“अपना टाईम कब आएगा?” ; धारावीतील ‘क्रिएटिव्ह’ तरुणाईला पुनर्विकासाची आस

Dharavi creative youth
(चित्र: एआय) 
 
मुंबई : (Dharavi) आशियातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टीचा शिक्का माथ्यावर असलेल्या धारावीतील तरुणाई मोठी स्वप्ने पाहत आहे. मात्र, दाटीवाटीची वस्ती, अपुरी घरातील जागा, सततचा गोंगाट आणि ‘प्रायव्हसी’चा अभाव यामुळे रॅपर, सिंगर, डान्सर, कॉमेडियन, फॅशन डिझायनर आणि स्टोरी टेलर अशा डिजिटल कंटेंट क्रिएटर्सना आपल्या प्रतिभेला योग्य वाव देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 
घरच बनते स्टुडिओ!
 
स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे धारावीच्या गल्ल्यांमधून ‘नवी धारावी’ आकार घेत आहे. घरातील झोपण्याची जागा स्टुडिओ म्हणून वापरणे, पोटमाळ्यावर रेकॉर्डिंग करणे किंवा परिसर शांत होण्याची वाट पाहून रिल शूट करणे, अशा पद्धतीने अनेक तरुण आपले डिजिटल करिअर घडवत आहेत. मात्र, वाहनांचे हॉर्न, शेजाऱ्यांच्या गप्पा, घरातील गडबड आणि परिसरातील कोलाहल यामुळे रेकॉर्डिंग करणे मोठे आव्हान ठरते. (Dharavi)
 
‘धारावीकर’ या ओळखीशीही संघर्ष
 
धारावीतील ३० वर्षीय के. जे. अय्यनार यांचा प्रवास याचे प्रतिनिधिक उदाहरण आहे. पाच जणांच्या कुटुंबासोबत छोट्याशा खोलीत राहणाऱ्या अय्यनार यांना गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यासाठी योग्य वेळ आणि शांत वातावरणाची प्रतीक्षा करावी लागत असे. घरात स्वयंपाक सुरू असणे किंवा पाहुणे येणे यामुळे अनेकदा रेकॉर्डिंग थांबवावे लागायचे. (Dharavi)
 
२०१२ मध्ये रॅप विश्वात प्रवेश केल्यानंतर ‘धारावीकर’ असल्याने आपल्या गाण्यापेक्षा राहत्या पत्त्याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोरोनाकाळात घरातून गाणी रेकॉर्ड करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर त्यांना नवी ओळख मिळाली आणि ‘सुपर सिंगर’च्या मंचावर जाण्याची संधी मिळाली. (Dharavi)
 
धारावीची डिजिटल अर्थव्यवस्था
 
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे डिजिटल कंटेंटच्या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. धारावीतील तरुणही राहत्या घरातून या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. देशभरातील प्रेक्षकांपर्यंत त्यांचा कंटेंट पोहोचत असून, विविध क्षेत्रांत त्यांना संधी मिळत आहेत. (Dharavi)
 
पुनर्विकासातून ‘क्रिएटिव्ह स्पेस’ची आशा
 
धारावी पुनर्विकास प्रकल्पातून अद्ययावत घरे, मोकळ्या सार्वजनिक जागा, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि ‘लिव्ह-वर्क’ची सांगड घालणारी सुनियोजित वसाहत उभारली जाणार आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएटर्सना घरात शांत जागा, रिहर्सलसाठी स्वतंत्र खोली तसेच शूटिंग व कार्यशाळांसाठी नवी सार्वजनिक ठिकाणे उपलब्ध होऊ शकतात. नवे घर म्हणजे केवळ बदललेला पत्ता नाही; तर धारावीतील तरुणाईच्या प्रतिभेला नवे पंख देणारी संधी आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Dharavi)
 

 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर