‘शटलक्वीन’ करिश्मा...

    31-Aug-2026   

Karishma Khardikar

सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्येच्या शिकवणीचा ध्यास घेत, खेळातल्या आव्हानांचा सामना करणार्‍या यशस्वी बॅडमिंटनपटू करिश्मा सुनील खर्डीकर हिच्याविषयी...
 
डोंबिवलीकन्या करिश्माने अवघ्या सातव्या वर्षीच, आपल्या पालकांच्या साहाय्याने ध्येयनिश्चिती केली. विविध कलाक्षेत्रांत रुची असल्याने, सुरुवातीला तिने नृत्य, रांगोळी, मेहेंदी, तसेच कथाकथन स्पर्धेत सहभागी होऊन भरपूर प्रशस्तिपत्रके मिळविली. बालसाहित्य संमेलनातील तिच्या ‘रेशमाच्या रेघांनी’ या लावणीने तर प्रेक्षक आणि परीक्षकांचीही वाहवा मिळवली. कराटेमध्येही तिने ‘व्हाईट’ व ‘यलो बेल्ट’ मिळवला आहे.
 
वयाच्या नवव्या वर्षी तिने ‘भारतीय प्रा नौसेना प्रशिक्षण संस्थे’चा, दीड वर्षाचा मिलिटरी ट्रेनिंगचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. सैनिकांचे जीवन जवळून अनुभवता येण्यासाठी करिश्मा 'केरळम्'च्या कुन्नूर येथील, ‘अ‍ॅडव्हान्स मिलिटरी ट्रेनिंग’ कॅम्पलाही गेली होती. करिश्माच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन, तिचे पालक सुनील व संगीता यांनी तिच्यासमोर योग, नृत्य, बॅडमिंटन, मिलिटरी, डॉटर, इंजिनयर इ. पर्याय ठेवले. यापैकी करिश्माने बॅडमिंटन निवडले. त्यानुसार डोंबिवलीच्या पेंडसेनगर येथील क्रीडाभवनात बास्ते सरांकडे, तिने बॅडमिंटनचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
 
सुरुवातीला शाळेसाठी, नंतर तालुका, जिल्हा व नंतर राज्यपातळीवरही ती खेळू लागली. प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा आणि पदके जिंकायची हा तिचा शिरस्ता. विविध स्पर्धांमध्ये भाग घेत, करिश्माने भरपूर सन्मानचिन्हे, पदके, प्रशस्तिपत्रके मिळवली आहेत. सध्या ती राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी सज्ज आहे. तिने ठाण्याच्या श्रीकांत वाड यांच्याकडे, बॅडमिंटनचे अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षण घेतले. त्यासाठी वयाच्या ११व्या वर्षापासून ती डोंबिवली ते ठाणे एकट्याने प्रवास करत आहे. तिची खेळाप्रतिची जिद्द पाहून, तिचे पालक ठाणे येथेच स्थायिक झाले. वयाच्या ११व्या वर्षी ठाण्यातील ढोकाळी बॅडमिंटन स्पर्धेत जिंकून, तिने ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते पारितोषिक मिळवले. त्यानंतर कल्याणमधील अगरवाल महाविद्यालयातील स्पर्धेत विजयी होऊन, आ. नरेंद्र पवार यांच्या हस्ते तिला बक्षीस मिळाले. तसेच, ठाणे महानगपालिकेच्या स्पर्धेतही, करिश्माला उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेत्री मुग्धा गोडसे यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले आहे.
 
वयाच्या १३व्या वर्षी करिश्माने इंडोनेशिया येथे ३० दिवसांचा अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला होता. कोईम्बतूरच्या राष्ट्रीय स्पर्धेतही तिने, उत्तम कामगिरीच्या जोरावर समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर सलग दोन वर्षे तिने अंधेरी येथील मनोरा बॅडमिंटन स्पर्धेत, १५ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम येण्याचा पराक्रम केला. प्रेस फिट आयोजित १५ वर्षांखालील मुलींच्या गटातही, ती विजेती, तर १७ वर्षांखालील मुलींच्या गटात ती उपविजेती ठरली. जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत आजवर तिने अनेक बक्षिस मिळवली आहेत. शालेय व महाविद्यालयीन स्तरावरही ५० हून अधिक पदके तिने प्राप्त केली आहेत.
 
तिच्या प्रभावी कामगिरीमुळे, छत्तीसगढ सरकारने तिला आपल्या राज्याकडून खेळण्याचे आमंत्रण दिले होते. तिथेही तिने कामगिरीची छाप सोडलीच. छत्तीसगढकडून खेळत तिने १२ वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले असून, त्यांपैकी पाचवेळा तिने विजेतेपद पटकावले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. करिश्मा खर्डीकर भारतामध्ये ४१ स्थानी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचे रँकिंग उत्तम आहे.
 
तिच्या यशामागे प्रशिक्षक श्रीकांत वाड यांचा मोलाचा वाटा असून, ते तिच्या आयुष्यातील ‘द्रोणाचार्य’ आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू अक्षय देवलकर, तसेच मयुर घाटणेकर, ईशान निखाते, संदीप , प्रशांत, विशाल, भागवत, अमित अशा अनेक राष्ट्रीय खेळाडूंचेही तिला मार्गदर्शन लाभले. तसेच तिचा चुलतभाऊ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रितीश खर्डीकर याच्याकडूनही तिला, वेळोवेळी फिटनेसबाबत मार्गदर्शन मिळते.
 
करिश्माने योग, ब्रह्मविद्या, मेडिटेशन, बुद्धिबळातही अनेक बक्षीसे मिळवली आहेत. बॅडमिंटन खेळात प्राविण्य मिळवत असतानाच, तिने ‘बीएस्सी’ पूर्ण केले. सध्या ती ‘बीएनवायएस’ करीत आहे. तिच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यशामुळेच, तिला ‘आदर्श डोंबिवलीकर सन्मान’ प्राप्त झाला. महिला दिनाच्या औचित्याने ‘कडोंमपा’चे उपसभापती मोरेश्वर भोईर व अभिनेत्री मयुरी वाघ हिच्या हस्ते तिला ‘वैभवी पुरस्कार’, ‘अक्षरमंच प्रतिष्ठान‘चा ‘भरारी पुरस्कार’, ‘महाराष्ट्र वैभव पुरस्कार’, मॉरिशस व बँकॉक येथील संस्थाकडून ‘ज्वेल ऑफ इंडिया’, ‘न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थे’चा ‘महिला पुरस्कार’, अशा ५० हून अधिक पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आले.
 
बॅडमिंटन कोर्टावर हुकमत गाजवणार्‍या करिश्माचे कर्तृत्व निश्चितच प्रेरणादायी. प्रसिद्ध खेळाडू सायना नेहवाल हिला ती आदर्श मानते. तिचे मुख्य ध्येय आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवण्याचे आहे. आव्हानांना न घाबरता, ध्येयप्राप्तीसाठी झटणारी करिश्मा आजच्या तरुणांसाठी आदर्श आहे. लहान वयात ध्येय निश्चित करून, त्यासाठी प्रयत्न केल्यास, स्वप्न साकार होतात, याचे करिश्मा हे सुंदर उदाहरण. बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय क्षितिजावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावण्याचे तिचे स्वप्न लवकरच साकार होवो आणि तिच्या नावाप्रमाणेच तिच्या कर्तृत्वाचा ‘करिश्मा’ जगभर उमटत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!




संबंधित मजकूर