कल्याण : (Kailas Mansarovar Yatra) कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेल्या ४३ यात्रेकरूंनी नुकताच अत्यंत थरारक, भावनिक आणि आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव घेतला. कैलास पर्वताचे दर्शन घेण्याच्या आध्यात्मिक समाधानासोबतच नेपाळ-चीन सीमेवरील तिमुरे येथे आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीचे भयावह परिणाम, त्यानंतर चीनमध्ये निर्माण झालेली मन सुन्न करणारी परिस्थिती आणि अखेरीस कोदारी बॉर्डरमार्गे नेपाळमध्ये प्रवेश करून भारतात सुखरूप परतण्याचा प्रवास, हा आम्हा यात्रेकरूंसाठी अक्षरशः मृत्यूच्या छायेतून परतीचा प्रवास ठरला, असे यात्रेकरूंनी सांगितले.
या संपूर्ण संकटकाळात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , त्यांचे निकटवर्तीय अभिजीत दरेकर तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे निवासी उपजिल्हाधिकारी (RDC) डॉ. संदीप माने , कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणांनी घेतलेली काळजी व केलेला पाठपुरावा तसेच कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी वेळोवेळी केलेला संपर्क यात्रेकरूंसाठी मोठा आधार ठरल्याचे यात्रेकरूंनी सांगितले. (Kailas Mansarovar Yatra)
प्रवासाची सुरुवात
प्रकाश माने व त्यांच्या पत्नी प्रतीक्षा व इतर ५० जण रुद्र टुर ॲड ट्रॅव्हल मार्फत कैलास-मानसरोवर येथे भगवान महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते. मुंबई ते काठमांडू विमानाने आणि त्यानंतर काठमांडू ते तिमुरेपर्यंत त्यांनी बसने प्रवास केला. तिमुरे येथील एका हॉटेलमध्ये मुक्काम करताना तेथील हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले. (Kailas Mansarovar Yatra)
दिवसभर चहा-नाश्ता, रात्रीचे जेवण आणि अगदी घरच्या माणसांप्रमाणे केलेली विचारपूस आजही मनात ताजी आहे. हॉटेलपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या त्रिशूली नदीच्या परिसरातील तिमुरे बॉर्डरवर इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून कैलास - मानसरोवरच्या दर्शनासाठी चायना देशात प्रवेश करत पुढे निघालो. (Kailas Mansarovar Yatra)
तिमुरेची दुर्घटना
चीन मधील कैलास-मानसरोवर येथे पोहोचल्यानंतर तिमुरे येथे दुर्घटना घडल्याची बातमी त्यांना समजली. सुरुवातीला ही दुर्घटना एवढी भयंकर असेल, याची कल्पनाही नव्हती. भाषेची अडचण असल्याने चिनी प्रशासनाकडून मिळणारी माहिती समजत नव्हती. मात्र सोशल मीडिया, नातेवाईक, मित्र आणि परिचितांकडून माहिती मिळू लागल्यानंतर तिमुरे येथे घडलेल्या नैसर्गिक आपत्तीचे भयावह स्वरूप हळूहळू समोर आले. (Kailas Mansarovar Yatra)
आपत्तीचे भयावह स्वरूप
ज्या हॉटेलमध्ये काही काळापूर्वी चहा-नाश्ता केला, जेवण केले, ज्या लोकांनी आमची सेवा केली आणि कैलास-मानसरोवर यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या, त्यापैकी सर्वजण या आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडल्याचे समजल्यानंतर मन सुन्न झाले. हॉटेल, परिसरातील इतर हॉटेल्स, वाहने, रस्ते आणि नेपाळ-चीन सीमेवरील मजबूत पूलदेखील या प्रचंड नैसर्गिक आपत्तीमध्ये वाहून गेले. (Kailas Mansarovar Yatra)
चिनी बाजूकडील इमिग्रेशन सेंटरची भव्य व मजबूत इमारत आणि परिसर, शेकडो वाहने आणि तेथे कार्यरत असलेले चिनी, नेपाळी व तिबेटी कर्मचारी तसेच भगवान महादेवाच्या दर्शनासाठी आतुरतेने निघालेले शेकडो भाविक या आपत्तीचे बळी ठरले आणि क्षणांत होत्याचे नव्हते झाले. (Kailas Mansarovar Yatra)
संकटाची तीव्रता
कैलास-मानसरोवरचे दर्शन व परिक्रमा पूर्ण करून सागा या शहरात आलो, तोपर्यंत या संकटाची पूर्ण तीव्रता जाणवत नव्हती. मात्र सागा येथे आल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे जाणवले. चीन सरकारच्या निर्देशांमुळे पुढील प्रवासावर निर्बंध आले आणि नेपाळमध्ये प्रवेशाचा मार्ग बंद झाल्याने जगभरातून आलेले यात्रेकरू चिंतेत पडले. नेपाळमधील टुरिस्ट कंपनीचे ९ कर्मचारी देखील होते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता - आता घरी कसे जायचे ? (Kailas Mansarovar Yatra)
मदतीचा हात
या परिस्थितीत कोणाशी संपर्क साधायचा, याचा विचार सुरू असतानाच प्रकाश मानेयांनी तातडीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय अभिजीत दरेकर यांच्याशी संपर्क साधला. अभिजीत दरेकर यांनी तातडीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही सुरू केली. (Kailas Mansarovar Yatra)
