मुंबई : (Mumbai Ganpati Aagman 2026) मुंबईत गेल्या दोन आठवड्यांपासून सुट्टीचा दिवस आला की एकच उत्साह आणि गर्दी दिसून येत आहे- ती म्हणजे विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांच्या आगमन सोहळ्यांची. चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा, तारदेवचा राजा, मेट्रोचा राजा यांसह अनेक लोकप्रिय गणपतींचे भव्य आगमन सोहळे नुकतेच पार पडले.
ढोल-ताशांचा गजर, रोषणाई, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते आणि भक्तांची मोठी गर्दी यामुळे या आगमन सोहळ्यांना उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, या सोहळ्यांचे खरे आकर्षण ठरत आहेत ते म्हणजे प्रत्येक मंडळाने साकारलेले बाप्पाचे मनमोहक, भव्य आणि कल्पक नवे रूप. पौराणिक संकल्पना, संतुलनावर आधारित कलाकृती, सामाजिक संदेश आणि नेत्रदीपक देखाव्यांमुळे भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Mumbai Ganpati Aagman 2026)
चला तर, गेल्या काही दिवसांत पार पडलेल्या मुंबईतील प्रमुख बाप्पांच्या आगमन सोहळ्यांचा आणि यंदा सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या बाप्पाच्या वैशिष्ट्यपूर्ण रूपांचा आढावा घेऊया. (Mumbai Ganpati Aagman 2026)
काळाचौकीच्या महागणपती :
नटराज रूपातील काळाचौकीचा राजा
नटराज मुद्रेतील देखणी गणेशमूर्ती आणि पायाशी असलेला भव्य सिंह यामुळे काळाचौकीचा राजा मुंबईकरांसाठी विशेष आकर्षण ठरतो. लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणीप्रमाणेच या गणपतीच्या आगमन व दर्शनासाठीही गणेशभक्त मोठी गर्दी दिसून आली. काळाचौकीच्या पुलावरून होणारा बाप्पाचा आगमन सोहळा, ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांचा उत्साह हे दरवर्षीचे नेत्रदीपक दृश्य असते. (Mumbai Ganpati Aagman 2026)
काळाचौकीचा महागणपतीच्या आगमन मिरवणुकीत यंदा मोरया ढोल-ताशा पथकाने मुंबईतील बेस्ट बस सेवा आणि तिच्या कष्टकरी कर्मचाऱ्यांना अनोखी मानवंदना दिली. पथकातील वादकांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचा ओळखीचा खाकी गणवेश परिधान करून ढोल-ताशांचे वादन केले. मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट सेवेत दिवसरात्र कार्यरत असलेल्या चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरातून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाला दिलेला हा सलाम आगमन मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरला. (Mumbai Ganpati Aagman 2026)
हातात ढोलकी घेत उभा बाप्पा; वारकरी रूपातील परळचा राजा
परळच्या राजाने यंदा वारकरी परंपरेला अभिवादन करणारा नवा पोशाख परिधान केला आहे. हातात ढोलकी घेत उभ्या असलेल्या बाप्पाच्या मूर्तीला वारकरी रूपाची जोड देण्यात आली असून, या वेशभूषेतून भक्ती, समता आणि लोकपरंपरेचा भाव अधोरेखित करण्यात आला आहे. (Mumbai Ganpati Aagman 2026)
मिरवणुकीत सहभागी झालेली लहान मुलेही बाप्पाच्या पोशाखात लुकलुकत होती. काहींनी धोतर, फेटा, उपरणे आणि पारंपरिक दागिने परिधान केले होते, पारंपरिक वादनकलेचा संदर्भ देणारे हे रूप आगमन मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरले. मूर्तीची भव्यता, ढोलकीची रचना आणि बाप्पाच्या रूपातील उत्सवी भाव यामुळे भाविकांची नजर या कलाकृतीवर खिळून राहिली. (Mumbai Ganpati Aagman 2026)
रिंगण सोहळ्याने जागवला पंढरपूरचा अनुभव
परळच्या राजाच्या आगमन सोहळ्यात पार पडलेल्या रिंगणाने भक्तिमय वातावरण अधिकच भारावून गेले. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाची साथ, वारकरी परंपरेची झलक आणि बाप्पाच्या जयघोषात रंगलेल्या रिंगणाने उपस्थित भाविकांना जणू पंढरपूरच्या वारीचा अनुभव दिला. गणेशोत्सवातील उत्साहाला वारकरी संप्रदायाच्या भक्तिरसाची जोड मिळाल्याने हा सोहळा आगमनातील लक्षवेधी क्षण ठरला. (Mumbai Ganpati Aagman 2026)
