गणपतीला कोकण गाठण्यासाठी रेल्वेची ‘फुल्ल तयारी’; ‘अर्धा तास आधी स्थानकावर या’ ; मध्य रेल्वेचे आवाहन

मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्या; २०० विशेष गाड्यांना १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण!

ganpati spl 
 
मुंबई : (Kokan Railway Current Status) गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा २६२ गणपती विशेष गाडी सेवा जाहीर केल्या असून, त्यापैकी २०० आरक्षित विशेष गाड्यांमध्ये आतापर्यंत तब्बल १ लाख १७ हजार ६८२ प्रवाशांनी आरक्षण केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकण गाठण्याची प्रवाशांची लगबग स्पष्ट होत आहे.
 
मध्य रेल्वेच्या या विशेष गाड्या ९ सप्टेंबर २०२६पासून धावणार आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूर येथून कोकणासाठी या सेवा चालविण्यात येणार आहेत. आरक्षित २०० विशेष गाड्यांमध्ये सावंतवाडी रोडसाठी ११२, रत्नागिरीसाठी ६४ आणि मडगावसाठी २४ फेऱ्या असतील. वातानुकूलित तसेच एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांच्या मिश्र रचनेतील गाड्यांसोबत ६२ अनारक्षित विशेष गाड्याही धावणार आहेत. (Kokan Railway Current Status)
 
गणेशोत्सवात स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त तिकीट खिडक्या, प्रमुख स्थानकांवर होल्डिंग एरिया आणि रांग व्यवस्थापनाची तयारी केली आहे. प्रवाशांना पिण्याचे पाणी, भोजन आणि स्वच्छतागृहाची सुविधा मिळावी यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. (Kokan Railway Current Status)
 
विशेष गाड्यांमध्ये शिस्तबद्ध बोर्डिंगसाठी अतिरिक्त आरपीएफ जवान आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. प्रमुख स्थानकांवर सुरक्षेसाठीही अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. अंतिम क्षणी होणारी धावपळ आणि गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या किमान अर्धा तास आधी स्थानकावर पोहोचावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. विशेष गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग आणि थांबे यांची माहिती NTES अॅप आणि भारतीय रेल्वेच्या चौकशी प्रणालीवर उपलब्ध आहे. (Kokan Railway Current Status)
 
अनारक्षित गाड्यांची तिकिटे युटीएस प्रणालीद्वारे बुक करता येणार असून, रेल वन अॅपचाही वापर करता येईल. प्रवाशांनी वैध तिकीट आणि ओळखपत्रासह प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणाकडे निघणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने यंदा विशेष गाड्यांसह गर्दी आणि सुरक्षेचेही नियोजन केले आहे. (Kokan Railway Current Status)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर