर्ग पुन्हा हिरवा शालू नेसून नटू लागला. आपलं अद्भुत रूप घेऊन श्रावणधारा धरणीवर बरसू लागल्या. अशातच सुखद आठवणींच्या गर्दीतून एक पक्षी समोर आला, ज्याच्यामुळे लहानपणी गाण्यावर नाचायला शिकलो, ज्याच्या असण्याने आवडीने ‘बालभारती’च्या पुस्तकातलं वाचायला शिकलो. हा तोच थुई-थुई नाचणारा, पिसारा फुलवणारा आपला राष्ट्रीय पक्षी मोर!
 
विलक्षण पक्षीसौंदर्याने आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी होण्याचा मान या पक्ष्याला मिळाला. कुक्कुटवर्गातला (Pheasant) हा पक्षी भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशांत आढळतो; पण तरीही याची ओळख संपूर्ण जगाला झाली आहे. भारतात बर्‍याच प्रदेशांत हा पक्षी वास्तव्यास असतो. कधीकधी शहरानजीक तो पाहायलादेखील मिळतो. गवताळ जमिनीचा भाग, झाडांनी व्यापलेली जंगलं ही त्यांची निवासस्थानं. मात्र, सरत्या जंगली क्षेत्रामुळे त्यानं मानवी वस्तीजवळ राहणंदेखील स्वीकारलं. गटाने राहणारे हे पक्षी दिवसभर खाण्याच्या शोधात मानवी वस्तींशेजारी वावरतात. जमिनीवर पडलेली फळे, धान्ये, साप, उंदीर, सरडे आणि टोळ खातात. झुडुपांतून ते लपून राहतात. मोर हा मूळचा दक्षिण आशियातला; पण त्याचा प्रसार मात्र जगभर झाला. आशिया खंडात त्याच्या दोन जाती आढळतात. एक निळा मोर (Pavo cristatus) आणि दुसरा हिरवा मोर (Pavo muticus) तर आफ्रिकेत एक वेगळी जात (Afropavo congensis) आढळून येते. या पक्ष्याच्या नराला ‘मोर’, तर मादीला ‘लांडोर’ म्हणतात.
 
पावसाळ्याची चाहूल लागली की सर्वांत जास्त आनंद होत असेल, तर तो याच मनमोही पक्ष्याला. पावसाच्या संततधारा पडू लागल्या की मोर त्याचा पिसारा फुलवून नाचू लागतो. आपल्या पिसांना पुढे मागे करत मादीसमोर थुई-थुई नाचतो, ते तिचं मन जिंकण्यासाठी. साधारणतः श्रावण महिन्यात त्यांचा हा खेळ चालू असतो. पावसाळ्याचा हा काळ त्यांचा प्रणायाराधनेचा काळ. ज्या लांडोरीला त्याचा हा खेळ आवडतो, ती त्या मोरासोबत राहणं पसंत करते. मोराचा नाचण्याचा कालावधी व फुललेल्या पिसांची संख्या यांनुसार ती मोराची निवड करते. मादी एकावेळी जमिनीत तीन ते पाच अंडी घालते आणि तीच त्या अंड्यांना उबवते. साधारण २८ दिवसांनी अंड्यातून पिल्लं बाहेर येतात अन् आईचं अनुकरण करत अन्न गोळा करायला शिकतात.
 
मोराला अलौकिक सौंदर्य प्राप्त झालं, ते त्याच्या मोरपिसांमुळे. खवल्यांच्या आकाराची बिरंजी पिसं खूप उठावदार असतात. हिरव्या रंगाची ही पिसं प्रकाशानुरूप कधी हिरव्या रंगाची, तर कधी तांबूस भासतात. टोकाकडे जांभळट-काळ्या रंगाचा हृदयाकृती ठिपका प्रत्येक पिसांवर शोभून दिसतो. निळसर जांभळट गोलात बंदिस्त झालेल्या या ठिपक्यांना तपकिरी रंगाचे वलय असते. ते टोकाकडे तपकिरी, हिरव्या रंगांच्या छटांनी लुप्त होते. सुमारे २०० पिसांनी त्यांचं हे सौंदर्य खुलून येतं. लांडोरीला असा पिसारा नसतो; मात्र मोराप्रमाणे तिच्याही डोक्यावर तुरा असतो. मोराची शेपटी दाट तपकिरी रंगाची असते, तर खालचा भाग हिरवा असतो. मोरांचे बळकट पाय आणि बोटांवर असलेल्या तीक्ष्ण शुंडिकेमुळे (spur) ते एकमेकांवर हल्ला करतात. वाघ, कोल्हा व रानमांजर हे मोरांचे नैसर्गिक शत्रू. म्हणूनच त्यांची चाहूल लागली की ते जंगलातील इतर प्राण्यांना सावध करतात. रात्रीच्या वेळी झाडांच्या फांद्यांवर झोपतात. जंगलातील त्यांचा म्याव-म्याव असा केकारव त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देतो. प्राणिसंग्रालयात मोराच्या विविधरंगी प्रजाती पाहायला मिळतात. त्या आंतरजननाने (inbreeding) निर्माण करण्यात आल्या. पांढरा मोर हा मोरांमधील विवर्णतेचा (albinism) प्रकार आहे.
 