‘विद्यादान – ज्ञानाची पालखी’; डोईवर पालखी घेऊन उभा बाप्पा
मुंबईच्या इच्छापूर्ती गणपतीने यंदा ‘विद्यादान – ज्ञानाची पालखी’ ही अर्थपूर्ण संकल्पना साकारली. मूर्तिकार अग्नी मोहिते यांनी संस्कृती, कला आणि भक्तीचा सुंदर संगम साधत उभी गणेशमूर्ती घडवली. डोक्यावर ज्ञानाची पालखी धारण केलेल्या बाप्पाच्या या भव्य-दिव्य रूपाने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. (Mumbai Ganpati Aagman 2026)
या मूर्तीची रचना कोकणातील पारंपरिक पालखी उत्सवाचे प्रतीक भासत होती. कोकणच्या गावागावांत जपल्या जाणाऱ्या पालखी परंपरेतील श्रद्धा, भक्तिभाव आणि सामूहिक उत्सवाची झलक या संकल्पनेतून अनुभवता आली. ज्ञानाची पालखी डोक्यावर घेऊन उभा असलेला बाप्पा जणू शिक्षणाचा प्रकाश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा संदेश देत होता. ज्ञानाचे महत्त्व, शिक्षणाचा प्रसार आणि कोकणातील पालखी उत्सवाचा सांस्कृतिक वारसा यांचा प्रभावी संगम इच्छापूर्ती गणपतीच्या या कलाकृतीतून मांडण्यात आला.
गालावरील खळ्यांमुळे ‘खळीवाला बाप्पा’ म्हणून ओळखला जाणारा बाल गणेशचा बल्लाळेश्वर यंदा इंद्रदेव प्रेरित रूपात भाविकांसमोर आला. बाप्पाच्या गोड, प्रसन्न रूपाला पौराणिक संकल्पनेची जोड मिळाल्याने आगमन सोहळ्यात या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक भक्तिभाव आणि आकर्षक कलाकृती यांचा सुंदर मेळ या संकल्पनेत पाहायला मिळाला. (Mumbai Ganpati Aagman 2026)
अखिल चंदनवाडी एस.जी.एम.च्या गणेशमूर्तीने यंदा आगळीवेगळी छाप पाडली. नंदीवर संतुलित असलेल्या महादेव अवतारातील बाप्पाच्या रूपातून गणपती आणि महादेव या दोन्ही आराध्य दैवतांचा सुंदर मिलाफ साकारण्यात आला होता. मूर्तीतील बारकावे, संतुलनाची रचना आणि पौराणिक संकल्पनेमुळे भाविकांनी या बाप्पाचे विशेष कौतुक केले. (Mumbai Ganpati Aagman 2026)
सावित्रीबाई फुले प्रेरित देखाव्यातून मुलींच्या शिक्षणाचा संदेश
मेट्रोच्या राजाने यंदा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसह अर्थपूर्ण देखावा साकारत गणेशोत्सवाला समाजप्रबोधनाची जोड दिली आहे. हातात पुस्तके घेतलेल्या मुलींच्या प्रतिकृतीतून मुलींचे शिक्षण, समान संधी आणि सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
शिक्षणामुळे मुलगी आत्मनिर्भर, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण बनते, हा विचार या संकल्पनेतून अधोरेखित करण्यात आला. बाप्पाच्या आगमन सोहळ्यात भक्तीबरोबरच सामाजिक परिवर्तनाचा संदेश पोहोचवणारा मेट्रोच्या राजाचा हा देखावा यंदाच्या विशेष आकर्षणांपैकी एक ठरला. (Mumbai Ganpati Aagman 2026)
एकंदरीत, यंदाच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यांत भक्ती, कला, परंपरा आणि समाजप्रबोधनाचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे. नटराज रूपातील काळाचौकीचा राजा, वारकरी रूपातील परळचा राजा, ज्ञानाची पालखी घेऊन उभा असलेला इच्छापूर्ती बाप्पा आणि सावित्रीबाई फुले प्रेरित मेट्रोचा राजा अशा अनेक संकल्पनांनी मुंबईकरांचे लक्ष वेधले आहे. (Mumbai Ganpati Aagman 2026)
मात्र, गणेशभक्तांची उत्सुकता अजूनही शिगेला आहे. कारण, मुंबईचा राजा आणि लालबागच्या राजाची पहिली झलक अद्याप बाकी आहे. या दोन्ही मानाच्या बाप्पांचे यंदाचे रूप, सजावट आणि आगमन सोहळ्याची संकल्पना काय असेल, याकडे आता संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे. बाप्पाच्या आगमनाचा हा उत्सव पुढील दिवसांत आणखी रंगणार असून, “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने मुंबई पुन्हा एकदा दुमदुमणार आहे.