मुंबई (अभिनंदन परुळेकर): (DrShrikantShinde) “लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संवाद जितका मजबूत, तितका विकासाचा वेग अधिक प्रभावी असतो. युवा आणि प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. या ऊर्जेला योग्य दिशा, नियोजनाची जोड आणि जनसेवेची भावना मिळाली, तर आपल्या शहरांचा कायापालट करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. निवडणूक जिंकणे ही लोकसेवेची सुरुवात आहे, खरी कसोटी त्यानंतर सुरू होते. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या समजून घेणे, त्यांच्याशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून विकासकामे मार्गी लावणे, हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. नागरिकांनी आपल्या कामासाठी कार्यालयात येण्याची वाट पाहण्यापेक्षा आपण नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्या प्रभागात नियमित फिरा, लोकांच्या अडचणी ऐका, त्या समजून घ्या आणि संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करा.” असा विश्वास खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
“शिवसेनेची ताकद केवळ संघटनेत नाही, तर सामान्य माणसाच्या सुख-दुःखात धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी कायम उपलब्ध राहावे, त्यांच्या विश्वासाला पात्र ठरावे आणि विकासकामांच्या माध्यमातून आपल्या कामाची छाप उमटवावी.” ही अपेक्षादेखील खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. (DrShrikantShinde)
उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे सोमवार दि.३१ रोजी नवी मुंबई, भिवंडी - निजामपूर, मीरा - भाईंदर, पनवेल आणि वसई - विरार महापालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरास उपस्थित राहून डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सर्व नगरसेवकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. (DrShrikantShinde)
यावेळी शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, प्रबोधिनीच्या मृणालिनी नानीवाडेकर यांच्यासह सर्व महापालिकांमधील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (DrShrikantShinde)