महाराष्ट्रात बर्‍याच गाव-जंगलात मोरांचा वावर आढळतो. मात्र त्यांचं प्रमाण गेल्या काही वर्षांत फार कमी झालं. ’IUCN’ च्या ‘रेड लिस्ट’नुसार मोर हा ‘कमीतकमी चिंता’ (List concern) या गटात मोडत असला, तरीही त्याच्या दिसण्याचं प्रमाण हल्ली फारच कमी झालं आहे. मानवी हस्तक्षेपांच्या कचाट्यात हा पक्षी सापडला. शेतातल्या पिकांच तुडतुडे आणि कीटकांपासून रक्षण करणारा हा जीव कीटकनाशकांनी चोळलेल्या बिया खाऊन जमीनदोस्त झाला. उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या जलदुर्भीक्षामुळे त्यांचे अधिवास नष्ट होऊ लागले. घटत्या जंगलांमुळे हे पक्षी इतक्या वेगाने पळाले की त्यांचा मागमूसही हल्ली लागत नाही. भारतात मोराची शिकार करणं, हा दखलपात्र गुन्हा जरी असला, तरीसुद्धा त्यांच्या आकर्षक पिसांसाठी अन् मांसासाठी त्याची हत्या केली जाते. ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात’ या बालगीता सारखी परिस्थीत आता राहिलेली नाही हल्ली परिस्थिती बदलली. आता आंब्याच वन दिसतं, पण तिथे मोर दिसत नाहीत.
 
भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा या मोराच्या अस्तित्वात दडल्या आहेत. भगवान श्रीकृष्णाने आपल्या मुकुटात मोरपंखांना स्थान दिलं. पुराणकथांच्या जडणघडणीत मोरपंखांनी लिहिण्याचं काम केलं. बौद्ध तत्त्वज्ञांनी त्याला शहाणपणाचं प्रतीक मानलं. पण माणसांनी मात्र ‘दिल मांगे मोअर’ म्हणत आपल्या वाढत्या जमिनीच्या हव्यासापोटी त्यांचं जंगल नष्ट केलं आणि मोरांना कायमचंच दूर नेलं. लहानपणी मी मावशीसोबत आजोळात जायचो. आजोळ तसं फार जवळ. त्यामुळे पायवाटेने लोक जात असत. ही पायवाट जंगलातून जाणारी होती. सकाळी दोन-तीन मोर तिथे हमखास दिसायचे. मात्र, कालांतराने ही वाट बंद झाली. ते झाडाझुडपांनी बहरलेलं रान आता बंदिस्त बागेत रूपांतरित झालं. चार-पाच वर्षांपूर्वी घराजवळून बरसत्या श्रावणातल्या पावसातला मोरांचा ऐकू येणारा केकारव हल्ली ऐकण्यास दुर्लभ झाला.
 
पानझडी वनांपासून सदाहरित वनांत आढळणारा हा पक्षी १५ ते २० वर्षे जंगलात जगतो, तर प्राणीसंग्रहालयात तो २३ वर्षेदेखील जगू शकतो. आजपर्यंत हजारो काव्य अन् शेकडो गीतांनी त्याला न्याहाळलं गेलं. कलाकारांच्या समृद्ध कलेनं त्याला नानाकृतीत रेखाटलं गेलं. त्याच्या पिसांनी नानाविध साधनांना आपल्या सौंदर्याने सजवलं. पुराण पुरुषांनी त्यांच्या लेखणीतून त्यांना महत्त्व दिलं. आजही ते जिवंत आहेत, आपला पिसारा फुलवून पावसाला आमंत्रण देण्यासाठी. तो दिसतो, पहाटे गाव जागं करणार्‍या, वासुदेवाच्या टोपात. उदाच्या सुगंधाने दुआ मागणार्‍या, फकिरांच्या हातांनी आजही त्याच्या मोरपिसांचा स्पर्श होतो. आजही काही घरांत मोरपिसं ठेवली जातात, ती समृद्धीचं प्रतीक म्हणून. पण मोरांना तितकं जपलं जातं नाही. आपल्या भारतीय संस्कृतीच प्रतीक असलेला हा जीव वाचला, तरच आपल्या देशाची ओळख जगासमोर राहील. काही आदर्श गावं आजही महाराष्ट्रात मोरांचं संगोपन करतात; त्यांतलंच एक ‘मोराची चिंचोळी’ हे गाव. इथे मोरांची शिकार केली जात नाही. तिथे त्यांना वाढवलं जातं. माणसांशी पक्ष्यांना जोडलं जातं. मागच्याच महिन्यात दादरमध्ये मोरांनी हजेरी लावली, म्हणून समाजमाध्यमांवर पावसाचे अंदाज वर्तवले गेले. पाऊस आणि मोर हा सहसंबंध समजून घेण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत. आत्मीयतेने पक्ष्यांचे अधिवास वाचवण्यासाठी प्रत्येकाने ‘दिल मांगे मोर’ असं म्हणायला हवं; तरच त्या बालगीतातली ‘तुझी माझी जोडी जमली रे’ ही ओळ खरी ठरेल.
 
-परेश गुरव
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागात साहा. प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)




संबंधित मजकूर