मुंबई : (Mumbai Port) दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या बीपीएस लोकेशनजवळ रविवारी सायंकाळी एका भीषण दुर्घटनेत 'बरकत' नावाची भव्य क्रेन कोसळून आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ७:१५ वाजताच्या सुमारास मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पियर पॉप / बीपीएस परिसरात कामकाज सुरू असताना 'बरकत' ही क्रेन अचानक अनियंत्रित होऊन उलटली. क्रेन कोसळल्याच्या भीषण धक्क्याने लागलीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आग भडकली. (Mumbai Port)
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर वेळेत नियंत्रण मिळवले. या अपघातात जखमी झालेल्या दोन जणांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासन आणि स्थानिक पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. (Mumbai Port)