गुरुकुल प्रतिष्ठानच्या ‘परंपरा’ कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी

    31-Aug-2026   

कल्याण : (Music) गुरु-शिष्य परंपरेतून भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा पुढे नेण्याच्या उद्देशाने गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आठव्या ‘परंपरा’ कार्यक्रमात बासरीच्या सुमधुर स्वरांनी कल्याणकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. येथील के सी गांधी शाळेच्या सभागृहामध्ये गुरुकुलच्या नवोदित कलाकारांपासून ते संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या दर्जेदार सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमाची सुरुवात गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘ॐ जय जगदीश हरे’ या लोकप्रिय भजनाने झाली. त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रचित ‘जयोस्तुते’ या गीताचे बासरीवर सुरेल सादरीकरण करण्यात आले. भारतीय भावसंगीताची विविधता अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मधुमास हा नवा’ यांसारख्या लोकप्रिय मराठी चित्रपटगीतांसह देवीच्या गोंधळावरील विविध गाण्यांचेही यावेळी प्रभावीपणे बासरीवादन केले. ज्याला उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (Music)

यानंतर गुरुकुलचे बासरीवादक प्रशांत बनिया यांनी शास्त्रीय संगीतातील रागांवर आधारित एकल बासरीवादन सादर करत या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी रागदारी संगीताची वैशिष्ट्ये, स्वरांची मांडणी आणि बासरीच्या सुरेल आलापातून त्यांनी उपस्थित रसिकांना शास्त्रीय संगीताचा आनंद अनुभूती दिली. यावेळी प्रख्यात तबलावादक स्वप्निल भाटे यांनी त्यांना साथ दिली. (Music)

तर या पं. विवेक सोनार आणि सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद फजल कुरेशी यांच्या बासरी-तबला जुगलबंदीने कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू गाठला. दोन्ही कलाकारांनी आपल्या वादनातील तांत्रिक सफाई, लयकारी आणि परस्पर संवादातून जुगलबंदीचे अप्रतिम दर्शन घडवले. बासरीच्या सुरेल स्वरांना तबल्याच्या दमदार लयीची साथ लाभल्याने सभागृहातील वातावरण अक्षरशः संगीतमय झाले होते. या दोन्ही दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. (Music)

गुरु-शिष्य परंपरेतील सातत्य, नव्या पिढीतील कलाकारांना व्यासपीठ आणि भारतीय संगीताच्या विविध प्रवाहांशी रसिकांचा परिचय करून देण्याच्या दृष्टीने ‘परंपरा’ या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले. नवोदित कलाकारांच्या सादरीकरणापासून अनुभवी - दिग्गज कलाकारांच्या जुगलबंदीपर्यंत कार्यक्रमाची आखणी करण्यात आल्याने संगीतप्रेमींसाठी ही विशेष पर्वणी ठरली. तर सुप्रसिद्ध निवेदिका प्राजक्ता आपटे यांनीही तितक्याच शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेलं या कार्यक्रमाचे निवेदनही सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले. (Music)

या कार्यक्रमास कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे, नवी मुंबई क्राईम ब्रँचचे डीसीपी सचिन गुंजाळ, के. सी. गांधी शाळेचे ट्रस्टी मनोज पालन, बांधकाम व्यावसायिक संजय बोरगांवकर, डॉ. किशोर देसाई, उद्योजक संजय गुप्ता, उद्योजक निलेश केणे, ठाणे भारत सहकारी बँकेसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते. (Music)








संबंधित मजकूर