अभिनेता रजत बेदींची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री !

    31-Aug-2026
 
rajat
 
 
 
 
मुंबई - (Rajat Bedi)मराठी सिनेमांकडे हिंदी कलाकारांचा वाढता ओढा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय हिंदी कलाकाराचं नाव जोडलं जाणार आहे. हिंदीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास केलेले अभिनेता रजत बेदी आता मराठी सिनेमाशी जोडले गेले आहेत. रजत बेदी हे आगामी मराठी चित्रपट ‘बंधू’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून, या चित्रपटाच्या निमित्ताने बेदी कुटुंबाचा मराठी चित्रपटसृष्टीशी नवा ऋणानुबंध जुळला आहे.
 
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज बेदी कुटुंबाचा समृद्ध वारसा आता मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते नरेंद्र बेदी यांचे पुत्र आणि ज्येष्ठ उर्दू साहित्यिक, पटकथाकार व दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांचे नातू रजत बेदी मराठी चित्रपटसृष्टीत नवे पर्व सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘मधुमती’, ‘अभिमान’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, देवदास’, ‘एक चादर मैली सी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या लेखनातून राजिंदर सिंह बेदी यांनी हिंदी सिनेमाला समृद्ध केले.  (Rajat Bedi)
 
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर नरेंद्र बेदी यांनी ‘बंधन’,‘जवानी दिवानी’, ‘खोटे सिक्के’, ‘बेनाम’, ‘रफू चक्कर’ आणि ‘सनम तेरी कसम’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे, ‘बेनाम’ आणि ‘अदालत’ हे अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेले त्यांचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. या दोनही दिग्गजांचा कलावारसा पुढे नेत रजत बेदी आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांच्या या नव्या प्रवासाकडे मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे, हा प्रवेश केवळ एका कलाकाराचा नसून चित्रपटसृष्टीची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या बेदी कुटुंबाच्या पुढच्या पिढीचा मराठी सिनेमाशी जोडला जाणारा नवा अध्याय ठरणार आहे.  (Rajat Bedi)
 
रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने ‘बंधू’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई, कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे.  (Rajat Bedi)
 
मॉडेलिंगपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रजत बेदी यांनी १९९४ मध्ये ‘ग्लॅडरॅग्स मॅनहंट स्पर्धा’ जिंकली. ‘२००१: दो हजार एक’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर ‘कोई मिल गया’ मधील भूमिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. ‘जोडी नंबर १’, ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘रक्त’, ‘अक्सर’, ‘पार्टनर’ यांसह अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केलेल्य ‘Bads of Bollywood’ या सिरीजच्या माध्यमातून रजत बेदी यांनी अभिनय क्षेत्रात दमदार कमबॅक केले असून, त्यांच्या या नव्या इनिंगची विशेष चर्चा झाली.
अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही रजत बेदी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे ‘बंधू’चे प्रस्तुतकर्ते म्हणून त्यांचा सहभाग हा केवळ व्यावसायिक भागीदारी नसून, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रदीर्घ प्रवासातून मराठी सिनेमाला मिळणारा एक नवा हातभार मानला जात आहे.  (Rajat Bedi)
 
मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणाबद्दल रजत बेदी म्हणाले, ‘बेदी कुटुंबासाठी भारतीय चित्रपटसृष्टी ही केवळ एक इंडस्ट्री नाही, तर आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. माझ्या वडिलांपासून आणि आजोबांपासून मिळालेला हा वारसा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आता मराठी चित्रपटातून या प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. मराठी सिनेमा त्याच्या आशयासाठी आणि दर्जेदार कथांसाठी ओळखला जातो. त्यामुळे या चित्रपटाचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षक माझ्या या नव्या भूमिकेचं आणि या चित्रपटाचं नक्कीच प्रेमाने स्वागत करतील, अशी आशा आहे.’
बेदी कुटुंबाची चित्रपटसृष्टीतील परंपरा आणि रजत बेदी यांचा प्रदीर्घ अनुभव यामुळे त्यांच्या मराठी पदार्पणाकडे आता विशेष उत्सुकतेने पाहिलं जात आहे.  (Rajat Bedi)
 




संबंधित मजकूर