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, कल्याण तहसीलदार कार्यालय, महाराष्ट्र राज्य आणीबाणी नियंत्रण कक्ष आणि शासनाच्या विविध विभागांमधून संपर्क सुरू झाला. (Kailas Mansarovar Yatra)
प्रशासनाची तत्परता
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, कल्याण तहसीलदार कार्यालय, महाराष्ट्र राज्य आणीबाणी नियंत्रण कक्ष आणि शासनाच्या विविध विभागांमधून संपर्क सुरू झाला. ठाणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी गेल्या तीन दिवसांत सुमारे सहा वेळा स्वतः फोन करून विचारपूस केली. "काळजी करू नका, काही मदत लागली तर आम्हाला सांगा," या शब्दांनी परदेशातील संकटात असलेल्या यात्रेकरूंना मोठा मानसिक आधार दिला. (Kailas Mansarovar Yatra)
कल्याण तालुक्याचे तहसीलदार विकास गारुडकर साहेब यांनीदेखील स्वतः फोन करून आमची विचारपूस केली आणि कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. (Kailas Mansarovar Yatra)
भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांकडूनही आमच्याशी संपर्क साधण्यात आला आणि आम्हाला सुरक्षितपणे आपल्या देशात परतण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची खात्री देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील अधिकारी - कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आम्हाला संपर्क करून ”तुम्ही एकटे नाही”, “काळजी करू नका, भारत सरकारच्या वतीने आवश्यक ती मदत केली जाईल,” असा विश्वास दिला. (Kailas Mansarovar Yatra)
विशेष म्हणजे सोबत असलेल्या कॅनडा, फ्रान्स आणि इंग्लंडमधील यात्रेकरू नागरिकांनीही महाराष्ट्रातून मिळणाऱ्या या तत्पर मदतीचे कौतुक केले. भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील प्रशासन इतक्या बारकाईने आपल्या नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांची काळजी घेत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. (Kailas Mansarovar Yatra)
मुंबईत आगमन
अखेर २९ ऑगस्ट २०२६ रोजी चीन-नेपाळ जोडणाऱ्या अतिरिक्त कोदारी बॉर्डरमार्गे आम्हाला नेपाळमध्ये प्रवेश देण्यात आला. (Kailas Mansarovar Yatra)
सकाळी सुमारे ६ वाजता प्रवास सुरू करून चीनमधून कोदारी बॉर्डरमार्गे नेपाळमध्ये प्रवेश केला आणि कोदारी ते काठमांडू असा प्रदीर्घ खडतर प्रवास करत २९ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर सुमारे २ वाजता काठमांडू येथील मंडाला नॉर्लिंग लॉर्ड्स प्राईम हॉटेलमध्ये सुखरूप पोहोचलो. (Kailas Mansarovar Yatra)
अखेर रविवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता नेपाळ एअरलाइन्सच्या RA 201 या विमानाने महाराष्ट्रात राहणारे भाविकांनी काठमांडूहून मुंबईकडे प्रयाण केले आणि सुखरूप मुंबईत पोहचले. (Kailas Mansarovar Yatra)
या संपूर्ण घटनेकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. तिमुरे येथे घडलेली आपत्ती ही अत्यंत भीषण नैसर्गिक आपत्ती होती अशा नैसर्गिक संकटासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा देशाला दोष देणे योग्य ठरणार नाही. मात्र संकट आल्यानंतर नागरिकांच्या पाठीशी कोण उभे राहते, ही खरी कसोटी असते आणि या कसोटीच्या प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या माध्यमातून अभिजीत दरेकर यांनी केलेला पाठपुरावा, तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने , आमदार राजेश मोरे , कल्याण तहसीलदार विकास गारुडकर , आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणांनी केलेले सहकार्य आम्ही आयुष्यभर विसरणार नाही असे माने यांनी सांगितले. (Kailas Mansarovar Yatra)
कैलास-मानसरोवर यात्रेत आम्हाला भगवान महादेवाचे दर्शन झाले; परंतु या संपूर्ण संकटातून परतताना माणुसकी, प्रशासनाची संवेदनशीलता आणि लोकप्रतिनिधींची तत्परता यांचेही दर्शन झाले. (Kailas Mansarovar Yatra)
तिमुरेतील त्या हॉटेलमधील माणसे, नेपाळ आणि चायना इमिग्रेशन सेंटरव्दारे आम्हाला सेवा देणारे अनेक शासकिय अधिकारी व कर्मचारी, कैलास मानसरोवरचे दर्शनासाठी आलेले शेकडो भाविक आज आपल्यात नाहीत ही वेदना कायम मनात राहील, या सर्वांना मनःपूर्वक श्रद्धांजली आणि आमच्यासारख्या ४३ यात्रेकरू व ९ नेपाळी कर्मचाऱ्यांच्या संकटकाळात “तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” या भावनेने उभे राहिलेल्या सर्वांचे कैलास-मानसरोवर यात्रेकरू प्रकाश माने यांनी आभार मानले.