ठाणे: (Mumbra) गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान मुंब्रा येथे गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीचे चाक अचानक निसटल्याने मूर्ती खाली कोसळण्याचा गंभीर प्रसंग निर्माण झाला. मात्र, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखून ट्रॉली थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. शनिवारी, २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भिवंडीच्या श्री गणेश मंडळाची गणेशमूर्ती ट्रॉलीमधून मुंब्रा परिसरातून जात असताना, कार्यशाळेपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर ट्रॉलीचे चाक अचानक निसटले. त्यामुळे ट्रॉली एका बाजूला झुकली आणि गणेशमूर्ती घसरण्याची शक्यता निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने ट्रॉली थांबवली. (Mumbra)
यानंतर मदतीसाठी मुंब्रा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी जेसीबी आणि हायड्रॉलिक ट्रॉली मागविण्यात आली. मूर्तीला कोणतीही इजा होऊ नये याची खबरदारी घेत तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गणेशमूर्ती सुरक्षितपणे उचलण्यात आली. (Mumbra)
ट्रॉलीचे नुकसान झाल्याने ती बदलून नवीन ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर गणेशमूर्तीचा आगमन सोहळा पुन्हा सुरू करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Mumbra)
दरम्यान, ट्रॉलीचे चाक नेमके कोणत्या कारणामुळे निसटले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. रस्त्यावरील खड्डा, मूर्तीचे वजन किंवा ट्रॉलीतील तांत्रिक बिघाड यापैकी नेमके कारण काय, याचा तपास होणे गरजेचे आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुकीपूर्वी वाहतूक करणाऱ्या ट्रॉलींची तांत्रिक तपासणी आणि सुरक्षिततेची खात्री करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. (Mumbra)